रविवार, २९ जुलै, २०१८

काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ - भाग १

'हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग गो चेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट...'

सह्याद्रीच्या डोंगररांगा हे तर महाराष्ट्राचे वैभवच. त्यातच ज्या खंडाळ्याच्या घाटाचा मोह कवीलाही पडतो, त्या घाटाचे आकर्षण श्विनलाही नेहमीच वाटत आले आहे. कार्बन सोडणाऱ्या गाड्यातून एक्सप्रेस हायवे ने जाताना तंत्रज्ञानाची झेप कळत असली तरी ह्या घाटाचे वैभव पाहायचे असेल तर मात्र राष्ट्रीय महामार्ग ४ वरून सायकलने जायला हवे.

ह्या आकर्षणामुळे श्विन डोंबिवली- तळेगाव- डोंबिवली ची सफरीचे निमित्त शोधतच असते. शनिवार आणि रविवार अशी जोडसुट्टीच्या संधीचा फायदा घेत श्विनने स्कॉटसह पुन्हा एकदा तळेगाव सफरीला जायचे ठरवले. आषाढ महिन्यात घाटातील सौंदर्य खुलणे अपेक्षित होतेच. त्याबरोबरच श्विन आणि स्कॉटला घाटातील पावसाचाही आनंदही लुटायचा होता. शनिवारी कधी नव्हे ती ब्रह्म मुहूर्तापूर्वीच जाग आली (रात्रीचा चौथा प्रहर म्हणजे ब्रह्म मुहूर्त. तो साधारणपणे पहाटे ४.२४ ला सुरु होऊन पहाटे ५.१२ पर्यंत असतो. दिवसातील २४ तासात साधारण ४८ मिनिटांचे ३० प्रहर असतात. सुर्योदयापूर्वीचे दोन प्रहर म्हणजे ब्रह्म मुहूर्त आणि विष्णू मुहूर्त).
विष्णू मुहूर्त संपताना श्विन आणि स्कॉटने तळेगावच्या दिशेने कूच केले तेव्हा आकाशात काळोखी होती. मात्र लगेचच भिजण्याची श्विनला तरी इच्छा नव्हती. डोंबिवली बाहेर पडेपर्यंत श्विनची ही इच्छा पूर्ण झाली. शिळ फाट्याजवळील डोंगररांगा मात्र ढगांशी मस्ती करून आषाढसरी कोसळणार असे वाटत होते. आभाळात झालेली ढंगांची गर्दी हेच दर्शवत होती. मात्र हा अंदाज पार चुकला. उजव्या हाताला शिळ पनवेल रस्त्यावरील डोंगररांगांकडे पाहत श्विन स्कॉट पुढे जात होते. एव्हाना दोघांनाही लय सापडली होती.

सवयीप्रमाणे दोघंही पळस्पे फाटा इथे उदरभरण करायला थांबले. इडली सांबारवर आम्ही ताव मारत असताना बाहेर उभ्या असलेल्या श्विन स्कॉटवर मात्र आषाढसरी बरसायला लागल्या तेव्हा पुढील प्रवास पावसाचा आनंद लुटत होणार असे वाटू लागले. पण अचानक सुरु झालेला तो पाऊस तितक्याच तत्परतेने माघारी परतला. इथून पुढचा प्रवास श्विनला जास्तच आवडतो. याचे मुख्य कारण म्हणजे इथून पुढे कार्बन सोडणारी वाहने कमी होतात, तसेच निसर्गही त्याचे अंतरंग उलगडून दाखवू लागतो. तसेच पनवेल ते खोपोली दरम्यानचा रस्ताही छान आहे. या वेळी मात्र त्या रस्त्याला महड फाट्याजवळ दृष्ट लागली होती. 

घाट सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा उदरभरण करून श्विन स्कॉट खोपोलीहुन मार्गस्थ झाले तेव्हाही आकाश ढगांनी आच्छादलेलेच होते. घाटातील वाटेत पर्जन्यधारा वर्षाव करणार यात शंका नव्हती. श्विनने चाल मंदावत घाटातील चढाईला प्रारंभ केला. स्कॉटही पाठोपाठ होतीच. सुरुवातीचा चढ पार करून दोघेही टाटा सायमाळ येथील निसर्ग हॉटेल येथे पोहोचले. सायकलिंग करत घाट चढताना पाहत अनेक जण आश्चर्याने पाहत होते. श्विन १-१ या गियरवर असल्याने निसर्ग हॉटेल जवळ येताना पॅडल भराभर फिरत होते. एका उत्सुक गृहस्थाने विचारलेच, 'अरे इतक्या भराभर पॅडल फिरवत आहेस, पाय दुखतील ना!' मी त्यांना सांगितले की हे सर्वात कमी गियर रेशो असल्याने वेग कमी झाला पायावर जोर येत नाही. त्यामुळे पाय दुखत नाही'.
त्यावर पुढचा प्रश्न होताच..'गती कमी झाल्यावर चढ कसा चढणार?' मग मात्र मी त्याला त्याच्या चारचाकीच्याच भाषेत सांगितले,'तुम्ही कारने चढ चढताना जाडा गियर कमी करता तसेच पॅडलिंग सोपे होण्यासाठी सायकलचेही गियर कमी करावे लागतात. जशी कर कमी गियर वर गती कमी ठेवून घाट चढते तशीच सायकलही गियर कमी करून धीम्या गतीने घाट चढते. कारला acceleter असतो तसा acceleter सायकलला नाही'.

