स्वामी विवेकानंद ह्यांच्या आवाजातील जादूबद्दल भगिनी क्रीस्टीन ह्यांनी सांगितलेला हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव.
विवेकानंद ह्यांचे भारताबद्दलचे प्रेम हे निर्विवादपणे पराकोटीचे होते. भगिनी क्रिस्टिन ह्यांनी वर्णन केलेले भारताचे वैभव अनुभवण्याची ओढ, कुतूहल माझ्या सायकलीच्या चाकांना आवाहन करत असतेच. भारताचे हे वैभव अनुभवायचे असेल तर मानवी इंधनाच्या साहाय्याने चालणारे सायकल हे दुचाकी वाहन ह्यापेक्षा उत्तम वाहन नाही. म्हणूनच एक सायकलप्रवास पूर्ण करत असतानाच पुढील सायकलप्रवासाचे वेध लागत असतात.
खरं पाहता सायकलवरून भारताची परिक्रमा करायची हा विचार नेमका कधी पक्का झाला हे नक्की सांगता येणार नाही. ती परिक्रमा सुरू करण्यामागे एक आवाहन होते हे मात्र नक्की. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद ह्यांचा जन्मदिनांक हा भारतीय क्रीडादिवस म्हणून ओळखला जातो. ध्यानचंद ह्यांचे खरे नाव होते ध्यानसिंग. मात्र ते रात्री चंद्रप्रकाशात हॉकीचा सराव करायचे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ध्यानचंद हे नाव ठेवले. ध्यानचंद ह्यांचा खेळ इतका अप्रतिम होता की नेदरलँड मध्ये त्यांच्या स्टिक मध्ये मॅग्नेट लावले असावे ह्या शक्यतेतून ती स्टिक तोडली होती.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी ग्रेगोरियन वर्ष २०१९ (म्हणजेच भारतीय राष्ट्रीय वर्ष १९४१) च्या क्रीडादिवशी ' फिट इंडिया ' ह्या संकल्पनेची मुहूर्तमेढ केली. त्यानिमित्ताने पंतप्रधान म्हणाले होते की जरी ही मोहीम सरकारने सुरू केली असली तरी नागरिकांनी ती पुढे नेली पाहिजे.
पंतप्रधानांचे हे आवाहन मनाला भिडले. ज्या देशाचे नागरिक सुदृढ (फिट) असतील तो देश सुरक्षित राहू शकतो. म्हणूनच पंतप्रधानांनी नागरिकांप्रती केलेले हे आवाहन पटले. ते पटल्यावर आपल्याला काय करता येईल याविषयी फार विचार करावाच लागला नाही. मनामध्ये त्याचे उत्तर तर तयारच होते...
सायकल चालवताना मिळणारा आनंद, त्याचा कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त फिटनेस देण्याचा लाभ, एकमेकांशी सहजपणे जोडला जाण्याचा अनुभव अशा अनेक गोष्टी मनात होत्याच. अर्थातच ही संकल्पना पुढे नेण्यासाठी सायकलचा उपयोग करायचा हे उत्तर लगेचच सुचले. कदाचित सायकल चालवत भारत परिक्रमा करणे हे मनात होतेच, पण आता त्याला निश्चित पार्श्वभूमी लाभली. ही संकल्पना सायकलद्वारे कशी पुढे न्यायची हेही सहजपणे सुचले.
ह्या अगोदर भारताच्या वेगवेगळ्या भागात सायकल चालवलेली होतीच. त्या मोहिमांद्वारे मुंबई ते कन्याकुमारी हे अंतरही आधीच पार केले होते. त्यामुळे ही संकल्पना राबवताना भारत परिक्रमा करावी हा विचार पक्का झाला होता. ह्या संकल्पनेतील पहिल्या मोहीमेदरम्यान २१ डिसेंबर २०१९ ते ७ जानेवारी २०२० मध्ये पुणे जम्मू हे जवळपास २१०० किमी अंतर आम्ही ११ जणांनी पूर्ण केले होते. त्या मोहिमेच्या अनुभवातून FIT INDIA संकल्पनेतील कन्याकुमारी चेन्नई अशी दुसरी मोहीम ग्रेगोरियन वर्ष २०२२ मध्ये आयोजित केली होती. ह्या जवळपास ११०० किमीच्या मोहिमेमध्ये १० सायकलपटू सहभागी झाले होते.
ह्या दोन्ही मोहिमांमध्ये माझी पत्नी मीरा त्याचबरोबर नयना आघारकर ह्या दोघीही सामील होत्या. बाकीचे साथीदार मात्र बदलले होते. दोन्ही मोहिमांमधील अनुभवलेले प्रदेश, दिशा, संस्कृती, भाषा, वेगवेगळे होतेच. मुख्य म्हणजे आलेले काही अनुभवही परस्परविरोधी होते. गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू मध्ये जाणवलेली आपुलकी, स्नेह, मोकळेपणा कन्याकुमारी ते चेन्नई मोहिमेदरम्यान लाभणे हा अपवाद असायचा. अर्थात गेल्या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चेन्नई येथील अनुभव सुखावह होता. ही एक जमेची बाजू होती.
खरतर एव्हाना भारताची पश्चिम सीमारेषेसह दक्षिण सीमारेषाही पूर्ण होत आली होती. आता भारताच्या पूर्व किनारपट्टीची साद ऐकू येऊ लागली होती.



Best luck Shashank.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाखूप छान!
हटवा