भारतीय राष्ट्रीय अर्थात जागतिक शास्त्रीय दिनांक: १२ पौष १९४१
ग्रेगोरीयन अर्थात युरोपमधील ख्रिस्ती नागरिकांच्या अशास्त्रीय कँलेडरचा दिनांक: २ जानेवारी २०२०
कालच्या दिवसभरातील प्रवास, ताण असावा की येथील हॉटेल S R Palace च्या मालकाने केलेल्या पाहुणचाराने आश्वस्थ केल्यामुळे असो, रात्री झोप अतिशय गाढ आणि शांत लागली होती. मी आणि देवधर नेहमीप्रमाणे एकाच खोलीत होतो. अचानक दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्यामुळे आम्ही खडबडून जागे झालो. पहातो तर ६ वाजले तरी आमच्या खोलीतून काहीच आवाज येत नसल्याने एकादशी दार ठोठावत होती. आम्ही गडबडीतच आवरले आणि तळमजल्यावर आलो. एकेकजण अजून येत होते. एकादशीमुळेच आम्ही वेळ साधली होती. हॉटेलमालकाने खास आमच्यासाठी चहाची सोय केली होती. ह्यापेक्षा सुख ते काय असणार? चहा घेत, सामान लावत सगळे रेंगाळत होते. काल सामना कराव्या लागणाऱ्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर लवकर निघायची घाई कोणीही करत नव्हते. S R Palace मधील कर्मचारी- मालकही कालपासून धुके वाढले असल्याचे सांगत होते. अखेर चहापान झाले, सामानही लावून झाले. मग तर संपूर्ण सफरीमध्ये प्रथमच सगळ्या सायकल रांगेतही लावून झाल्या. बऱ्यापैकी उजेडही दिसू लागला.
ग्रेगोरीयन अर्थात युरोपमधील ख्रिस्ती नागरिकांच्या अशास्त्रीय कँलेडरचा दिनांक: २ जानेवारी २०२०
कालच्या दिवसभरातील प्रवास, ताण असावा की येथील हॉटेल S R Palace च्या मालकाने केलेल्या पाहुणचाराने आश्वस्थ केल्यामुळे असो, रात्री झोप अतिशय गाढ आणि शांत लागली होती. मी आणि देवधर नेहमीप्रमाणे एकाच खोलीत होतो. अचानक दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्यामुळे आम्ही खडबडून जागे झालो. पहातो तर ६ वाजले तरी आमच्या खोलीतून काहीच आवाज येत नसल्याने एकादशी दार ठोठावत होती. आम्ही गडबडीतच आवरले आणि तळमजल्यावर आलो. एकेकजण अजून येत होते. एकादशीमुळेच आम्ही वेळ साधली होती. हॉटेलमालकाने खास आमच्यासाठी चहाची सोय केली होती. ह्यापेक्षा सुख ते काय असणार? चहा घेत, सामान लावत सगळे रेंगाळत होते. काल सामना कराव्या लागणाऱ्या धुक्याच्या पार्श्वभूमीवर लवकर निघायची घाई कोणीही करत नव्हते. S R Palace मधील कर्मचारी- मालकही कालपासून धुके वाढले असल्याचे सांगत होते. अखेर चहापान झाले, सामानही लावून झाले. मग तर संपूर्ण सफरीमध्ये प्रथमच सगळ्या सायकल रांगेतही लावून झाल्या. बऱ्यापैकी उजेडही दिसू लागला.
