मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

कोजागिरीची कार्तिक पहाट

भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर कार्तिक १, शके १९४०

आजचा दिवस म्हणजे खरोखरीच अनोखा म्हटला पाहिजे. आज सौर कॅलेण्डरचा ८ व्या म्हणजे कार्तिक महिन्याची सुरुवात तर चांद्र कॅलेंडरमधील पूर्ण चंद्र असलेला त्यातही कोजागिरीचा दिवस म्हणजे ७ व्या महिन्याच्या शुक्ल पक्षाचा (पहिल्या पंधरवड्याचा) शेवटचा दिवस. सौर कॅलेंडर आणि चांद्र कॅलेंडर दोन्ही दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने आजचा दिवशी दुग्धशर्करा योगच!

हा दिवस मनसोक्त उपभोगण्यासाठी श्विन तयारच होती. आज #cycle2work करणार असल्याची कल्पना श्विनला होतीच. मी सकाळी जवळ जायचाच अवकाश, श्विनचा चेहरा लगेचच उजळला. हॅन्डलला लावलेला आडवा दिवा श्विनला शोभून दिसत होता. श्विनची पुरेशी पोटपूजा झाल्याची म्हणजे ट्यूब मधील हवा पूर्ण असल्याची) खात्री करून आम्ही घरातून निघालो. डोंबिवली पूर्वेस जाताच वर्दळ जाणवू लागली. त्यामुळे श्विन शांतपणे जात होती. डोंबिवली बाहेर पडल्यावर गती घेता येईल ही आशा मात्र फोल ठरली. कल्याण शिळ रस्त्यावर जाताच आजची गर्दी नेहमीपेक्षा जास्त असल्याचे जाणवू लागले. शिळ फाटा येथे अश्वशक्तीधारी दुचाकी आणि चारचाकींची लांबलचक रांग लागली होती. एकंदर रागरंग पाहताच मी आज मुंब्रा शहरातून न जाता मुंब्रा बाह्यवळण रस्त्याने जायचे ठरवले. मी मुंब्रा बाह्यवळण रस्त्याला वळताच श्विनचा चेहरा चांगलाच खुलला. ऑफिसला जाताना श्विनला फार कमी वेळा मुंब्रा बाह्यवळण रस्त्याने जायची संधी मिळते. आज ती संधी मिळाल्याने श्विन खुश झाली होती.

ठाण्याच्या दिशेला बाह्यवळण रस्त्यावरून जाताना मुंब्रा डोंगर डावीकडे तर मुंब्रा शहर आणि खाडी उजवीकडे आहे. डोंगराची शोभा पाहत श्विन जात असताना आता मोजकीच वाहने दिसत होती. खंडाळा घाट चढण्याची सवय झाल्यामुळे मुंब्रा बाह्यवळणाचा चढ श्विन सहजतेने पार करत होती. मुंब्रादेवीचे मंदिर दिसू लागताच श्विनच्या नजरेतून ते मंदिर कॅमेरात कैद झाले.

मग अस्मादिकांनाही स्वतःचे छायाचित्र टिपण्याचा मोह आवरला नाही.


श्विनबरोबर अस्मादिकांचेही समाधान झाल्यावर मात्र श्विनने वेग घेतला. सुदैवाने पुढील रस्ता मोकळाच होता. मुंब्रा शहर पार होताच लांबवर पसरलेली खाडी आणि दूरवरून दिसणारा नाशिक ठाणे महामार्ग दिसू लागला. गेले बरेच दिवस श्विन मुंब्रा ऐवजी कल्याण मार्गे नाशिक ठाणे महामार्गाला जात होती. त्यामुळे तो महामार्ग दिसू लागताच श्विनचा वेग आणखीच वाढला.

ठाणे शहरात मात्र श्विनला पुन्हा लगाम लागला. #TJSBBANK च्या मधुकर भवन कार्यालयात पोचताना श्विनला पुन्हा एकदा डोंबिवली शहरातुन निघताना ज्या संथ गतीने जावे लागले त्याही पेक्षा कुर्मगतीने जावे लागले.

