मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ७: रंगीत तालीम: कोलकाता चेन्नई सायकल सफर


ध्येय गाठायचे असेल तर सराव आवश्यकच. HDOR मुळे माझा वैयक्तिक सराव सुरू होताच. पण माझ्या दोन सहकाऱ्यांचे काय! मला त्यांच्या सरावाचीही काळजी वाटत होती. STRAVA ह्या APP वर संजयचा सराव फार जाणवत नव्हता. मग मी माझ्या सरावाचे आकडे 'काय आप्पा ' अँप वर टाकायला सुरुवात केली. दोघेही अंगठे देत होते... पण मला त्यांचे अंगठे नको होते. मला हवे होते त्यांच्या सरावाचे आकडे. संजयच्या बरोबर ह्याही आधी शतकी राईड झाल्या होत्या. मात्र माझ्या प्रमाणेच त्यांचेही सायकलवणे थांबले होते. मला मदत करणारा HODR त्यांच्या सोबत नव्हता. आनंदचा मला अंदाज नव्हता.

संजय, आनंद आणि मी अशी तिघांचीही एकतरी एकत्र सराव सफर होणे गरजेचे होते. त्यादरम्यान एकमेकांचा अंदाज येतो. कच्चे दुवे आणि बलस्थाने समजतात. खरतर ही एक रंगीत तालीमच.

कन्याकुमारी ते चेन्नई राईडच्या अगोदर आयोजित केलेल्या सरावसफरीला अनुपस्थित असूनही ज्यांना ती सफर करण्यासाठी परवानगी दिली अश्या एका सायकलपटुचा संघातील इतर सायकलपटुंबरोबर संपूर्ण मोहिमेत एकदाही ताळमेळ झाला नव्हता. तसे काही होऊ नये ही इच्छा होती. मात्र काहीना काही कारणाने तिघांची वेळ साधत नव्हती. मोहिमेचा दिवस मात्र जवळ येत होता. अखेरीस जेमतेम दोन आठवडे राहिले असताना ती संधी मिळाली.

खंडाळा घाट हा माझा आवडता मार्ग. त्यामुळे डोंबिवली तळेगाव राईड मला विशेष आवडते. तसेच मुंबई अहमदाबाद मार्गावरील तलासरी येथील वनवासी आश्रम शाळेला भेट देण्याचे मनात होते. मुंबई नाशिक महामार्गही बरेच दिवस खुणावत होता. मात्र कोलकाता चेन्नई मार्गात घाट नव्हते त्यामुळे घाट मार्गाच्या सरावाची गरज नव्हती. अहमदाबाद मार्गाची दुर्दशा झाल्याचे कळले. त्यामुळे हे दोन्ही पर्याय बाद झाले. नाशिक मार्गाचा विचार केला तर आनंद आम्हाला फार उशिरा सामील होऊ शकला असता म्हणून तो विचारही बाद केला.

इंदापूर आणि नामदेववाडी येथेही जायचे मनात होतेच. मग डोंबिवली ते इंदापूर असा सायकल प्रवास करून दुसरे दिवशी इंदापूर - नागोठणे - नामदेववाडी - वडखळ - डोंबिवली अशी दोन दिवसीय सराव मोहीम आखली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...