शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

महामार्ग ते जंगल -एक प्रवास : डोंबिवली पणजी सायकलसफर लेख ११

पहाटेच्या वेळी आम्ही तयार होत होतो, तोच आमच्यासाठी वाफाळलेला चहा हजर होता. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या श्विन आणि स्कॉटला पाहण्यासाठी संदीपची पत्नी उत्सुक होती. त्यामुळे आम्ही घरातून निघालो तेव्हा संदीप आणि त्याची पत्नीही पार्किंग मध्ये आले. स्कॉट आणि श्विनचे सामान एकाच सॅकमध्ये सामावलेले होते. ती सॅक श्विनच्या कॅरियरला ट्युबने बांधून टाकली. अद्याप पूर्ण अंधार असल्यामुळे हेडलाईट ही लावला. श्विन आणि स्कॉटची ही तयारी पाहत संदीप आणि त्याची पत्नी यांच्याबरोबर गप्पाही सुरु होत्या.
स्कॉट आणि श्विनला साथ देण्यासाठी संदीपही त्याच्या नवीन सायकलसह निघाला. रस्त्यावर बराच अंधार होता. पथदिवेही लागलेले नव्हते. त्यामुळे तिघंही एका रांगेत संथपणे जात होते. अंधारामुळे श्विन स्कॉटला आजूबाजूचा परिसर न्याहाळता येत नव्हता. मात्र संदीपबरोबर असल्याने तो कोल्हापूरबाहेर पडण्याचा रस्ता तो दाखवणार होता, त्यामुळे त्याच्या मागोमाग श्विन स्कॉट निःशंकपणे जात होते. 

थोड्या वेळातच मागून आणखी दोन सायकल पटूंनी आम्हाला गाठले. एवढ्यात एक चढ सुरु झाला. त्या दोघांबरोबर गप्पा मारत श्विनने वेग घेतला. पाठोपाठ स्कॉटही होती. संदीप बऱ्याच वर्षांनी नव्यानेच सायकलिंग सुरु करत होता. तो थोडा मागे पडला. त्याबरोबर त्याने श्विनला हाक मारली. ते दोन नवीन सायकलपटू श्विन स्कॉटला पुढे मार्ग दाखवणार होते, ही खात्री होताच संदीप परत निघाला. ते दोघे सायकल पटू होते डॉ प्रदीप कुलकर्णी आणि रामनाथ चोडणकर. त्या दोघांनाही ३ फेब्रुवारी २०१८ ला ठाणे येथील सायकल मित्र संमेलनाची माहिती देऊन संमेलनाला यायचे निमंत्रणही श्विनने दिले. काही वेळातच त्यांचे गंतव्यस्थान आल्यावर कोल्हापूर बेळगाव महामार्गाची दिशा दाखवून त्यांनी निरोप घेतला. 

एव्हाना चांगलेच उजाडले होते. महामार्गाच्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद असला तरी त्यावर वाहतूक अजिबातच नव्हती. आजूबाजूला वस्ती, बांधकामही दिसत नसल्याने निसर्ग मुक्त हस्ते उधळण करत होता. मोकळ्या हवेचा आनंद घेत श्विन आणि स्कॉट लवकरच कोल्हापूर बेळगाव महामार्गाला लागले. थंड हवेमुळे दोघेही उल्हसित झाले होते. महामार्ग गाठल्यावर श्विन स्कॉट एका पेट्रोल पम्पपाशी थांबले, इतक्यात आणखी दोन सायकलिस्टसनी त्यांना गाठले. सकाळच्या प्रहरी ते महामार्गावर रपेटीला निघाले होते. वयाच्या जेमतेम सहा-सातव्या दशकातील ते युवक होते  अविनाश बोकील आणि वसंत घाडगे. श्विन स्कॉटच्या गोवा सफरीबद्दल ऐकताच तेही उत्साहाने बोलू लागले. स्कॉट, श्विन सह महामार्गावर रपेट करत असताना कोल्हापूर येथील नवीन सहकारी त्यांनी केलेल्या सफरीबद्दलही सांगू लागले. कोल्हापूर येथील ५-६ जोडपी लेह येथे सायकलसफारीला जाऊन आले होते. त्यातीलच एकजण कोल्हापुरातील नवीन भेटलेल्या सहकाऱ्यांमध्ये आम्हाला भेटला होता. त्यांनी दिलेल्या चहापानाचे निमंत्रण स्वीकारून त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता त्यांच्या लेह सायकलसफरीदरम्यानचा खजिना श्विन स्कॉटसमोर उलगडत होता. त्यांनी काढलेले फोटो पाहून श्विन स्कॉट हरखून जात होते आणि आमचे नवे सहकारी त्यांचा अनुभव सांगत आणखी खुलून जात होते. दरम्यान काळ नावाचे चक्र मात्र फिरतच होते. ते फोटो पहाता पाहता श्विनला पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या 'मी आणि माझा शत्रुपक्ष' या कथांची आठवण येत होती. वास्तविक ते अनुभव ऐकणे आणि लेहमधील सौंदर्य कोल्हापुरातील महामार्गावर फोटोद्वारे पाहणे ही पर्वणी होती. मात्र वेळेची मर्यादा होती. शिवाय कोल्हापूर- बेळगाव महामार्ग सोडून आज आजरामार्गे आंबोलीला पोचायचे होते. खरतर श्विनच्या मनात सावंतवाडी गाठावे असेच येऊ लागले होते. मात्र आजरा आंबोली रस्ता अरुंद आणि जंगलातील असल्याचे ऐकले होते. त्यामुळे लवकरात लवकर आंबोली गाठायचे ठरवल्याने श्विन स्कॉट वेळेकडे बघू लागले. अर्थातच चोडणकर आणि बोकील हेही सायकलिस्टच असल्याने त्यांनाही वेळेची मर्यादा चांगलीच माहित होती. त्या दोघांनाही दुसरे सायकल मित्र संमेलनाचे निमंत्रण देऊन श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.

महामार्गावरील उत्तम दर्जाच्या आणि रुंद रस्त्याचा फायदा घेत श्विन आणि स्कॉटने चांगलाच वेग गाठला होता. कागल झपाट्याने मागे पडले, मात्र पुढे कागणोली टोल, अडीमलाई उड्डाण पूल येथे मात्र वेग मंदावला. कोगणाली पार करताच महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश केला होता. कोल्हापूर सोडून बराच वेळ झाला होता. नाश्ता करण्यासाठी टेहेळणी करत श्विन स्कॉट जाऊ लागले. मात्र मुख्य महामार्गाला लागून हॉटेल दिसत नव्हती. निपाणीकडे जाणारा रस्ता दिसू लागल्यावर श्विन स्कॉट सेवा रस्त्याला लागले. जवळच एक हॉटेल दिसल्यावर मात्र दोघांनी तेथे मोर्चा वळवला. एव्हाना गाठलेल्या अंतरामुळे आज आंबोली ऐवजी थेट सावंतवाडी गाठू असा विश्वास श्विनला वाटू लागला. खरंतर मूळ बेत आंबोलीचाच होता. मात्र सकाळी मिळालेला वेग, चांगला रस्ता आणि चोडणकर - घाडगे यांनी 'तुम्ही सावंतवाडीला पोचू शकाल' हा दिलेला विश्वास या जोरावर श्विनला संध्याकाळपर्यंत सावंतवाडीला मुक्कामी पोचण्याचे लक्ष्य दिसू लागले. नाश्ता झाल्यानंतर श्विन स्कॉटने पुन्हा प्रवास सुरु केला. सुरुवातीला संथ वेग राखल्यावर श्विनने वेग वाढवायचा प्रयत्न केला, मात्र स्कॉटचा वेग वाढत नव्हता. कर्नाटकातील सुरुवात त्रासदायक ठरत होती. श्विनने आपण वेग वाढविल्यास सावंतवाडीही गाठू शकतो असे स्कॉटला सांगितले. मात्र स्कॉटला अचानक त्रास होऊ लागला. तरीही निग्रहाने स्कॉटने पेडलिंग सुरूच ठेवले. त्रास होत असल्याने वेग मात्र खूपच मंदावला. श्विनने एकंदर परिस्थिती लक्षात घेता विसावा घ्यायचे ठरवले. त्रास होत असताना तसेच पेडलिंग करत राहिले तर तो त्रास वाढत जाण्याची शक्यता होती. दोघेही रस्त्याच्या कडेला थांबले. अश्या वेळी श्विन रस्त्याच्या कडेला हेल्मेट ठेवून त्यावर डोके ठेवून आडवे होत असे. श्विनने स्कॉटलाही तसेच करायला सांगितले. रस्त्याकडेला असे आडवे होण्याची कल्पना स्कॉटला रुचली नसली तरी आता पर्याय नव्हता. शेवटी स्कॉटने तोच पर्याय निवडला. थोडा वेळ आराम केल्यावर स्कॉटने पुन्हा पुढे जायची तयारी दाखवली. मात्र अजुनही स्कॉटला वेग घेता येत नव्हता. एव्हाना घड्याळबाबा मात्र धावत होते. एकंदर स्थिती पाहता सावंतवाडी, आंबोली तर दूरच आजरा गाठणेही श्विनला कठीण वाटू लागले. स्कॉट प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती मात्र तिचा वेग फारच मंदावला होता. थोडे अंतर ठेवत श्विन पुढे निघाली आणि तवंडीचा घाट दिसू लागला.

