बुधवार, ६ मे, २०२०

राम राम सा राजस्थान: पुणे जम्मू सायकल सफर भाग ३ लेख ८

भारतीय राष्ट्रीय म्हणजेच जागतिक शास्त्रीय दिनांक १३ पौष १९४१

ग्रेगोरीयन म्हणजेच युरोपातील ख्रिस्ती लोकांपुरता मर्यादित असलेल्या आणि संकुचित मनोवृत्ती असलेल्या अशास्त्रीय कँलेडरनुसार दिनांक ३ जानेवारी २०२०

(ग्रेगोरीयन महीन्याचे नावच ख्रिस्ती देवता जेनसच्या नावावरून. का, जगात इतर धर्म नाहीत? मग हे कँलेडर इतर धर्माच्या लोकांना कसे लागु होणार. सर्वांना लागु होण्यासाठी सर्वांना सामायिक असलेले ग्रह, तारे, रास, नक्षत्र या खगोलशास्त्रावर आधारित गोष्टीनुसार नाव ठेवायला हवे.

भारतीय राष्ट्रीय कँलेडरमध्ये हा दोष दुर करून महिन्याची नावे नक्षत्रानुसार ठेवल्याने ते खगोलशास्त्रीय तर आहेच शिवाय संपूर्ण जगाला लागु होणारे म्हणजेच जागतिकही आहे.)


रावतसर शहर हे तसे लहानच. लोकसंख्या जेमतेम ३५-४० हजार. मात्र याचे भोगोलिक स्थान तसे महत्त्वाचे. रावतसर शहराच्या पुर्वेस फक्त २०-२५ किमी वर हरयाणा, उत्तरेला साधारण पाऊणशे किमी वर पंजाब तर पश्चिमेला सव्वाशे किमी वर पाकिस्तान. रावतसर येथील हॉटेल युवराज सोडताना फक्कड चहा मिळाला. चहा घेत असतानाच आणखी एक सोहळा पार पडला. आज श्विनची मावशी निरूपमा भावे हिचा कागदोपत्री ७२ वा वाढदिवस होता. त्यामुळे चहा घेत घेतच सगळ्यांंनी तिला शुभेच्छा दिल्या.

अर्थातच दिवसाची सुरुवात खुप छान झाली होती. सगळेजण उत्साहात होते. श्विन मात्र हिरमुसली होती, कारण गेले काही दिवस तिला डावलून अस्मादिकांनी फुजीची साथ निवडली होती. वास्तविक श्विनचा मान पट्टराणीचाच! पण सडपातळ बांधा, लालसर वर्ण आणि नखरेल फुजीसमोर सुबक ठेंगणी श्विनकडे दुर्लक्ष होत होते. वास्तविक आज नवीन राज्यात प्रवेश करणार असल्याने तो मान श्विनला मिळावा अशी अस्मादिकांचीही ईच्छा होती. मात्र टेम्पोमध्ये असलेल्या श्विनला खाली काढून फूजीला आत ठेवायला गौतम चालढकल करत होता. त्यामुळे नाश्त्याला थांबलो की फुजीऐवजी श्विनला खाली काढू असे सांगत श्विनची समजूत काढली.

आज धुकेही फार नव्हते आणि थंडिही गेल्या काही दिवसांपेक्षा कमी जाणवत होती. त्यामुळेही सगळेजण विशेष खुशीत होते. वातावरण एकदम सुखद होते. त्यामुळे सायकलस्वार मौजमजा करत, आनंद घेत दौडत होते. सगळ्यांना पंजाब बोलावत होता. त्यामुळे रावतसरहून निघाल्यावर चहानाश्त्यासाठी पहिला थांबा घेतला तो थेट हनुमानगढला! एव्हाना जवळपास ४० किमी अंतर पार झाले होते.




हनुमानगढ सोडताना नवीन राज्यात प्रवेश करायच्या कल्पनेने सगळ्यांची उत्कंठा वाढली होती. आमच्या ११ जणांच्या चमूचे सरासरी वय होते ५८ वर्षे.. ज्यामध्ये सत्तरी पार केलेले तिघेजण होते, तर ४८ वर्षापेक्षा कमी वयाचे दोघे होते. मात्र आमचा उत्साह किती वयाचा होता हे खालील व्हिडीओमध्येच कळेल





वाटेत लागलेल्या कालव्यावर नाचगाणी करत सगळे दंग झाले होते. पहिल्याच टप्प्यात आजचे बरेच अंतर पार झाल्याने सगळे निर्धास्त झाले होते. अय्यरकाका नेहमीप्रमाणे पूढे गेले होते. बाकीचे स्वार लांब राहिल्याचा अंदाज येताच.एका वस्तीपाशी ते थांबले. वस्ती म्हणजे ८-१० घर आणि २-४ दुकानं/ कारखान्याचे गाळे इतपतच कारभार होता. अय्यरकाका थांबताच तेथील एका कारखान्याच्या गाळ्यातील व्यावसायिक अय्यरकाकांची चौकशी करू लागला. अय्यरकाकांंच्या प्रवासाची कल्पना येताच त्याने अय्यरकाकांंना चहाचा आग्रह केला. तो चहा आणायला गेला आणि आम्ही ४-५ जण तिथे पोचलो. तेथील स्थानिकांशी आमचे सुर लगेचच जुळले.




आम्ही गप्पा मारत असतानाच तो व्यावसायिक एका भल्या मोठ्या पात्रातून चहा घेऊन आला. आम्हा ५ जणांनाही तो पुरला. राजस्थानमधील लोकांचे प्रेम संपूर्ण राज्यात आम्ही अनुभवत होतो.



चहापान झाल्यावर सगळेच जण एका पाठोपाठ जात होते. रस्ताही बराच अरुंद होता. अय्यरकाकांंनी पुन्हा आघाडी घेतली होती. सादूल शहर येथे डॉ जितेंद्र आमचे स्वागत करणार असल्याने देवधर त्यांच्या संपर्कात होते. आम्ही जवळ पोहोचत आहोत हे कळताच त्यांनी कळवले की सादूल शहराबाहेर एक वळण आहे तिथे ते आम्हाला भेटणार आहेत. अय्यरकाका सगळ्यात पुढे होते. आता पुन्हा रस्ता चुकण्याची जोखीम नको, म्हणून वेग वाढवत फुजीने त्यांना झपाट्याने मागे टाकले. फूजीने आघाडी क्षणाक्षणाला आघाडी वाढवत नेली. थोड्याच वेळात फुजी डॉ जितेंद्रने सांगितलेल्या वळणावर जाऊन थांबला. हळुवार एकेकजण येऊ लागले. आघाडी गेल्यामुळे अय्यरकाका चांगलेच वैतागले होते.


सगळे सायकलस्वार तिथे येईपर्यंत डॉ जितेंद्रही आलेच होते. एव्हाना जेमतेम १२.३० वाजले होते आणि ८० किमी अंतर पार झाले होते. श्विनचे मित्र गंधार कुलकर्णी आणि सुनील ननावरे ह्यांंच्याकडून श्विनला पंजाब आणि जम्मूतील संपर्क मिळाले होते. त्या संपर्कातून डॉ जितेंद्र संपर्कात आले होते. डॉ जितेंद्रने आमचे स्वागत केले. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील सायकलपटू अगदी पहिल्यांदा जरी भेटले तरी त्यांंचे बंध जुळायला वेळ लागत नाही. जितेंद्रही याला अपवाद नव्हते. प्रथमदर्शनीच आमचे सुर जुळले.

आता डॉ जितेंद्र आम्हाला मार्गदर्शन करत आघाडीवर होते. पाठोपाठ आम्ही सर्व होतो. सादुलशहरातील चौकात आमच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. जवळपास ३०-४० जण आमच्या स्वागतासाठी तिथे थांबले होते. आम्ही तेथे पोहोचताच एकच जल्लोष झाला. सर्व सायकलस्वारांचे तेथील लोकांनी कौतुक केले. जमलेली लोक आमची आपुलकीने विचारपूस करत होते.




त्यानंतर आम्ही नाश्ता करायला डॉ जितेंद्रंच्या दवाखान्याकडे गेलो. तिथेही बरेच जण आमची वाट पहात थांबले होते. आमचा जठराग्नी जागृत झाला होता. अर्थातच तिथे गेल्यावर लगेचच आमची सरबराई सुरू झाली. समोर आलेले पदार्थ पटापट संपवले जात होते. त्याच वेगाने ते पुन्हा येतही होते. पोटोबा शांत झाल्यावर आम्ही पुढील मार्गक्रमण करायला सज्ज झालो. डॉ जितेंद्र आमच्याबरोबर येणार असल्याने आता आम्ही निश्चिंंत होतो. डॉक्टर आता पुन्हा आघाडी सांभाळू लागले. त्यांंच्यापाठोपाठ आम्ही रांगेत जात होतो. २-३ किमी पार होताच आम्ही परत महामार्गाला लागलो. थोड्या वेळातच आम्ही त्या ठिकाणी पोचलो, ज्या ठिकाणी पोचणार म्हणून आमची उत्कंठा पहाटेपासून ताणलेली होती.... ती होती राजस्थान आणि पंजाबची सीमारेषा! तिथे पोहोचताच सगळ्या सायकलींचे लगाम खेचले गेले. राजस्थानमधील शेवटच्या रस्ते वाहतूक ठाण्याच्या कर्मचाऱ्यानेही आम्हा सायकलपटूंना पंजाब मधील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. राजस्थानमधील रोमांचक अनुभव, लोकांचे आदिरातिथ्य ह्यांंची शिदोरी घेत आम्ही राजस्थानचा निरोप घेत होतो.






४ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...