साहाय्य वाहन, sponsorship ह्यासाठी शोध सुरू होताच. मला sponsorship केवळ आर्थिक मदतीसाठी नव्हे तर नवीन संस्थांशी संबंध जोडण्यासाठी हवी होती. आर्थिक मदत झाली तर हवी होती पण तो मुख्य उद्देश नव्हता. काही संस्थांशी त्यासाठी संपर्क साधला होता. मात्र त्याचा फॉलो अप करण्यासाठी वेळ मिळतच नव्हता.
Sponsor मिळाला की त्यांचे नाव टाकलेला जर्सी बनवून घ्यायचा असे ठरवले होते. कोणत्याही संस्थेकडून होकार मिळत नसताना मोहिमेचा दिवस मात्र जवळ येत होता. जर्सी बनवण्यासाठी वेळ कमी उरला होता. डोंबिवली सायकल क्लबमधील मित्र रुधिर मोघे, माझी आहारतज्ज्ञ डॉ अर्चना नाईक, पनवेलमधील सायकल मित्र पवन चांडक ह्यांच्याकडे जर्सी बनवणाऱ्या लोकांची चौकशी केली. त्यांनीही लगेचच कळवले. मात्र त्यांना गाठायला वेळ मिळत नव्हता. साहिर शेख इथेही मदतीला आला. मात्र तो तयार असलेली जर्सी देऊ शकत होता. मला आमच्या कोलकाता चेन्नई राईड साठी विशेष जर्सी हवी होती. अशी जर्सी संघभावना निर्माण करते तसेच रस्त्यातील लोकांना जर्सी पाहताच आमच्या राईडचा उद्देश कळणेही आवश्यक होते. हितेन राणेंनी एक संपर्क क्रमांक दिला.
चिंचपोकळी येथील पांडुरंग निकम! प्रत्यक्ष जायला वेळच नव्हता. 'काय आप्पा' मदतीला आले.... म्हणजे WhatsApp बर का...! निकम ह्यांना फोन आणि WA द्वारे जर्सी बद्दल कळवले. रेल्वे चौकशीप्रमाणेच जर्सीसाठीही संजयने धावपळ करण्याची जबाबदारी घेतली. निकम ह्यांनी जी किंमत सांगितली ती ऐकून खरतर धक्काच बसला.. इतक्या कमी किमतीत जर्सी मिळेल ह्याची कल्पनाच नव्हती. मी परत एकदा हितेन ला फोन लावला आणि खात्री करून घेतली.
निकमांनी अतिशय कमी वेळात, अत्यंत किफायतशीर दरात खूप चांगली जर्सी उपलब्ध करून दिली.
जर्सी चे design आल्यावर एक गोष्ट लक्षात आली जर्सी वर RALLY असा शब्द आला होता. पण आम्ही रॅली काढणार नव्हतो. तर आमची एक राईड/ सायकलसफर असणार होती. निकमांना तसे कळवले. त्यांनी लगेचच बदल करून दिला..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा