बुधवार, २२ एप्रिल, २०२०

पाहुणचार: पुणे जम्मू सायकलसफरः भाग ३ लेख ४

भारतीय राष्ट्रीय दिनांक ९ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक ३० डिसेंम्बर २०१९

(सुर्य उत्तर गोलार्धात अधिक दिवस असतो. त्या वेळी भारतीय राष्ट्रीय कँलेंडरचे पहिले ६ महिने सुरु असतात. त्यामुळे राष्ट्रीय कँलेंडरच्या पहिल्या ६ महिन्यात जास्त दिवस असतात. दुसरा महिना ते सहावा महिना या सलग ५ महिन्यात प्रत्येकी ३१ दिवस असतात, तर शेवटच्या ६ सलग महिन्यात प्रत्येकी ३० दिवस असतात. पहिल्या महिन्यात सामान्यतः ३० दिवस असतात. हे सौर कँलेंडर असल्याने चौथ्या वर्षी एक अधिक दिवस असतो. गणिताच्या नियमानुसार राहिलेला हातचा पुढील पायरीत लगेच मिळवतात. त्याप्रमाणे दर चौथ्या वर्षी म्हणजे लिप वर्षी तो अधिक दिवस पहिल्या महिन्यात वाढवला जाऊन लिप वर्षी पहिले सलग ६ महिने ३१ दिवसांचे तर शेवटचे सलग ६ महिने ३० दिवसांचे असतात.

ग्रेगोरीयन कँलेंडरमध्ये मात्र कसलेही नियम न लावता, मन मानेल तसे कितीही दिवस कोणत्याही महिन्यात घुसवले आहेत. ज्यूलियस आणि आँगस्टस ह्या सरदारांना वाटले म्हणून त्यांंच्या नावाच्या महिन्यात १ दिवस वाढवुन ते ३१ दिवसांचे केले, आणि त्यासाठी फेब्रुवारीचे २ दिवस कापून त्याला लंगडा केला. लिप वर्षी सुध्दा अधिक दिवस पहिल्या नव्हे तर दुसऱ्या महिन्यात वाढवला आहे.)

श्विनचा मुक्काम आता घरापासून जवळपास १००० किमी अंतरावर होता. गेेले काही दिवस थंडीही वाढत होती. काल जेवायलाही थोडे लांंब जावे लागले होते. पोट तर अधूनमधून तक्रार करत होतेच. सगळ्याचा परीणाम होत रात्री कणकण जाणवू लागली होती. पहाटे पहाटे झोपेमध्ये अचानक एक स्वप्न पडले. माझा मुलगा -राजस स्वप्नात आला.. उठलो तेव्हा स्वप्न नीटसे आठवत नव्हते. मात्र आज माझ्या वडिलांची पुण्यतारीख होती. २३ सौरवर्ष आज पुर्ण होत होती. मी हे विसरलो नव्हतोच. पण ते स्वप्न यासाठीच तर पडले नव्हते ना!

आम्ही सकाळी ६.३० ला हॉटेल सोडले. थंडी चांगलीच जाणवत होती. कणकण असल्याने तापाची गोळी घेतली. मात्र श्विनबरोबर टेम्पोचा पर्याय निवडला. थंडीच्या जोडीला दाट धुकेही होते. सुदैवाने अक्षरशः अर्धा एक किमी अंतरावरच चहाकेंद्र सापडले. त्यामुळे लगेचच थांबा घेतला गेला. चहाबरोबर शेगडीची उब मिळाल्याने बरे वाटू लागले होते. त्यामुळे चहा घेतल्यानंतर श्विन रस्त्यावर उतरली. महामार्ग साथ करत असताना आम्ही लय पकडली होती. मात्र थोड्या वेळातच आम्हाला महामार्ग सोडावा लागला. तो सोडण्यासाठी आम्ही डावे वळण घेतच होतो एवढ्यात कोपऱ्यातील शेकोटीकडे सगळ्यांचे लक्ष गेले. आपोआपच सगळ्या सायकलींचा लगाम खेचला गेला.

शेकोटीची उब घेत सायकलस्वार ताजेतवाने तर झालेच पण चांंगलेच रंगातही आले. सगळ्यांंनी शेकोटी भोवती फेर धरला.




आदित्यनारायण धुक्याची दुलई दुर करून डोळे किलकिले करू पाहत होता. सायकलपटूंचा नाच पाहून आदित्य एकदम प्रसन्न झाला होता. तो आळस झटकून क्षितिजावर येऊ लागला. त्याचे रुप लोभसवाणे दिसत होते. शेकोटी भोवती धरलेला फेर पाहून प्रसन्न झालेला आदित्य त्याची कोवळी किरणे सायकलस्वारांवर पसरू लागला.



त्या सुंदर वातावरणामुळे सायकलस्वारांचा ऊत्साहही वाढला होता. सगळेजण लयीत जाऊ लागले. हमरस्ता सोडल्यामुळे आता रस्ता थोडा अरूंद झाला होता. मात्र रस्त्याला वाहनेच नव्हती. अर्थातच सायकलस्वारांना रस्ता जणू आंदणच मिळाला होता. काही अंतरावर वाटेत पथकरनाका लागला. मात्र तिथेही वाहने नव्हतीच. इतका चांंगला रस्ता आणि सुंदर पथकरनाका पाहून महाराष्ट्र राज्यातील आठवण येऊन श्विनला न्युनगंड वाटू लागला. खरतर हा महामार्गही नव्हता. महाराष्ट्रात इतका चांगला अंतर्गत रस्ता आणि त्याचबरोबर मोकळा पथकरनाका असेल तर वाहनचालक स्वतःच पथकर घ्या म्हणू लागतील.

पुढे पुढे रस्ता आणखीच अरूंद होत होता. मोकळ्या रस्त्यावर सायकलपटू आणखीच रंगात आले होते. वाटेत डावीकडे जाणारे एक छोटे वळण दिसले. श्विनने नकाशामध्ये तिथे एक वळण असल्याचे पाहीले होते. श्विनने चौकशी केली तर गावकऱ्यांनी वळण न घेता सरळ जायला सांगितले. त्यामुळे सगळेजण सरळच जाऊ लागले. पुढे रस्ता थोडा खराब होता. तिथून वाट काढून सगळेजण पुन्हा चांगल्या रस्त्यावर पोचले खरे पण इतक्यात मागुन गौतमची हाक ऐकू आली. आम्ही चुकीच्या रस्त्याने ३ किमी पुढे आलो होतो. गावकऱ्यांनी आम्हाला चुकीचा रस्ता सांगितला होता. श्विनने चौकशी केली तेच वळण घ्यायला हवे होते. नशीबाने गौतमने आम्हाला थांबवले होते.

आम्ही परत फिरलो. परत त्याच वळणावर आलो तोपर्यंत १०.३० वाजले होते. जठराग्नी जागृत झाला होता. त्या वळणावर दोनतीन दुकाने दिसत होती. उपहारगृह मात्र नव्हती. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हे गाव सोडले तर पुन्हा कधी खायला मिळेल याची खात्री नव्हती. त्यामुळे तेथील दुकानातच काय खायला मिळेल ह्याची चौकशी केली. मात्र तो दुकानदारच नव्हे तर आजुबाजुची लोकही काही सांगू शकत नव्हते. मात्र त्या दुकानात कचोरी दिसली. त्या कचोरी बरोबर त्या दुकानात कढी मिळत होती.

अखेरीस कचोरी कढीवर ताव मारून वेळ निभावत सायकलपटू पुढे निघाले. रस्ता आणखी अरुंद झाला होता. सगळ्यांचा वेग चांगलाच मंदावला. मात्र सगळे आरामात पुढे जात होते. सगळ्यांचा ऊत्साह कायम होताच.



राजस्थानमधील परीसराची आमच्या संघाला सवय झाली होती. मैलोनमैल गाव तर राहोच, तर छोटी झोपडीही नजरेस पडत नव्हती. कित्येक योजनं मनुष्यवस्ती नव्हतीच. मात्र अश्या ह्या प्रदेशात गोधन सांभाळण्याचे कार्य कालप्रमाणेच आजही द्रूष्टीस पडले. जोधपूर जिल्ह्यातील बिलाडा गावाजवळ कामधेनू गौरक्षा दल सेवा समितीतर्फे अनाथ पशुपक्ष्यांसाठी चिकीत्सालय सुरू केले होते. जागाही बरीच मोठी दिसत होती.



