मंगळवार, १० जुलै, २०१८

कागज की कश्ती

आषाढ हा वर्षा ऋतुमधील पहिला महिना. सूर्याच्या दाहकतेमुळे तप्त झालेल्या धरतीला शांत करण्यासाठी कृष्ण मेघांचे आगमन होणारा हा महिना. येणारे पावसाळी ढग आपल्या सरींनी वातावरणातील प्रदूषण दूर करून पृथ्वी आणि आकाश ह्यांना पवित्र करतात म्हणून ह्या महिन्याला पवित्र मास म्हणजे शुचिमास असेही म्हणतात.

गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर पकडला होता. चार दिवस सूर्यदर्शनही झाले नव्हते. त्यातच रंगात आलेल्या पावसाने आज तर रौद्र रूपही धारण केले होते. सर्वत्र काळोखी पसरली होती. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'मरे' आणि 'परे' केव्हाच गलितगात्र झाल्या होत्या. मात्र तरीही मुंबईकर सवयीने कार्यालयात जाणे एन्जॉय करत होते.

आज संध्याकाळी 'मरे'च्या तावडीतून सुटून परत घरी येत असताना डोंबिवली स्टेशनला उतरल्यावर पावसाने माझे जोरदार स्वागत केले. पावसाच्या दणदणाटामुळे मला मात्र उत्साह वाटत होता. अर्थात पाऊस कसाही आणि कितीही असला तरी मुंबईकर त्या पावसाची मजा नेहमीच घेतात. आज ह्या पावसाचा नाद ऐकताना अचानक माझे मन भूतकाळात गेले.

पावसाची माझी पहिली आठवण म्हणजे आम्ही कौलारू चाळीत राहत असतानाची. घरासमोर गुडघाभर पाणी साठणे तर नित्याचेच. सुमारे १९७५ चा तो काळ. पावसाचे पाणी भरण्यासाठी अंगणात आम्ही बादली ठेवायचो आणि अंगणात साठलेल्या पाण्यात ती बादली वाहवत पुढच्या घराला निमंत्रण द्यायला धावायची.

शाळेतून घरी येत असताना वाटेत एक मैदान होते. पावसाळ्यात त्या मैदानाचे तळे व्हायचे. मग आम्ही शाळेतुन थेट घरी कसचे पोचणार. त्या मैदानाशी गेल्यावर आमची स्पर्धा सुरु व्हायची. मैदानाशेजारील पडलेल्या दगडातून शक्यतो चपटा दगड शोधायचा आणि कमरेत वाकून हात आडवा करून तो दगड पाण्यात मारायचा. तो दगड पाण्यात मारल्यावर त्या पाण्यावर आपटून वर उडायचा आणि परत पाण्यावर आपटायचा. मारलेला दगड कितीवेळा असा पाण्यावर आपटून वर उडतो हे पाहण्यात किती वेळ निघून जायचा हे कळायचेच नाही.

ते मैदान म्हणजे आमचे दुसरे घरचं. मैदानात तळे साठले नसले तर पापण्यांना न जुमानता डोळ्यात पाणी शिरत असले तरी त्या पावसात क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच. काही मूलं ह्या पावसाच्या दिवसात बिळातील खेकड्याना गवताचे आमिष दाखवत बाहेर काढत आणि त्यांना पकडत. आमचा खेळ व्हायचा पण त्या खेकड्यांचा मात्र जीव जायचा.

वडील घरात नसल्याची संधी साधून मांडीपर्यंत येणारे त्यांचे गंबुट घालण्याची मजा काही औरच. खरंतर ते गंबुट घालून चालताही यायचे नाही, पण गंबुट घालण्याचे जे सुख मिळायचे त्याला तुलना नव्हती.

आज लोकलमधून डोंबिवली मध्ये उतरल्यावर पावसाने केलेल्या जोरदार स्वागतामुळे अश्या अनेक आठवणी पावसाच्या सरींप्रमाणे एकापाठोपाठ येत होत्या. अन त्याचबरोबर आठवली आमच्या घरासमोर साठलेल्या पाण्यात सोडलेली कागदाची होडी. आणि भर रस्त्यातच नकळत शब्द उमटले..
'ये दौलत भी ले लो, ये शोहरात भी लेलो
भले छिन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी'



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...