इंदापूर... माझी सासुरवाडी, तर नागोठणे - अलिबाग मार्गावरील नामदेववाडी येथे आनंदचे घर. त्यामुळे आम्ही सरावासाठी डोंबिवली इंदापूर नामदेव वाडी डोंबिवली असा मार्ग निवडला.
आम्ही तिघे तीन ठिकाणी राहणारे, त्यामुळे कळंबोली येथे भेटायचे ठरवले होते. मात्र आनंद नामदेवाडीला आधीच पोचला असल्याचे समजले. त्याचा सराव तिथे सुरू होता. संजय आणि मी कळंबोलीला भेटलो. दोघांची साधारण ३० किमी राईड झाली होती. मात्र दोघेही उत्साहात होतो. त्यामुळे आणखी थोडी राईड करून नाष्टा करायचे ठरवले. चौक फाट्याजवळ एक छानसे उपहारगृह मला माहित होते... चाय दोस्ती...
उपहारगृहाचे नाव आकर्षक आहेच शिवाय नाष्टाही इथे छान मिळतो. तिथे नाष्ट्यावर ताव मारून पुढे निघालो. पुढे वाटेत महामार्ग सोडून एक किमी वर महड गणपती मंदिर असल्याचे माहीत होतेच. वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी सायकलचे चाक आपोआपच वळले. येथील शांत परिसर आलेला थकवा क्षणात पळवून लावतो. महड गणपती हा अष्टविनायक दर्शनापैकी एक. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. सर्वसाधारणपणे मुंबई येथील सहल आयोजक महड येथून सुरुवात करतात. त्यांची सहल शुक्रवार ते रविवार असते. त्यामुळे इथे शुक्रवारी गर्दी असते. आम्ही मात्र शनिवारी इथे आलो होतो. त्यामुळे दर्शनही पटकन आणि समाधानकारक झाले.
महड गणपती मंदिरामागून पालीला जाण्यास रस्ता आहे. आम्ही तो मार्ग निवडला. आनंद नामदेववाडीहून निघून जांभूळपाडाजवळ आम्हाला भेटणार होता. मी आणि संजयने वेग घेतला. जांभूळपाड्याआधी असलेले सुधागड वैभव ह्या हॉटेलमध्ये जेवण अप्रतिम असते. त्यामुळे तिथे पोचल्यावर आनंदला फोन लावला. मात्र तो बराच लांब असल्याचे समजले. त्यामुळे तो ज्या ठिकाणी खोपोली पाली रस्त्याला लागणार होता तिथे जो आधी पोहोचेल त्याने बाकीच्यांची वाट पहायची असे ठरवले. मी गुगल वरून त्याचे लोकेशन पाहत होतो. आनंद पेण मार्गे पेडली गावाच्या पुढे खुरवले फाटा येथील हॉटेल अनिकेतपाशी आम्हाला भेटणार असे गुगल बाबा सांगत होते.
मी आणि संजय त्या चौकात पोचलो. तेथील अनिकेत हॉटेलमध्ये शिरलो तोपर्यंत भूक कडकडून लागली होती. आनंद आल्यावर एकत्रच जेऊ म्हणून आधी चहा घेतला. वेळ पुढे सरकत होता. पोटातील कावळे फारच कावकाव करू लागले होते. तिथे जेवण मिळत नसले तरी मिसळ मिळत होती. अर्धा तास वाट पाहून आम्ही मिसळ खाल्ली तरी आनंदचा पत्ता नाही. एका जागी थांबून सायकली आळसावल्या होत्या. त्यांना थोडे फिरवणे गरजेचे होते. आम्ही आनंदच्या दिशेने निघालो, मात्र रस्त्याची अवस्था पाहून संजय परत हॉटेल अनिकेतकडे वळले. मी मात्र त्या कच्च्या रस्त्याने आनंदचे स्वागत करायला निघालो.
४ - ५ किमी पुढे गेल्यावर आनंद समोरून येताना दिसला. आम्हाला डोंबिवली/ ठाण्याहून यायला वेळ लागेल म्हणून त्याने पेणहून आडमार्गाने आम्हाला येऊन भेटायचे ठरवले होते. आम्हाला तिघांनाही असेच वाटले होते की कदाचित आनंदला जांभूळवाडीला येऊन आमची वाट पाहावी लागेल. मात्र इथे उलटेच घडले होते....
पेण कावळे डॅम रोड खुरवले फाटा येणाऱ्या ह्या रस्त्याने आनंदची आणि त्याच्या सायकलची चांगलीच सराव परीक्षा घेतली होती. अर्धा कच्चा रस्ता, त्यातही बरेच चढउतार असलेल्या रस्त्याचे गणित आनंदने सोडवले खरे पण त्याची वाट पाहण्याची आमचीही परीक्षा झाली होती.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा