मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

सफरचंदाची सफर

TJSB House हुन निघताना उशीर झाल्यामुळे क्षुधाशांती न करता मी आणि श्विन निघालो. मात्र रघुनाथनगर मार्गे माजीवाडा नाक्याला जाणाऱ्या मार्गाला लागताच पाऊचमधील सफरचंद उजव्या हातात घेत आणि डाव्या हाताने श्विनला सांभाळत प्रवास सुरु ठेवला. श्विन ही पाश्चिमात्य बनावटीची असल्याने डाव्या हातात पुढचा ब्रेक होता. त्यामुळे सफरचंद खाताना श्विनची गती फारच संथ ठेवली होती. क्षुधाशांती होईतो कॅडबरी चौक आला. तेथे सरळ जायला लाल बावटा असल्याने उजवीकडचा सेवा रस्ता गाठला आणि मार्गक्रमण सुरु ठेवले.
ठाणे नाशिक महामार्गावर खारेगाव पूल सोडल्यावर श्विन वारा पिऊ लागली. वाहतूकही सुरळीत सुरु होती. ओवळी गावपुढील खिंडी पुढील उतार सुरु होताच श्विनचा वेग अधिकच वाढला. मात्र रांजनोली चौकाच्या साधारण १ किमी आधी मात्र अश्वशक्तीधारी वाहने रेंगाळत होती. खोखोचा खेळ खेळत श्विन मार्ग काढत होती. अश्वशक्तीधारी वाहनांनी रस्ता डाव्या कडेपासून दुभाजकापर्यंत पूर्णपणे व्यापला होता. अखेरीस दुभाजक ओलांडून श्विनने रस्त्याची उजवी बाजू पकडली.
अश्वशक्तीधारी वाहने मात्र इतकी अडकली होती की श्विनने कल्याणच्या दिशेने जवळपास अर्धा किमी अंतर गाठले तरी मागून एकही वाहन येऊ शकले नाही. रांजनोली चौकाच्या आधी आणि नंतर असे एकंदर १ किमी अंतर गाठायला श्विनला ५ मिनिटे लागली तरी अश्वशक्तीधारी वाहनांना मात्र किमान १५-२० मिनिटे लागत होती.
सुदैवाने कोनगाव आणि दुर्गाडी पूल येथे मात्र रस्ता चक्क इतका मोकळा होता की मनात असत तर श्विन रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आणि परत डावीकडे फिरत फिरत पूल ओलांडू शकत होती. या संधीचा फायदा घेत श्विन चटकन दुर्गाडी किल्ला गाठला. दुर्गाडी पुलावर गर्दी नसल्याचा श्विनला इतका आनंद झाला की पुढे गोविंदवाडी बायपासवरील १८ गतिरोधकांची अडथळ्यांची शर्यतही श्विनने आनंदाने पार केली.
#dombivlicyclingclub #tjsbbank #cycle2work

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...