घाट दिसू लागताच श्विनला स्कॉटची काळजी वाटू लागली. मात्र घाटाची लांबी जेमतेम २-२.५ किमी असल्याने घाट चढताना न थांबता थेट घाट चढल्यावरच स्कॉटची वाट पाहायचे श्विनने ठरवले. श्विनने घाट अतिशय मजेत पार केला. घाटमाथ्यावर पोचल्यावर आजरा-आंबोली- गोवा कडे उजवीकडे वळायचे होते, तर सरळ जाणारा महामार्ग बेळ्गावकडे जात होता. घाट चढल्यावर श्विनला एकदम प्रसन्न वाटत होते. मात्र स्कॉटची एकंदर परिस्थिती पाहता स्कॉटला हा घाट चढून यायला अजून १५-२० मिनिटे लागतील असा श्विनचा अंदाज होता. त्या अंदाजाने श्विनने छायाचित्रणाची हौस भागवायचे ठरवले. मात्र श्विनच्या पाठोपाठ अवघ्या ३-४ मिनिटात घाट पार करत स्कॉट घाटमाथ्यावर पोचली.

आधीचा स्कॉटला झालेला त्रास, घाटातील चढण हे लक्षात घेता श्विनने येथे विसावा घ्यायचे ठरवले. तेथे थंड पेय घेत असताना वाटेत थांबलेले पर्यटक श्विन स्कॉटची चौकशी सुरु केली. तेथे गप्पा मारत उभे असताना वाहणाऱ्या वाऱ्यामूळे श्विन स्कॉटचा थकवा पार पळून गेला. तवंडी घाट चढेपर्यंतचा प्रवास प्रशस्त आणि गुळगुळीत महामार्गावर झाला होता मात्र यापुढचा प्रवास त्यामानाने अरुंद रस्त्यावर होणार होता. या मार्गावर खड्डेही असणार होते. मात्र स्कॉटचा उत्साह वाढला होता. अद्यापही सावंतवाडी गाठण्याचे लक्ष्य श्विनला खुणावत असले तरी आता त्यासाठी श्विनकडे राखीव वेळ नव्हता.  दिवसभर प्रवास करायचा असेल तेव्हा एकंदर प्रवास जेवढ्या वेळेत करायचा असेल त्यातील दोन तास राखीव ठेवून उरलेल्या वेळातच ते अंतर कापण्याचे नियोजन श्विन करत असे. म्हणजे काही अडचणी येऊन वेळ गेला तरी ते दोन तास उपयोगात येऊन सूर्यास्तापूर्वी दिवसभराचा प्रवास पूर्ण करता येत असे.

सकाळी स्कॉटला झालेला त्रास, कमी वेग यात तवंडी घाट चढेपर्यंतच हे राखीव दोन तास उपयोगात आले होते. त्यामुळे आजचा नियोजित टप्पा म्हणजे आंबोली लवकर गाठून राखीव वेळात सावंतवाडी गाठायचे तर जवळपास विना थांबा किंवा कमीत कमी थांबा घेत प्रवास करावा लागणार होता. स्कॉटने आजरा- आंबोलीच्या दिशेने जोमात सुरुवात केली. त्या पाठोपाठ श्विननेही वेग पकडला.

थोड्याच वेळात अलूर नावाचे गाव लागले. स्कॉट थोडी मागे पडली होती. म्हणून श्विनने थांबा घेतला आणि जलपान सुरु केले. त्या छोट्या गावातील जाणाऱ्या अरुंद रस्त्यातील गावकरी श्विनकडे कुतूहलाने पाहत होतेच. त्यात बालगोपाळांचा चमूही होता. श्विनने त्या बालगोपालांशी संवाद साधायचे ठरवले. कर्नाटकमधील हे गाव महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत होते. श्विनने अर्थातच मराठीत संवाद सुरु केला. कुतूहलाने पाहणाऱ्या त्या बालगोपाळांना सेल्फी साठी आमंत्रण दिल्यावर सर्वजण खुश झाले. लगेचच स्कॉटही तेथे पोचली. सगळ्यांबरोबर गप्पा मारत श्विनने बालगोपाळांना आपलेसे केले होते. दिवाळी जवळ आली असल्याने सगळ्या मुलांनी किल्ला बनवला होता. तो सध्या पडद्याआड होता. मात्र त्या मुलांशी मैत्री संपादन केल्यामुळे त्या मुलांनी किल्याचेही छायाचित्र काढण्याचे आमंत्रण श्विनला दिले. श्विनने आनंदाने ते निमंत्रण स्वीकारले. किल्ला छानच बनवला होता. श्विनने त्या किल्ल्याचे छायाचित्र घेताच सगळे सवंगडी आनंदित झाले. सर्व मित्रांचा निरोप घेत श्विन स्कॉट पुढे निघाले. थोड्याच वेळात श्विन स्कॉट पुन्हा महाराष्ट्राच्या सीमेमध्ये परतले. मात्र लगेचच पुन्हा कर्नाटक सीमा आणि मग परत एकदा महाराष्ट्र सीमा श्विन स्कॉटला पार करावी लागली. थोडक्यात आज दोन वेळा कर्नाटक पार करून तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या भूमीत श्विन स्कॉट प्रवेश करत होते. थोड्याच वेळात बहिरेवाडी गाव लागले. स्कॉट पुढे निघून गेली होती. रस्त्यापासून डावीकडे एक शाळा श्विनला दिसली. शाळा रस्त्यापासून थोडी लांब होती. आवार खूप मोठे होते. त्या आवारात अनेक सायकली उभ्या असलेल्या श्विनला दिसल्या. साहजिकच श्विनचे कुतूहल चाळवले. एवढ्यात शाळेच्या इमारतीतून एकजण येताना दिसला. तो येईपर्यंत श्विनने वाट पाहिली आणि शाळेत सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी तेथे सायकलने येत असल्याचे ऐकून श्विनला आनंद झाला. त्या विद्यार्थ्यांनाही ठाणे येथे आयोजित होणाऱ्या सायकल संमेलनाचे निमंत्रण देण्याचे श्विनच्या मनात आले. मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील छोट्याश्या गावातून इतक्या दूरवर त्या विद्यार्थ्यांना येणे सहजसोपे नसल्याची जाणीव असल्याने श्विनने तो विचार बाजूला ठेवला आणि त्या विद्यार्थ्यांना केवळ शुभेच्छा देऊन श्विनने पुढील प्रवास सुरु केला.

स्कॉटला या सर्व घटनेची कल्पना नसल्याने स्कॉट मात्र बऱ्याच पुढे निघून गेली. श्विनने वेग वाढवत स्कॉटला गाठले. स्कॉटची वाटचाल संथ, संयत मात्र ठामपणे चालली होती. आता महामार्गाचा वेग मिळत नसला तरी निसर्गाची उधळण पाहायला मिळत होती. त्याचा आनंद घेत स्कॉट श्विन जात होते. मात्र जठराग्नी जागृत होऊ लागला होता. सकाळी नाश्ता झाल्यावर बराच वेळ झाला होता आणि अंतरही बऱ्यापैकी पार झाले होते. मात्र योग्य हॉटेल वाटेत दिसत नव्हते. दरम्यान रस्त्याकडेला असलेला हातपंप श्विनने हेरला. त्याबरोबर श्विनने तेथे विश्रांती घ्यायचे ठरवले. त्या हातपंपावर तोंडावर पाणी मारून स्कॉट श्विन ताजेतवाने झाले. श्विनने तेथे मनसोक्त पाणी पिऊनही घेतले. मात्र जठराग्नी शांत करायला पुन्हा राखीव साठा बाहेर काढायला लागणार होता. स्कॉटने घरी बनवलेले सुकामेवा घालून केलेले पौष्टिक लाडू काढुन श्विन स्कॉटने जठराग्नीला तात्पुरते शांत केले.

तेथे थोडी विश्रांती घेऊन स्कॉट श्विन परत निघाले आणि थोड्या वेळातच आजरा गावाजवळ पोचले. गावाच्या काही अंतर आधीच प्रशस्थ पसरलेल्या वडाचे दर्शन रस्त्याच्या डाव्या बाजूला झाले. मगाशी खाल्लेले लाडू केव्हाच जिरले होते, पुन्हा एकदा भूक लागू लागली होती. मात्र वडाच्या झाडाने घातलेल्या मोहिनीने स्कॉट श्विन मंत्रमुग्ध झाले. श्विन स्कॉटने वडाच्या पारंब्याना मिठी मारली. त्या पारंब्याना झोके घेत काही वर्षांपूर्वी हरवलेले बालपण श्विन स्कॉटने परत मिळवले. त्याच आनंदात काही काळ व्यतीत करून श्विन स्कॉटने आजरा गावाची हद्द गाठली. सुरवातीला दिसलेल्या पहिल्याच हॉटेलमध्ये दोघांनी प्रवेश केला तेव्हा राखीव वेळातील गेलेल्या दोन तासापैकी एक तास परत मिळवला होता. अजूनही राखीव वेळेचा उपयोग करून सावंतवाडी गाठण्याची आशा शिल्लक होती. त्यासाठी आता वेग कायम ठेवावा लागणार होता. मात्र श्विन स्कॉटने संयमाने विचार करत मूळ आराखड्याप्रमाणे आंबोली येथेच थांबण्याचे ठरवले.  त्यामुळे आता उरलेले अंतर आटोक्यात आले होते. सुदेश पानसरे यांनी आंबोली येथे  राहण्याची सोय करण्यासाठी आंबोली येथील दादा करपे आणि काका भिसे यांचा संपर्क क्रमांक दिला होताच. जेवण येईपर्यंत श्विनने त्यांना फोन करून आंबोली येथील मुक्कामाची सोय केली. हॉटेलमधील जेवण छानच होते, त्यामुळे दोघांनी मनसोक्त आडवा हात मारला. सोलकढी घेऊन जेवणाची तृप्तता पूर्ण अनुभवली.

पोट चांगलेच भरल्यामुळे लगेच सायकलिंग करावेसे वाटत नव्हते मात्र पुढील रस्ता जंगलातून जाणारा आणि निर्मनुष्य असणारा होता. त्यामुळे सूर्यास्तापूर्वी आंबोली गाठणे आवश्यक होते. अर्थातच जेवणानंतर फार विश्रांती न घेता आंबोलीकडे कूच करण्याचे ठरले. श्विन स्कॉट आजरा सोडत पुढे निघाले. मात्र थोड्याच वेळात स्कॉट मागे राहिली. त्यामुळे श्विनने एक थांबा घेतला. इतक्यात मागाहून दोघेजण मोटारसायकलवरून श्विनच्या बाजूला येऊन थांबले. श्विन स्कॉट डोंबिवली ते पणजी सायकलप्रवास करत आहेत हे त्यांनी श्विनला लावलेल्या फलकावरून ओळखले होते. त्यांनी श्विनची चौकशी केली आणि एक पाण्याची बाटली तसेच एक थंड पेयाची बाटली श्विनला देऊ केली. श्विनचा फलक पाहिल्यावर पाण्याची आणि थंड पेयाची बाटली घेऊन ते श्विनमागे मोटारसायकल घेऊन आले होते. श्विन थंड पेय घेत नसल्याने श्विनने फक्त पाण्याची बाटली स्वीकारून थंड पेयाची बाटली घेण्यास नकार दिला. त्या दोन मोटरसायकलिस्टपैकी एकजण मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कार्यकर्ता असल्याचे समजले. त्याचे नाव विचारले असता तो केवळ 'उत्सव' एवढेच नाव सांगत होता. श्विनने थंड पेय पीत नसल्याने थंड पेयाची बाटली परत करायला लागताच त्याने ती बाटली मागून येत असलेल्या स्कॉटला द्या असे सांगून ती बाटली परत घ्यायला नकार दिला. थंड पेय अपायकारक असल्याने श्विन स्कॉट दोघेही ते टाळत असत. मात्र 'उत्सव'चा मान ठेवण्यासाठी श्विनने ते स्वीकारले.