आता थांबण्याचे काहीच कारण उरले नव्हते. अखेर ७.३० वाजता आम्ही निघालो. शहरातील गल्ली बोळ पार करेपर्यंत उजेड होता. थोड्या वेळात हमरस्त्याला लागलो मात्र अन् धुक्याचे साम्राज्य सुरू झाले. आसाभाईंना आज सायकल चालवायला परवानगी नसल्याने ते टेम्पोमध्ये बसले होते. बाकी सगळेजण एकापाठोपाठ रांगेत जात होते. आम्ही वेग घेतो न घेतो तोच गौतमचा भ्रमणध्वनी आला. मात्र हातात सायकलचे हातमोजे घातलेले असल्याने तो घेता येईना. त्यामुळे फुजी (श्विन)ने सायकलवणे थांबवले. देवधरांना हाक मारून गौतमचा भ्रमणध्वनी आल्याचे सांगुन थांबायला सांगितले. देवधरांबरोबर रसिकभाई आणि मोहितही थांबले. इतर सायकलस्वार पुढे जात राहिले. गौतमला भ्रमणध्वनी लावून विचारले तर म्हणाला की,' तुम्ही पुढे येत रहा, मी तुमच्या पुढे येऊन उभा आहे'. आता हे सांगण्यासाठी त्याने भ्रमणध्वनी का लावला हे काही कळले नाही. मात्र त्यात वेळ गेल्यामुळे पुढे गेलेले ५ आणि आम्ही ४ असे दोन गट मात्र निष्कारण पडले. आम्ही चौघांनी टेम्पोला मागे टाकले. धुकं बऱ्यापैकी असले तरी ५-१० फुटावरचे दिसत होते. फुजी (श्विन) मोहितला सांगतच होता की पुढे गेलेले ५ जण एकत्र आहेत, आता आपण ४ जण एकत्रच राहूया. श्विनचे वाक्य पुरे होतयं न होतयं तोच देवधरांनी वेग वाढवला आणि एकटेच पुढे निघाले. त्यांंना एकट्याला पुढे जाऊ देणे त्यांच्याचसाठी धोक्याचे ठरु शकत होते. मात्र त्यांना हे समजावण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे श्विनने मोहितला रसिकभाईंंच्याबरोबर रहायला सांगून देवधरांच्या बरोबर जायचा निर्णय घेतला. महामार्गाला लागुन जेमतेम ५-६ किमी झाले असतील तोच रस्त्याच्या डावीकडून एक वासरू करूणपणे ओरडत असल्याचा आवाज आला. खरतर त्याचा आवाजही नीट फुटत नव्हता. देवधर अविचलीतपणे पुढे जात होते. फुजीने डावीकडे पाहीले मात्र... रस्त्याच्या डावीकडे उतार होता. त्यावरील खुरट्या झाडिमध्ये एक वासरू आडवे पडले होते आणि तीन कुत्री त्या वासराला जिवंतपणेच फाडून खात होती. राजस्थानमधील ही कुत्रीदेखील शहरी नसून जंगली होती यात शंकाच नाही. वासराऐवजी एखादा एकटा सायकलस्वार त्यांंच्या तावडीत सापडला असता तर... ही कल्पना मनात येताच आपण देवधरांना एकटे पूढे जाऊ न दिल्याबद्दल फुजी(श्विन)ला समाधान वाटले.
देवधरांच्या पाठोपाठ श्विन जात राहिला. काही अंतरावर पुढे गेलेले सायकलस्वार चहासाठी थांबलेले दिसले. देवधर आणि फुजी(श्विन)नेही थांबा घेतला. तेथे चहाचे एक छोटे केंद्र होते. त्याशेजारी दुरदूरपर्यंत काहीही वस्ती दिसत नव्हती. चहा नाश्ता करत असताना चहावाल्याशी गप्पा सुरु होत्या. चहावालाही सायकलसफारीबद्दल ऐकुन खुष झाला होता. रसिकभाई, मोहित बराच वेळ झाला तरी येत नव्हते. सायकलस्वारांना नैसर्गिक विधीसाठी जायचे होते. मात्र आजुबाजुला काहीच आडोसा दिसत नव्हता. शेवटी त्या चहावाल्याला विचारताच त्याने त्या केंद्राच्या लागुन असलेल्या दरवाजातून केंद्रामागे जायला सांगितले. त्याने सांगेपर्यंत तर तिथे दरवाजा आहे हेच कळत नव्हते. त्या दरवाजातून आत शिरताच एक गोठा दिसला. थंडी एवढी होती की त्या गायींच्याही अंगावर जाडेभरडे कपडे टाकले होते. त्या गोठ्यातून चहाकेंद्राच्या मागे जाता येत होते. तिथे गेल्यावर त्या केंद्रामागे असलेले घर दिसले. तिथे त्याचे कुटुंब रहात होते. त्या घरामागे मोठे आवार होते. त्या आवारामागे पुन्हा एक बांध घातला होता. आवाराच्या एका कोपऱ्यात बांधापलिकडे मोकळ्या जागेत एक विहीर दिसत होती. तेथील परीसर अतिशय स्वच्छ होता. बांधापलिकडे विहीरीजवळ जायचे असेल तर अनवाणी जावे लागत असे. घरासमोर कुत्र्यांची पिल्ले खेळत होती. श्विननेही त्यांंच्याबरोबर खेळण्याची हौस पुर्ण करून घेतली.
सगळेजण तिथे चांगलेच रंगले होते. बाहेरुन..चहाकेंद्रासमोरून पाहिले तर त्या केंद्रामागे एवढा खजिना दडला असेल अशी शंकाही येत नव्हती. घरातील महिलांना पुढील बाजुस येण्याचीही परवानगी नव्हती. ती परवानगी नसण्याचे कारण त्यांची सुरक्षा होती असे त्यांनी सांगितले. अर्थातच आमच्या संघातील महिलांना पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते. घरातील मंडळींशी गप्पा मारून सायकलस्वार परत चहाकेन्द्रासमोर आले. चहाकेंद्राशेजारी काही बांबु उभे रोवून त्यावर एक छत केले होते. त्या छताखाली काही पक्षी किलबिलाट करत होते. ते पक्षी अगदी हाताच्या अंंतरावर गेलो तरी उडत नव्हते. बाहेरून एक छोटे साधे दिसणारे ते चहाकेन्द्र वास्तविक खरोखरच पशुधन आणि पक्षीधनाने समृद्ध होते.
बराच वेळ झाला तरी रसिकभाई, मोहित आणि टेम्पोप्रवासी आले नव्हते. चहाकेंद्रापाशी थांबलेले सायकलस्वार आता अस्वस्थ होऊ लागले होते. त्यांंची बेचैनी वाढत असताना रसिकभाई आणि इतरजण आले. त्यांनी उशीर झाल्याचा उलगडा केला. ज्या वासराचे करूण रूदन ऐकून आम्ही दुर्लक्ष केले होते, त्याच वासराला वाचवण्यासाठी ते थांबले होते. त्यांनी त्या कुत्र्यांना हाकललेही होते. त्यानंतर त्या वासरालाही ऊभे करण्याचा प्रयत्न ते करत होते. मात्र त्या वासराचे पाय कुत्र्यांनी कुरतडले होते आणि ऊभे राहण्याचे त्राणही त्या वासराला उरले नव्हते. रसिकभाई, मोहित, गौतम त्यांचे प्रयत्न सोडायला तयार नव्हते. इतक्यात काही माणसे तिथे आली. त्या माणसांनी सांगितले की ते वासरू आता वाचू शकणार नाही, त्याला रैबीजही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता थांबू नका. ते ऐकून नाईलाजाने रसिकभाई, मोहित आणि टेम्पोप्रवासी तेथून निघाले होते.
सगळ्यांंचा चहा नाश्ता झाल्यावर आमचा संघ पुढे निघाला. रस्ता फार वर्दळीचा नव्हता.
दुपारी जेवायला एक धाबा सापडला. रोजच्याप्रमाणे धाब्यावरील पदार्थ उत्तम होते. तिथे जेवायला आलेल्या एका गटाने आमच्या बरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी आग्रह केला. त्यांंचे समाधान करुन आम्ही निघालो.
अय्यरकाका नेहमीप्रमाणे सगळ्यात पुढे दौडत होते. ते कधीही कूणाच्या अध्यातमध्यात नसायचे. मात्र कोणीही त्यांंच्या पुढे गेलेले त्यांना खपायचे नाही. बाकीचे बरेच मागे राहिले आहेत ह्याची खात्री झाल्यावर, किंवा उदरभरणाची वेळ झाली तर किंवा पुढील रस्ता माहिती नसेल तरच ते इतरांसाठी थांबत असत. बाकीचे सगळे छोट्या गटांमध्ये सायकलवत असत. ३ पुणेकर आपल्याच नादात असत. तर फुजी(श्विन), ट्रेक, नयना आघारकर, रसिकभाई, मोहित या डोंबिवली- अहमदाबादकरांचा एक संयुक्त गट झाला होता. ते पाचही जण कधी एकत्र असत तर कधी आलटून पालटून २-३ जणांच्या गटात असत. आसाभाई तर कधी पुणेकरांच्या गटात तर कधी डोंबिवली-अहमदाबादकर यांच्या संयुक्त गटात असत. अय्यरकाकांचे मात्र 'ऐकला चालो रे' सुरू असायचे.
वाटेत आम्ही चहासाठी थांबलो तेव्हा आजही आम्हाला नाशिकहुन जम्मुसाठी सायकलस्वारांचा एक गट दोन दिवसापूर्वी येऊन गेल्याची बातमी समजली. आमची उत्सुकता अधिकच वाढली. त्याचबरोबर उत्साहही वाढला. त्याच उत्साहात आम्ही हमरस्त्यालाच असलेले हॉटेल युवराज गाठले तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते.
झोपण्यासाठी श्विन गादीवर आडवा झाला. मात्र डोळे मिटूनही त्या वासराचे करूण रूदन ऐकू येत होते. रसिकभाईंंप्रमाणे आपण वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न न करता आपले प्राणीप्रेम पाळीव गायी -वासरं आणि कुत्र्यांच्या पिल्लापर्यंतच मर्यादित असल्याचे श्विनला प्रकर्षाने जाणवत होते. स्वत:तील भूतदयेचा अंश किती हा प्रश्न श्विनची झोप उडवत होता.
















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा