बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

Same Roads, Same Rules, Same Rights

दिवसभर विषुववृत्ताजवळील सूर्याची दाहकता जाणवत असली तरी सकाळी मात्र त्याची जाणीव होत नव्हती. श्विनने नेहमीपेक्षा उशिरानेच आज राइडला सुरुवात केली. ९० फुटी रस्त्यावर फेरी मारून परत यायचे की नेवाळी फाटा किंवा शिळ फाटा पर्यंत जायचे याचा गोंधळ माझ्या मनात सुरु झाला, तेव्हा श्विनने स्वतःच निर्णय घेऊन मार्गक्रमण सुरु केले.

पूर्वपश्चिम पुलावरून P & T मार्गे मानपाडा रस्ता गाठण्याचा श्विनचा विचार होता. मात्र P & T कॉलनी मार्गे मानपाडा रस्त्याच्या चौकात गेल्यावर तेथील एकमेकात अडकलेली अश्वशक्तीधारी दुचाकी, चारचाकी वाहने पाहताच श्विनने भोपरमार्गे मोहरा वळवला.

कल्याण शिळ रस्त्याला लागताच मात्र श्विनने वेग घेतला. पुन्हा cycle2work सुरु करायचे असल्याने आज शिळ पर्यंत जाऊन रस्त्याचा अंदाज घेण्याचे श्विनने ठरवले. पत्री पूल- दुर्गाडी - कोन इथली अडथळ्यांची शर्यत जास्त अवघड की शिळ- कळवा नाका- खारेगाव टोल हा मार्ग जास्त अवघड याचा अंदाजही घ्यायचा होता.

मानपाडेश्वर मंदिर सोडल्यावर सुरुवात तरी छान झाली होती. रडतखडत चाललेल्या आणि डझनभर लेकरांचे ओझे अंगावर घेणाऱ्या डुक्कर रिक्षाला मागे टाकत श्विन पुढे निघाली. एक खाजगी बस स्वतःच्याच मस्तीत रस्त्याच्या डाव्या बाजूला प्रवाश्यांच्या प्रतीक्षेत उभी होती. श्विनने तिच्या उजवीकडून मार्ग काढताच ती बस जागी झाली. मात्र आता ती श्विनला गाठणे अवघड होते. रस्त्यावर वर्दळ अगदीच तुरळक नव्हती आणि जागोजागी पेरलेले गतिरोधक त्या बसची गती कमी करत होती. श्विन मात्र त्या गतिरोधकांवरून लीलया पुढे जात होती.

मात्र थोडा मोकळा रस्ता दिसताच ती बस श्विनला गाठणार तोच टोल नाक्याने त्या बसची अडवणूक केली. श्विनने त्या टोल नाक्याला झुकांडी देत पालवाजवळचा पूल चढायला सुरुवात केली. दिवा पनवेल अग्निरथ मार्गिकेवरील हा पूल चढून पुढील उताराला लागताना गतिवर मात्र नियंत्रण ठेवावे लागते, कारण हा उतार संपताच तेथे पालवाकडून येणारा रस्ता आडवा येतो.

इथे वाहनांना इशारा देणाऱ्या तिनरंगीत दिव्यांची पट्टी आहेच शिवाय वाहतूक नियंत्रक सुद्धा वाहनांना मार्गदर्शन करत असतात. श्विनला त्या उतारावरून येतानाच पुढील वाहने थांबलेली दिसली. त्यामुळे श्विन सावध होती. चौकात जाताच श्विनने पहिले की इशारे देणाऱ्या दिव्यांची यंत्रणा बंद असली तरी वाहतूक नियंत्रक वाहनांना मार्गदर्शन करत होता.

बहुतेक वेळा वाहतूक नियंत्रक सायकलला पुढे जाऊ देतात. मात्र सायकलच्या फायद्यासाठीसुद्धा सायकलला इतर वाहनांपेक्षा वेगळी वागणूक देणे/ मिळणे श्विनला पटत नसे. एखाद्या मोठ्या राइडला इतर सायकलिस्ट बरोबर जातानाही जर कोणी लाल दिवा लागला असता पुढे जाऊ लागला किंवा श्विनला पुढे जायला सांगू लागला तरी श्विनला ते पटत नसे.
आजचा अनुभवही तसाच. श्विनने मार्ग काढत थांबलेल्या वाहनांच्या पहिल्या रांगेत प्रवेश मिळवला आणि श्विन पुढे जाण्याच्या इशाऱ्याची वाट पाहत थांबली. इतक्यात मागून एकदीड शतक अश्वशक्ती असलेली दुचाकी आली. श्विन थांबल्यामुळे त्या दुचाकीलाही थांबावे लागले. वाहतूक नियंत्रक रस्त्याच्या दुभाजकाजवळ होता, तर श्विन रस्त्याच्या डाव्या बाजूला होती. त्या नियंत्रकाचे रस्त्याच्या डाव्या बाजुकडे लक्षही नव्हते. श्विन थांबल्यामुळे मागच्या दुचाकीलाही थांबावे लागले. क्षणार्धात शतकी वेग गाठू शकणाऱ्या त्या दुचाकीला श्विनच्या मागच्या रांगेत उभे राहावे लागणार होते.

त्यामुळे त्या दुचाकीच्या सारथ्याने श्विनला वाहतूक नियंत्रकाने दिलेला थांबण्याचा इशारा न जुमानता पुढे जायला सांगितले. तो म्हणाला सायकलसाठी थांबण्याची गरज नसते, तू पुढे जाण्याच्या इशाऱ्याची वाट पाहू नकोस, तू जा पुढे.

श्विनने मात्र ताडकन उत्तर दिले,' Same roads, same rules, same rights'. अर्थातच समान रस्ता, समान नियम, समान हक्क'.

ज्या प्रमाणे इतर वाहनांना नियम आहेत तेच नियम सायकलसाठीही लागू आहेत आणि ज्या प्रमाणे इतर वाहनांना रस्त्यावरून जायचा हक्क/ मान आहे, तोच हक्क/ मान इतर वाहनांनीही सायकलला दिला पाहिजे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...