आंबोलीपर्यंतचा रस्ता जंगलातील असल्याने काळजीपूर्वक आणि लवकरात लवकर म्हणजे उजेडीच आंबोलीला पोचण्याबद्दल त्याने सांगितले. वाटेत एकटा प्रवासी दिसल्यास रानगवे हल्ला करतात त्यामुळे दोघांनी बरोबरीनेच प्रवास करण्यासाठी त्याने बजावले. उत्सवलाही संमेलनाबद्दल माहिती देऊन श्विन स्कॉट पुढे निघाले. पुढील रस्ता केवळ अरुंद आणि वळणावळणाचाच होता असे नव्हे तर रस्त्यात खड्डेही पुरेपूर होते. स्कॉटची लय पार बिघडून गेली. तिचा वेग खूपच कमी पडू लागला तसेच ती वारंवार थांबू लागली. मात्र जंगलातील निर्मनुष्य रस्त्यावर थांबणे श्विनला धोक्याचे वाटत होते. त्यामुळे श्विन स्कॉटला थांबू देईना. दमलेल्या स्कॉटला त्यामुळे आणखीच त्रास होऊ लागला. मात्र वाटेत जिथे वस्ती असेल तिथेच थांबायचे असे सांगून श्विनने स्कॉटला थांबू दिले नाही. बरेच खड्डेयुक्त अंतर कापल्यावर मात्र एक छोटे खोपट हेरून श्विन स्कॉट थांबले. तिथे खायला काही मिळाले नसले तरी चहा आणि सरबत मात्र मिळाले. तेथे विश्रांती घेऊन स्कॉट पुन्हा ताजीतवानी झाली. पुणे बंगलोर महामार्गाच्या गुळगुळीत रस्त्याचे सुख संपून जंगलातील खड्डेमय रस्त्याने जाताना स्कॉट वैतागली होती. मात्र दोन वर्षांपूर्वी saveoursahyadri मोहिमेदरम्यान यापेक्षा कितीतरी वाईट रस्त्यावरून प्रवास केलेल्या श्विनला अश्या प्रवासाची सवय झाली होती. अश्या वेळी मान खाली, हँडल सरळ धरून न थांबता वाटचाल सुरु ठेवणे हाच पर्याय होता. अनुभवाच्या जोरावर त्या रस्त्याने जाताना श्विन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होती. काही वेळाने बेळगाव आंबोली ला जाणाऱ्या रस्त्याला श्विन स्कॉटची जोडी लागली. तेथे श्विनने छायाचित्र तसेच चित्रीकरण सुरु केले. बेळगाव आंबोली रस्त्याला लागताच तेथे एक प्रवेशद्वार होते. श्विन छायाचित्रीकरण करत असतानाच त्या उंच प्रवेशद्वारावर चढत असलेली माकडे श्विनच्या नजरेस आली. त्या माकडांना श्विनचे आणि चित्रीकरणाचे आकर्षण वाटू लगाण्याआधीच श्विनने काढता पाय घेतला. आंबोली नजरेच्या टप्प्यात आले असले तरी सूर्यदेव उतरणीला लागला होता. तो मावळण्याच्या आत आंबोलीला ठरलेल्या ठिकाणी पोचणे आवश्यक होते. काका भिसे यांनी आंबोलीच्या प्रवेश द्वाराजवळ पोलीस चौकी आहे तेथे यायला सांगितले होते. श्विन स्कॉट आंबोली मध्ये शिरले, मात्र पोलीस चौकीची चौकशी करताच सर्वजण पुढे जायला सांगत होते. सूर्य झपाट्याने उतरणीला लागला होता. श्विन स्कॉटची सूर्याशी स्पर्धा सुरु होती. अखेरीस आंबोलीची पार करून पलीकडील हद्द दिसू लागली. तिथे मात्र श्विनला पोलीस चौकी दिसली. काका भिसेंनी सांगितलेले प्रवेशद्वार हे आजाराकडून येतानाच नव्हे तर सावंतवाडीकडून येतानाचे होते हे आता श्विनच्या लक्षात आले. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी काकांना फोन करण्याआधी चहा घेणे श्विनने पसंत केले. काका भेटताच त्यांनी लगोलग श्विनस्कॉटची हॉलिडे होममध्ये सोय करून दिली. तेथे मिळालेल्या खोलीमध्ये विसावत मिळालेल्या गरम पाण्याने स्नान करत श्विन स्कॉटचा दिवसभराचा शीण मात्र पार पळून गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...