सोमवार, २ जुलै, २०१८

मेघांची साथ

श्विनचा रुबाब आज काही औरच होता. #cycle2work साठी श्विन तयार होत असताना स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता.  त्यामुळे कालच तैलाभ्यंगस्नान केलेल्या श्विनची कांती चकाकत होती. श्विनला वेग घेणेही आज सोपे जात होते. मात्र दुर्गाडी चौक येथे अश्वशक्तीधारी वाहने एकमेकांना अडथळे निर्माण करत थांबल्यामूळे वाहतूककोंडी झाली होती.
त्या वाहनांच्या मधून वाट काढत श्विनने दुर्गाडी पूल गाठला. अर्थात अश्वशक्तीधारी वाहनांची अडथळे निर्माण करण्याची स्पर्धा पुढे कोनगाव आणि गोवेगाव येथेही सुरु होतीच. तेथेही सर्व वाहनांना गुंगारा देत श्विन पुढे निघाली. राजनोली नाका येईपर्यंत सूर्य तळपत असला तरी नाशिक ठाणे रस्त्याला लागताच मेघांनी श्विनवर छत धरले होते. त्याबरोबर मी नेहमीप्रमाणे ठाण्याच्या दिशेने क्षितीजाकडे नजर टाकली. दूरपर्यंत कृष्णवर्णीय मेघ दृष्टीस पडत नव्हते. मात्र जणू सूर्यापासून श्विनचा बचाव करण्यासाठी श्वेतवर्णीय मेघ आकाशात अवतरले होते. ओवळी गावापूढे जाताच आकाशातील दृश्य टिपण्याचा मोह आवरणे कठीण होते. श्विनच्या नजरेतून निसर्गाने रेखाटलेले चित्र टिपून आम्ही पुढे कूच केले.
वाटेत सूर्याचा लपाछपीचा खेळ रंगत होता. सूर्याने डोके बाहेर काढताच श्वेतवर्णीय मेघ श्विनचे संरक्षण करायला पुन्हा सरसावत होते. श्विनचा प्रवास त्यामुळे निर्धास्तपणे सुरु होता. श्विनला लयही छान सापडली होती. त्याच वेगात श्विनने कापूरबावडी उड्डाणपूल आणि पुढे व्हिव्हियाना मॉलसमोरील उड्डाणपूल लीलया पार केले.
तीन हात नाका मार्गे श्विनने TJSB HOUSE गाठले तोपर्यंत शुभ्रवर्णीय मेघांनी श्विनचे सूर्यापासून रक्षण केले. काळ्या मेघांचा मात्र तोपर्यंत मागमूसही नव्हता.
TJSB HOUSE दिवसभर थांबून संध्याकाळी श्विन ऑफिसहून घरी निघाली तेव्हा मात्र नूर पार पालटला होता. सकाळी गैरहजर असलेल्या कृष्णवर्णीय मेघांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली होती. श्विन ऑफिसहून निघण्याअगोदरच पावसाची सुरुवात झाली होती. सकाळी श्वेतवर्णीय मेघ श्विनची काळजी घेत होते, तर आता ते काम कृष्णवर्णीय मेघ पार पाडत होते. संध्याकाळी मानकोलीपासून दुर्गाडीपर्यन्त अश्वशक्तीधारी वाहने बऱ्याचदा अतिसंथ गतीने जात असतात. राजनोली नाका, कोनगाव, दुर्गाडी पूल येथे तर गोगलगायसुद्धा ह्या वाहनांना मागे टाकू शकेल अशी परिस्थिती असते. या सर्व कोंडीतून श्विन मार्ग काढत पुढे जात असताना श्विनला ताजेतवाने ठेवण्याचे काम आज संध्याकाळी कृष्णवर्णीय मेघ करत होते. पावसाचा जोर जास्त नसल्याने श्विनला वेगही नियमित ठेवता येत होता. संततधार धरत अभिषेक करणाऱ्या मेघांनी श्विनला घरापर्यंत साथ दिली आणि सकाळची गैरहजेरी पूर्णपणे भरून काढली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...