बंगालच्या उपसागराची साद ऐकू येत होती. चेन्नई पुन्हा एकदा खुणावत होती. संस्कृती, इतिहास ह्यांचा वारसा लाभलेले हे शहर बिचसाठीही प्रसिद्ध आहे. येथील मरिना बीच भारतातील सगळ्यात जास्त लांबीचा बीच आहे.
पश्चिम किनारपट्टीला लाभलेले सह्याद्री पर्वतरांगांचे वैभव, संरक्षण मात्र पूर्व किनारपट्टीला लाभले नव्हते. पश्चिमेप्रमाणे एकच पावसाळा न लाभता इथे पावसाचे दोन ऋतू पहायला मिळतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे एक पावसाळा इथे असतोच. ह्याशिवाय ईशान्येकडून येणारे वारे हिवाळ्यातही इथे पावसाळा अनुभवण्याची संधी देतो.
सायकल सफर आखताना हवामानाचा अंदाज घेणे महत्वाचे ठरते. कन्याकुमारी चेन्नई सायकल प्रवास करत असताना धनुष्कोडीपासून अरीचल मुनाई ह्या चार पाच किमीच्या अंतरात आडवा उभा पाऊस झोडपत होता. तेव्हा मजा घेता आली होती. मात्र त्यावेळी सायकलवण्याचा प्रयत्न अगदीच केविलवाणा होत होता. ह्यावेळी पुन्हा पूर्व किनारपट्टीवरच सायकल चालवायची होती. त्यामुळे पुन्हा एकदा ईशान्य मोसमी वाऱ्याचा लहरीपणा झेलण्याची तयारी ठेवावी लागणार होती. त्याचप्रमाणे एकंदर दिवसांचे गणित जमवायचे होते.
प्रवासातील टप्पे आखताना शहरेच नव्हे तर मार्गही पूर्ण अनोळखी असणार होता. मुंबईमध्ये राहताना पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारतीय लोकांशी जेवढा संबंध आला होता तेवढा संबंध पूर्व किनारपट्टीतील राज्यातील लोकांशी फारसा आला नव्हता. माझ्यासाठी पूर्व किनारपट्टीच नव्हे तर येथील लोक, राहणी, संस्कृती एवढेच नव्हे तर अर्थव्यवस्था देखील कुतूहलाचा विषय होती.
चेन्नई ते कोलकाता हे एकंदर अंतर जवळपास १७००+ किमी होते. तर चेन्नई ते पुरी, भुवनेश्वर अथवा कोणार्क हे अंतरही सहस्र किमीपेक्षा जास्त असणार होते. त्यामुळे एका वेळी सुट्टी घेऊन थेट कोलकाता गाठायचे की यंदा पुरी, भुवनेश्वर अथवा कोणार्क गाठून परत मुंबई गाठायची ह्याबद्दल मनात बरेच महिने गोंधळ सुरू होता.
प्रवासाचे एक टोक चेन्नई असणार असले तरी दुसरे टोक कोणते हे नक्की होत नव्हते. एकंदर दिवस, अंतर ह्यांचा मेळ घालता घालता वेळ मात्र पुढे सरकत होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा