सायकली CST येथील पार्सल ऑफिस मध्ये जमा करायच्या होत्या. मला आणि संजयला ते ऑफिस, तेथील कारभार, परिस्थिती आता ओळखीची झाली होती. मनोज हा मूळ दादरकर. त्याचे एक घर दादरला होतेच. त्यामुळे तो त्याच्या सायकलसह आधीच दादरला पोचला होता. तर संजयने पुण्याहून ठाण्याला सायकल आणून ठेवली होती. मी आणि संजय त्याला दादर येथे भेटून मग तिघांनी एकत्र CST ला सायकली चालवत जायचे ठरवले. आमच्या सायकली व्यवस्थित पॅक करण्यासाठी मदत करायला मी सुमितला सांगितले होतेच. सुमितने अगदी तत्परतेने होकार कळवला होता.
मी डोंबवलीहून घरून निघून ऐरोली मुलुंड लिंक रस्त्याने पूर्व द्रुतगती मार्गावर संजयला भेटायचे ठरवले होते. मात्र माझा सूर्य थोडा उशिरानेच उगवला. त्यामुळे मी शीळ फाट्याहून वाशिमार्गे जातो असे कळवले. माझा आयरोलीचा वळसा वाचला तर आम्ही वेळेची थोडी कसर भरून काढू शकत होते. मोहिमेच्या कल्पनेने फुजी खूष होतीच. त्यामुळे ती मला चांगली साथ देत होती. आम्ही लवकरच संजयला आणि मग पुढे दादर येथे मनोजला भेटलो. संजय ठाण्याहून सायकल चालवत आला होता.
आमच्या रपेटीची मनोजला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने लगेचच क्षुधाशांतीबद्दल विचारले. पोटात कावळे ओरडायला लागले होतेच. त्यामुळे मी आणि संजयने वेळ न दवडता होकार दिला. मनोज दादरकर असल्याने त्याला तेथील चांगलीच माहिती होती. मनोज आम्हाला घेऊन दादर TT circle जवळील ' जोशी बुढाकाका माहीम हलवावाला ' कडे वळला. आम्ही थोडे थांबूनच दुकानाकडे पाहिले. वेळ मारून नेता येईल इतपत चांगले खाद्यपदार्थ तिथे मिळतील असे आम्हाला वाटत होते. आम्ही दुकानात शिरल्यावर तेथील खाद्यपदार्थ विचारत थोडा अंदाज घेत होतो. दुकानदार अतिशय आपुलकीने विचारत होता. तिथे बरेच पदार्थ दिसत होते. दुकानदाराने मात्र अतिशय नम्रपणे मात्र आग्रहाने वेगवेगळे पदार्थ घ्यायला सुचवत होता. त्याचे नाव होते निर्भय!
त्याचा प्रसन्न चेहरा, मैत्रीपूर्ण वागणूक आणि शांत स्वभाव ह्यामुळे आम्ही त्याच्या सूचनेनुसार आम्ही एकेक प्रकार चाखून पाहू लागलो. सगळेच पदार्थ उत्तम प्रतीचे असल्याची खात्रीच झाली. तेथील मिठाया तर अप्रतिम होत्या. दुकानाकडे बाहेरून बघताना आम्ही केवळ वेळ मारून नेण्याचा विचार करत होतो. मात्र आम्हाला चक्क मेजवानीचा लाभ मिळत होता. निर्भयला आमच्या मोहिमेची माहीत देत आणि त्याचे विशेष आभार मानत आम्ही CST कडे निघालो.
पार्सल ऑफिसचे सोपस्कार पार पाडत असताना सुमितही तिथे आलाच. मग तर आम्ही अगदीच निर्धास्त झालो. सुमितने सांगितलेले पॅकिंग मटेरियल मी घेऊन गेलो होतोच. सुमितने आता सायकलींचा ताबा घेतला. तीनही सायकली व्यवस्थित सजवून आम्ही त्यांना पार्सल ऑफिस मध्ये जमा केले. त्यानंतर आम्ही थोडे निवांत झालो. अर्थातच माझी पावले त्यानंतर ' शिवाला ' कडे वळली. संजय आणि सुमितला ते माहित होतेच. ' शिवाला ' च्या बिर्याणीने मला तीन दशकांपूर्वी दोन वर्षे पोसले होते. आजही ' शिवाला 'ची चव रसनेची तृप्ती करत होती. मी जर काही मिस करत होतो तर ते होते तीन दशकांपूर्वी तेथील गल्ल्यावर मिळत असलेले मसाला पान. गेली अनेक वर्षे त्यांंनी ती प्रथा बंद केली होती.
अखेरीस तिथे पान न घेताच आम्ही फोर्ट मार्केटला गेलो. तिथे थोडी राहिलेली खरेदी करत मी आमच्या मोहिमेची पूर्वतयारी पूर्णत्वाला गेल्याची खात्री करून घेतली.
(LUGGAGE V/S PARCEL
जेव्हा आपण ट्रेनने जाणार असतो आणि आपल्याच गाडीने आपल्या सायकली न्यायच्या असतात तेव्हा त्या रेल्वेच्या दृष्टीने LUGGAGE मध्ये असतात. त्यासाठी आपल्याला आपल्या गाडीच्या वेळेच्या बऱ्याच आधी जावे लागते. मुख्य म्हणजे आपले पक्के reservation आधी करावे लागते. ते reservation तिकीट दाखवून त्यानुसार सायकली luggage बोगीतून आपल्या गाडीनेच प्रवास करतात.
मात्र जेव्हा आपण प्रवास करणार नसतो, फक्त सायकली गाडीने पाठवायच्या असतात तेव्हा रेल्वेच्या दृष्टीने त्या पार्सल सेवेचा भाग असतात. पार्सल केलेल्या सायकली त्या दिवशी किंवा नंतरच्या दिवशीही पाठवल्या जाऊ शकतात. त्या कोणत्या गाडीने पाठवल्या जातील ह्याबद्दल आपल्याला त्या पार्सल ऑफिसमध्ये जमा करताना कळत नाही. मात्र जेव्हा त्या एखाद्या गाडीत ठेवल्या जातात तेव्हा आपल्याला रेल्वेकडून मेसेज येतो. तसेच त्या गंतव्यस्थानी उतरल्यावरही आपल्याला मेसेज येतो. त्या उतरवल्यावर विशिष्ट वेळेत आपण त्या रेल्वेकडून न घेतल्यास आपल्याला जादा चार्ज लागू होतो)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा