रविवार, १५ एप्रिल, २०१८

रविवार सहल -पिसे डॅम

भारतीय सौर चैत्र २५, शके १९४०

काल टिटवाळा येथे मिसळवर ताव मारल्यावर, आज पळस्पे फाटा येथील दत्तमिसळचा समाचार घेण्याचा विचार होता. मात्र रविवारच्या पहाटेची साखरझोप न टाळता आल्यामुळे श्विन स्कॉटला आज निघायला उशीरच झाला होता. परिणामी पळस्पे फाट्याच्या ऐवजी भातसा नदीवरील पिसे अशुद्ध जल उदंचन केंद्राला भेट देण्याचे ठरवले. पिसे गावाजवळ भातसा नदीवर हे उदंचन केंद्र आहे. #dombivlicycleclub मधील सदस्यांचे हे आणखी एक आवडते ठिकाण.

९० फुटी रस्त्यावरील शांत आणि रुंद रस्ता पार करताना सर्व वाहनांना भरधाव गती गाठता येते. मात्र त्यापुढे पत्री पूल ओलांडून डावीकडे वळले की तेथून दुर्गाडी किल्यापर्यंतच्या अर्धा- एक किमी अंतरातील १८-२० गतिरोधक सर्व वाहनांची अवस्था केविलवाणी करत असतात. ९० फुटी रस्त्यावर मिळवलेला अश्वासारखा रुबाब दुर्गाडी रस्त्यावर पार गळून पडतो. चार चाकी अश्वशक्तीधारी वाहने मनुष्यशक्तीधारी स्कॉट- श्विनपुढे नतमस्तक होतात. दुर्गाडी किल्ला मागे टाकत पुढील चौकात अश्वारूढ शिवाजीमहाराजांना मुजरा करत श्विन स्कॉट पुढे निघाले. आधारवाडी चौकातून डावे वळण घेत पडघा रस्त्याला लागल्याबरोबर रस्त्याची कामं सुरु असल्याचे लक्षात आले. येथील गंधारी गावाजवळील पूल पार केल्यावर रस्ता अरुंद असला तरी वाहतूक कमी असल्याने वाटचाल शांतपणे करता येते. गंधारी पुलावर दोन्ही बाजूकडे नदीचे विशाल पात्र मन प्रसन्न करत होते. पुढे जात असतानाच @mandar mathure, @ritesh savla, @rudhir moghe, @vinit shetye हे DCC (डोंबिवली सायकल क्लब) चे सदस्य समोरून येताना दिसले. ते सुद्धा पिसे डॅमला भेट देऊनच येत होते. एकमेकांना शुभेच्छा देत आणि एकमेकांचा उत्साह वाढवत आम्ही आपापले मार्गक्रमण सुरु ठेवले.

सावड नाका येथे डावीकडे वळल्यावर इतिहासकालीन लोणाड लेणी आहेत, तर उजवीकडे वळल्यावर पिसे डॅम आहे. सावड पासून तसेच पुढे गेल्यावर पडघा मार्गे ठाणे नाशिक हमरस्ता आहे. मात्र आज पिसे डॅम ला जायचे असल्याने स्कॉट श्विनने उजवीकडे वळण घेतले. शहरातील वर्दळ, गर्दीपासून दूर असलेला हा सावड - पिसे रस्ता अतिशय शांत होता. पिसे येथील अशुद्ध जल उदंचन केंद्रापाशी पोचताच श्विन आणि स्कॉटने विसावा घेतला. घरापासून न थांबता १९- २० किमी अंतर पार झाले होते. तेथील नदीकाठी वाढलेली बेशरम नावाची पाणवनस्पती मला थेट बालपणात मागे घेऊन जाते. सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी डोंबिवली च्या पश्चिम भागात दलदलीच्या प्रदेशात ही वनस्पती आढळत असे. दलदलीत आढळणाऱ्या ही वनस्पती तशी चिवटच! त्यांच्या फांद्यांचा आधार घेत मी त्या दलदलीच्या प्रदेशात फिरत असे. मात्र सिमेंटच्या जंगलात डोंबिवलीतुन ही वनस्पती केव्हाच हद्दपार झाली आहे.

मुरबाड रस्त्यावरील गोवेली गावापासून टिटवाळा मंदिर गाव ५ किमी अंतरावर आहे. तसेच कल्याण पडघा रस्त्यातील सावड नाक्याला वळून पिसे डॅमला पोचले की या डॅम पासून टिटवाळा मंदिर गाव ७ किमी अंतरावर आहे. टिटवाळा शहराच्या दोन विरुद्ध बाजूला पिसे आणि गोवेली वसली आहेत. पिसेहून टिटवाळा येथे जाणारा मार्ग मात्र सुरुवातीला कच्चा आहे. किंबहुना तो थेट मागील शतकाशी नाते सांगणारा आहे.

पिसे डॅम येथे छोटी विश्रांती घेऊन श्विन स्कॉटने परतीचा मार्ग धरला. सावड येथून पिसे येथे पोचताना हा पल्ला लांबचा वाटत असला तरी परत येताना तेच अंतर कमी वाटत होते. सावड नाका येताच लोनाडला जाणारा रस्ता खुणावत होता. मात्र मनाला आवर घालत आम्ही गंधारीच्या दिशेला वळलो.  गंधारी पूलाआधी असलेले निराकेंद्र श्विनला माहित होतेच.  तसेच ते सुरु असल्याची खात्री पिसेकडे जाताना केली होतीच. त्यामुळे गंधारी पूल दिसू लागताच चाल मंदावत श्विनने निराकेंद्रापाशी विसावा घेतला. सकाळची वेळ असल्याने निराची चवही छान होती. सकाळच्या फेरीत निरापान झाल्यावर पुन्हा ताजेतवाने वाटू लागले होते. उन्हाचा तडाखाही अजून जाणवू लागला नव्हता.  श्विन- स्कॉटने पुन्हा दुर्गाडी किल्ला गाठला. अश्वशक्तीधारी वाहनांची मस्ती उतरवणारे १८-२० गतिरोधक पार करत स्कॉट श्विन पत्री पुलापाशी पोचले. येथून उजवीकडे वळत पत्री पूल चढणे तसे जिकरीचे काम. संध्याकाळी तर वाहनांच्या लागलेल्या रांगांतून वाट काढणे येथे अशक्यप्राय होते. सकाळच्या वेळेस परिस्थिती आटोक्यात असल्याने श्विन स्कॉटने हा अडथळा विनासायास पार केला. 

९० फुटी रस्त्यावर ताडगोळे दिसताच आणखी एक थांबा घेऊन मात्र श्विन स्कॉट थेट घरी परतले.

२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...