तीन जणांचा संघ तयार झाला खरा. तिघेहीजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. आमची एकत्रित भेट घडणे आवश्यक होते. अश्यावेळी स्वाभाविकपणे एक नाव आठवले.
' जितेन्द्र, रविवारी ऑफिस मध्ये असशील का? '.... मदतीसाठी कायम तत्पर असणारा जितेंद्र ह्याही वेळी मदतीला धावून आला. आमच्या तिघांची मीटिंग ठरली ती जितेंद्रच्या ऑफिसमध्ये. रविवारच्या दिवशी आम्हा तिघांबरोबर यजमानपद सांभाळत जितेंद्र हजर होताच. शिवाय जितेंद्रच्या सांगण्यानुसार कोपरीहून खोपटला त्याच्या ऑफिसमध्ये आमच्यासाठी नाष्टा घेऊन मंगेश कोळीनेही उपस्थिती लावली. आमचा संघ खरच तीन जणांचाच होता का!
जितेंद्र, रमेश काका, पुष्कर, सुमित हे आणि असे इतरही काही मित्र अशा सफरींना बरोबर असावेत ही मनापासून इच्छा होती. मात्र इतर कामांच्या प्राधान्यक्रमामुळे ते आमच्या बरोबर येऊ शकत नव्हते.
आमचे तिघांचे जाण्या येण्याचे रेल्वेचे आरक्षण करताना कोलकाता येथून परत येण्याचे सोयीचे आरक्षण मिळत नव्हते. मग मी मार्गच बदलला... चेन्नई ते कोलकाता ऐवजी आम्ही आता कोलकाता ते चेन्नई प्रवास करण्याचे ठरवले. आमचे तिघांचे रेल्वेचे आरक्षण तर आम्ही केलेच पण सायकलींचे काय?
जितेंद्रच्या ऑफिसमध्ये असताना courier ने सायकल पाठवता येऊ शकते ह्याचाही अंदाज आला.
सायकल पाठवण्यासाठी रेल्वे, कुरिअर, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर किंवा थेट विमान असे अनेक पर्याय समोर येत होते. विमान कंपन्या आधी खर्च सांगायलाच तयार नव्हत्या. तो कळणार होता थेट प्रवासाच्या दिवशी सायकल घेऊन गेल्यावर. रस्ता मार्गे कुरिअर किंवा ट्रान्सपोर्ट ऑपरेटर तर्फे सायकल पाठवण्याचा पर्याय कमी अडचणींचा वाटत होता. मात्र कुरिअर कंपनीनेच आम्हाला सल्ला दिला की रस्तामार्गापेक्षा रेल्वेने सायकल सुरक्षितरित्या जाऊ शकतात. त्यामुळे रेल्वे ह्या पर्यायावर आम्ही येऊन थांबत होतो.
मात्र त्यासाठी CST स्टेशन वर जाऊन चौकशी करावी लागणार होती. संजय ह्यांनी हे काम स्वीकारले. .


छान सुरु आहे कथन...स्वतः यात भाग घेतल्या मुळे पुढची उत्सुकता वाढली आहे.
उत्तर द्याहटवासंजयजी आपलेही अनुभव कळवा ही विनंती!
हटवा