शनिवार, ७ एप्रिल, २०१८

नाम गुम जायेगा

शुक्रवार दिनांक भारतीय सौर १६, शके १९४०

#cycle2work साठी मी तयार होत असताना लक्षात आले की श्विनच्या टायरमध्ये हवा नव्हती. एवढ्या सकाळी सायकलींचे दवाखाने उघडणे शक्य नव्हते, त्यामुळे आज लोकलकळा सहन करतच ऑफिसला जाऊन आलो.

पण #dombivlicycleclub च्या सदस्यांना #21dayscyclingcampaign चे आवाहन करून मी श्विनला घरी ठेवणे योग्य वाटत नव्हते. आज या उपक्रमाचा १६ वा दिवस होता. मग मी ऑफिसहून परत आल्यावर श्विनला घेऊन ९० फूट रस्त्यावर जायचे ठरवले.

डोक्यावर शिरस्त्राण, चेहऱ्यावर डोळ्यापर्यंत आवरण मात्र नेहमीपेक्षा वेगळा जर्सी घालून मी श्विनवर स्वार झालो होतो. ९० फुटी रस्त्यावर पहिली फेरी मारून मी परत फिरलो तोच बाजूने एक दुचाकी मला समांतर येऊन माझ्या बरोबर जाऊ लागली. मी त्याकडे पाहताच दुचाकीचालकाने मला विचारले "आप ठानासे आ रहे हो ना!" खरं तर तो प्रश्न नव्हता तर त्या वाक्य उच्चारण्यामागे त्याची खात्रीच होती.
मी उत्तरलो "नही, मै तो यही पर राउंड लगा रहा हुँ." ह्या वाक्यावर तो वाहनचालकाचा चेहरा मात्र पडला. मोठ्या अविश्वासाने त्याने विचारले "आप रोज सायकलसे ठानामे ऑफिस जाते हो ना?" त्याच्या ह्या केविलवाण्या प्रश्नावर मात्र मला आज मी श्विनबरोबर ऑफिसला का नाही गेलो असे वाटून गेले. मी उत्तरलो "हा, मै रोज ऑफिसमे डोंबिवलीसे ठाणा सायकलसे जाता हुँ, पर आज नही गया" 

हे ऐकताच त्याचा जीव भांड्यात पडला. त्याच्या दुचाकीवर मागे बसलेल्या बुरखादारी ललनेकडे पाहत त्याने सांगितले ," मैं इनको यही बता रहा था की आप रोज सायकलसे ऑफिसके लिये ठाणा जाते हो". आत्ता मात्र त्याच्या पडलेल्या चेहऱ्यामागचे गुपित मला उलगडले. मी आज सायकलने ऑफिसला न गेल्याने तो वाहनचालक खोटारडा पडणार होता आणि त्यामुळे अपमानित झाल्याप्रमाणे बिचाऱ्याचा चेहरा पडला होता.

"मुझे पहचाना ना?" त्याने मोठ्या विश्वासाने मला विचारले. आता पुन्हा त्याला अनपेक्षित उत्तर मिळू नये यासाठी त्याने क्लू देत पुढे सांगितले, "हम वहा मिले थे".

आता त्या "वहाँ' मी अनेकांना भेटलो होतो. बरं त्याचा चेहरा मला खरच आठवत नव्हता. पण आता त्या ललनेसमोर त्याची पुन्हा फजिती होऊ नये म्हणून मी म्हणालो, " हा!" तो कल्याणच्या दिशेने आला होता हे लक्षात येत त्याला सावरण्यासाठी मी पुढे म्हणालो "आप कल्याणसे है ना".

बिचारा पुन्हा क्लीन बोल्ड होत म्हणाला, "नही, मै तो यही पर रहता हुँ"

आता अधिक बोलण्यात अर्थ नव्हता.  आम्ही दोघांनी आपापला रस्ता धरला. तो पुढे गेला आणि मला आश्चर्य वाटत होते की तोंडावर डोळ्यापर्यंत आवरण, डोक्यावर हेल्मेट आणि नेहमीपेक्षा वेगळा जर्सी घालून त्याने मला ओळखले कसे?

पण लगेचच लक्षात आले 'नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी 'श्विन'ही पहचान है गर याद रहे' 

#tjsbbank #cyclingzens #saveoursahyadri

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...