साडेदहाच्या सुमारास नाश्ता झाला होता. त्याला बराच वेळ झाला होता. मध्यान्ह उलटून गेली होती. मात्र आमचा संघ न थांबता पुढे जात होता. साधारण दोन वाजता रस्त्याच्या उजव्या बाजूला एक प्रशस्त धाबा पाहुन आम्ही थांबा घेतला. जेवण अप्रतिम होते. रोज १००-१२५ किमी सायकलवताना धाब्यावरील खाटेवर बसून जेवायला मस्त वाटत होते.




जेवण झाल्यावर आम्ही संथ गतीने जाऊ लागलो.
आम्ही महामार्ग सोडल्यापासुन रस्ता तर अरूंद होताच पण वाटेत शहरांची नावं दाखवणारे फलकही नव्हते. त्यामुळे श्विनने आघाडी घेत गुगलच्या सहाय्याने मार्ग शोधणे सुरू केले. आम्हाला मेडता रोड येथील सुंदरम पँलेस येथे जायचे होते. वाटेत एक डावे वळण घ्यायचे गुगलकाका सांगत होते. मात्र त्या ठिकाणी असलेला फलक मात्र मेडतासाठी सरळ जायला सांगत होता. काही वेळा गुगल काका गोंधळ घालतात खरे पण श्विनला ह्यावेळी गुगलकाकांंवर विश्वास वाटत होता. अखेर सगळेजण तिथे थांबले. रस्त्याच्या कडेला एक छानसे राजस्थानी जोडपे बसलेले दिसत होते.


काहीजण आजुबाजुला नक्की कोणत्या दिशेने जायची चौकशी करत होते. दरम्यान श्विनने गुगलकाकांंकडे अधिक खोलात चौकशी केली. तेव्हा श्विनला उलगडा झाला की मेडता शहराकडे जाणारा रस्ता सरळ असला तरी मेडता रोडला जाण्यासाठी डावे वळण घ्यायला हवे होते. आम्हाला जायचे असलेले सुंदरम पँलेस मेडता रोड येथे होते, जे मेडता शहरापासुन साधारण १५ किमी लांंब होते. आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणापासून मेडता शहर आणि मेडता रोड दोन्ही अजूनही साधारण १८- २० किमी लांब होते.

श्विनने इतरांना समजावण्याचा प्रयत्न केला. काहीजण थोडे गोंधळात पडले तरी त्यानी श्विनवर विश्वास ठेवला. ते डावे वळण घेतल्यावर रस्ता अगदीच अरूंद झाला. पुढे एक गाव दिसले. तिथे दोन रस्ते फुटले होते. गावातील लोकांना आमचे होटेल माहितीच नव्हते. मात्र श्विनने गुगल काकांंकडून वाटेतील छोट्या छोट्या गावांची, ठिकाणांची माहिती करून घेतली होती. त्यामुळे श्विनने वाटेतील गावांची नावे पाठ करून ठेवली होती आणि इतरांकडुनही पाठ करून घेतली होती. ती ठिकाणं पाहत आम्ही जाऊ लागलो.

आताही वाटेत वस्ती नसली तरी आजूबाजूला थोडीफार शेती दिसत होती. मार्ग शोधत श्विनने आघाडी घेतली होती. मात्र 'look back' हा स्वतःच सांगितलेला मंत्र श्विनने जपला होता. रस्ता अगदीच अरुंद झाला होता. श्विन थोड्या वेगात असली तरी रस्त्याच्या आजुबाजुला आणि समोर श्विनचे बारीक लक्ष होते. अश्याच वेळी श्विनला समोर रस्त्यावर ऊजव्या बाजूला ३ कूत्रे काही तरी हूंगत असलेले दिसले. तिथे बहुतेक एखादा प्राणी मरुन पडला असल्याची शक्यता श्विनला वाटली. तसे असेल तर ती कुत्री श्विनवर हल्ला करण्याचीही शक्यता होती. हे लक्षात येताच श्विनने लगाम खेचला. मात्र थोडा उशिर झाला होता. त्या कुत्र्यांना श्विनची चाहुल लागली होती. तिन्ही कुत्री क्षणार्धात श्विनच्या अंगावर धावली, तीही अगदी योजनापुर्वक! एकजण रस्त्याच्या उजवीकडून रस्ता ओलांडून रस्त्याच्या डावीकडे थेट श्विनसमोर आला. बाकी दोघे उजव्या बाजूनेच.. पण त्यातील एक समोरच्या बाजूने तर उरलेला म्हणजे तिसरा कुत्रा उजव्याच बाजूला श्विनला समांतर येऊन थोडा मागे पोचला होता. म्हणजेच तीनही कु्त्र्यांनी तीन वेगवेगळ्या बाजूने श्विनला घेरले होते.

मागील सायकलस्वार हाकेच्या अंतरावर असले तरी ते येईपर्यंत थोडा वेळ लागणार होता. त्यांना लांबून ही परिस्थिती दिसत नव्हती. ते येईपर्यंत किमान २-३ मिनिटे लागणार होती. तोपर्यन्त परीस्थिती सांभाळावी लागणार होती. अस्मादिकांनी पायउतार होत श्विनलाच ढाल बनवले आणि मागे सरकू लागले. सुदैवाने इतक्यात तिथे एक दुचाकीस्वार आला. त्याने परिस्थिती ओळखत दुचाकी थांबवली. त्याबरोबर ती कुत्री भुंकतच थोडी मागे सरकली. त्याबरोबर तो दुचाकीस्वार पुन्हा जाऊ लागणार इतक्यात श्विनची साखळी निघाल्याचे अस्मादिकांना लक्षात आले. श्विनने जिवाच्या आकांताने त्या दुचाकीस्वाराला थांबवले. मात्र इतक्यात बाकी सायकलस्वारही आले. दुचाकीस्वार पुढे निघाला. श्विनने इतर सायकल स्वारांना कल्पना देत साखळी बसवून घेतली. 'Look back' मंत्र जपत आघाडी सांभाळण्याचा फायदा स्वतः श्विनलाच झाला होता. ह्या मंत्रामुळे मागील सायकलस्वार हाकेच्या अंतरावर असल्यानेच वेळेवर पोचले होते.

आमचा संघ पुन्हा वेग घेतच होता. इतक्यात एका चार चाकीने आमचा रस्ता अडवला. श्विनचे लक्ष लगेचच गाडीच्या क्रमांकाकडे गेले. ... MH 12. हो, तो पुणे येथील नाना पेठ भागात स्थायिक झालेला राधेश्याम नावाचा व्यावसायिक होता. आमचे पुणे जम्मू सायकलसफरीचे फलक पाहूनच तो थांबला होता. त्याचे मूळगाव पुढे आमच्या मार्गावर होते. तिथे चहा नाश्ता करण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. गावातील देवळात त्यांनी आम्हाला चहा नाश्ता तर दिलाच शिवाय तेथील धर्मशाळेतच राहण्याचा तो आग्रह करत होता. सगळे जण तेथील वातावरण पाहुन खुष झाले होते. सगळ्यांना तिथे राहण्याचा मोह होत होता.





मात्र त्या प्रेमळ पाहुणचाराचा स्वीकार करत आम्ही पुढचा रस्ता धरला. मेडता रोड जवळ येत असताना झी वाहिनीच्या बातमीदाराने आम्हाला गाठले. त्याने आम्हाला आमचे हॉटेल तर दाखवलेच शिवाय झी राजस्थान न्युज वाहीनीसाठी आमची मुलाखतही घेतली. त्याचबरोबर आमची आणि आमच्या सायकलची व्यवस्था व्यवस्थित आहे ह्याची खात्रीही त्याने करून घेतली. निरोप घेत असताना कोणतीही मदत लागली तरी संपर्क करा असे आग्रहपूर्वक सांगितले. खरतर त्यावेळी असा संपर्क करावा लागेल अशी कल्पना त्यालाही नव्हती आणि आम्हालाही नव्हती. मात्र रात्री आम्हाला समजले की जवळपास कुठेही जेवणाची सोय होऊ शकत नव्हती. आम्ही नाइलाजाने त्या पत्रकाराला भ्रमणध्वनी केला. त्याचे घर आमच्या ठिकाणापासून ७-८ किमी लांब होते. तरीही त्या पत्रकाराने कोणतेही कारण न सांगता आम्हाला घरपोच जेवण आणुन दिले. पुणेकर राजस्थानी राधेश्याम पाठोपाठ ह्या राजस्थानी पत्रकाराने केलेल्या पाहुणचाराने मन प्रसन्न झाले होते. शिणलेल्या गात्रांवर निद्रादेवीने कधी पाश आवळले ते आम्हाला कळलेही नाही.

४ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...