सूर्य दक्षिण गोलार्धात असल्यामुळे संध्याकाळी परत निघाल्यावर थोड्याच वेळात अंधाराच्या साम्राज्याला सुरुवात होत असली तरी आज कोजागिरीचा चंद्र साथ करणार होता. संध्याकाळी मधुकर भवन कार्यालयातून परत निघताना श्विनचे फ्रंट लाइट आणि टेल लाइट सुरु असल्याची खात्री केली. अंदाजाप्रमाणे लगेचच अंधार पडत असल्याचे लक्षात येताच दोन्ही लाइट सुरूही केले. आजूबाजूला जाणारी वाहने ते लाइट पाहत श्विनकडे बघून थबकत होती. श्विनला मात्र त्याची फिकीर नव्हती. खारेगाव टोल मार्गे मुंब्रा शहराकडे वळत असतानाच आकाशात तेजाने तळपणारा चंद्र श्विनला खुणावू लागला.


चंद्राच्या त्या मोहक रुपाने श्विनची गती चांगलीच मंदावली. खरेतर तेथून पुढे जायची श्विनला इच्छाच होईना. मात्र तरी त्या चंद्राकडे पाहत श्विन मार्गक्रमण करू लागली. खारेगाव चौपाटीकडून मुंब्रा शहराकडे जाताना आकाशातील चंद्र आणि खाडीमध्ये पडत असलेले त्याचे प्रतिबिंब ह्यांनी नजरबंदीच केली होती. खाडीजवळ जाण्याचा रस्ता पाहता श्विन पुढे सरकत होती. त्यातच एक सुंदर जागा सापडल्यावर श्विनने तेथे मुक्काम केला


खाडीकिनारी उभी राहिलेल्या श्विनचा हेडलाईट आणि प्रत्यक्ष चंद्र यांची जुगलबंदीच सुरु झाली.  चंद्राकडे पाहताना श्विनचे समाधान होत नव्हते.                                                      कोजागिरीचा चंद्र अधिक सुंदर की त्याचे खाडीत पडलेले प्रतिबिंब  अधिक सुंदर याचे उत्तर सापडणे कठीण होते.  ते उत्तर शोधण्याचा विचार करत असताना श्विन आणखीच गोंधळून जात होती. अखेरीस तो नाद सोडून श्विन पुन्हा वास्तवात परतली.                                                          

मुंब्रा शहरातील वर्दळीमुळे श्विन चांगलीच भानावर आली. जागा मिळेल ती जागा भरून काढण्यात कोणतेही वाहन कमी पडत नव्हते.  अश्वशक्तीधारी दुचाकी, प्रवासी तीन आसनी तीन चाकी वाहने हे तसेही मिळेल ती जागा  पटकावण्यात तरबेज. पण मुंब्रा शहरातील पादचारी दोन वाहनांमधील जागाही चटकन भरून काढत. रस्ता हा वाहनांसाठी असतो आणि चालण्यासाठी पदपथ असतो हे कोणाच्याही गावी नव्हते. जागा मिळताच रस्ता ओलांडण्यात मुंब्रावासीय अग्रेसर आहेत.                                                                       मुंब्रा शहरातील वर्दळ परवडली अशी गर्दी आज शिळ फाटा येथे होती. रस्त्याची डावी बाजू सुद्धा वाहनांनी गिळंकृत केली होती. सगळी वाहतुक ठप्प झाल्याप्रमाणे चित्र दिसत होते. दुचाकी वाहने मिळेल त्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूला अतिक्रमण करत असताना श्विनने रस्त्याच्या कोणत्याही बाजूचा विधिनिषेध बाळगला नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला अडथळा दिसताच ठप्प झालेल्या चारचाकी वाहनांच्या उजवीकडून वाट काढत श्विनने शेकडो अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले.                                                                शिळ फाट्यापुढे मात्र रस्त्यामध्ये वर्दळ असली तरी वाहतूक ठप्प झालेली नव्हती. पालवा, मानपाडा रस्ता, भोपर, DNC पुढील चौक हि वाहतूक अडवणारी नेहमीची यशस्वी ठिकाणे आज श्विनला अडवू शकली नाहीत.                                                                    

                                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...