चहा घेत असताना इतरही लोक कुतूहलाने पाहत आणि चौकशी करत होते. श्विन आणि स्कॉट मग शिंग्रोबा मंदिरापाशी दोन क्षण थांबून खंडाळा घाटाच्या त्या निर्मात्याला वंदन केले. अद्याप पाऊस आला नसला तरी पुढे ३ वळणे गेल्यावर एक छोटा धबधबा मुक्त हस्ते दान देणार होताच. मी लगेचच त्या धबधब्यातील खडकावर जाऊन आडवा झालो. गारेगार पाण्याचा स्पर्श होताच शरीर उल्हसित न होईल तरच नवल! तेथे भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत मी न पडलेल्या पावसाची उणीव भरून काढली. तेथून पुढे मात्र जुन्या रस्त्याने न जाता आम्ही एक्सप्रेस वे वर शिरलो. तेथील गुळगुळीत रस्त्यावर श्विन स्कॉट रुबाबात पुढे निघाल्या. RTO ऑफिस समोरील मारुतीरायाला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. तेथील बोगदा पार करून पुढे जातो तोच एक वाहतूक पोलीस आमची चौकशी करू लागला. त्याच्याकडील थंड पाणी आम्हाला प्यायला देऊन त्याने आमच्या जवळील बाटल्यामध्येही गार पाणी भरून दिले. हे असे प्रेम केवळ सायकलस्वारांनाच मिळू शकते हे मात्र निर्विवाद.

खंडाळा येथे शिरताच कामत हॉटेलशेजारील हॉटेलमधील रुचकर श्विन स्कॉटला आवडते. यावेळी मात्र तेथे पार्टी सुरु असल्याने आम्हाला जेवण्यासाठी पुढे लोणावळा पर्यंत जाणे भाग होते. अर्थात जठराग्निही भडकला नव्हता. त्यामुळे आहुती द्यायची घाई करण्याची गरज नव्हती. लोणावळा शहर सूरु होताच अश्वशक्तीधारी गाड्यांची गर्दी सुरु झाली. तेथील अन्नपूर्णा हॉटेलमध्येही गर्दी होतीच. येथील स्वादिष्ट जेवण जेवण्यासाठी वाट पाहत थांबायला श्विन स्कॉटची तयारी होती. त्या संयमाची भरपाई तेथील थाळीवर आडवा हात मारून आम्ही केली तेव्हा मात्र त्या हॉटेलमध्येच रूम घेऊन वामकुक्षी घेण्याची गरज वाटू लागली. 

नाईलाजानेच पुढील प्रवास सुरु केला. पण थोड्याच वेळात श्विन स्कॉट वाऱ्याच्या वेगाने जाऊ लागले. श्विन आणि स्कॉट  कामशेत घाट पार केल्यावर वेग आणखी वाढवायचा विचार करत होते खरे....
मात्र कामशेत सुरु होतानाच रस्तेबांधणी कामाच्या कारणामुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली होतीच शिवाय सेवा रस्ताही उखडला गेला होता. भरीस भर म्हणजे त्यावर सुटी खडी टाकून ठेवलेली होती. एकंदरीतच कोणतेही वाहन गोगलगायीपेक्षा वेगाने जाऊ शकणार नाही याची पुरेपूर तजवीज केलेली होती. मात्र #कल्याणडोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची सवय असल्याने श्विनला काहीच फरक पडत नव्हता. (अरे हो कल्याण डोंबिवलीत आता रस्ते आहेत कुठे? आहे एकतर भाजी मार्केट आणि त्यातून जीव मुठीत धरून जाणाऱ्या गाड्या आणि दुसरे म्हणजे एकमेकाना जोडलेले कोट्यावधी की अब्जावधी खड्डे)

श्विन स्कॉटने तेथून मार्ग काढला न काढला तोच महामार्गावर प्रचंड मोठी रांग लागलेली दिसत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. श्विन स्कॉट विरुद्ध बाजूने पुढे गेलो तर आकाशात उंच जाणारा धूर दिसू लागला. थोडे पुढे जाताच संपूर्णपणे अग्नीच्या स्वाधीन झालेली मारुती ओम्नी नजरेस पडली. पुढे आणखी दोन सायकलस्वार वाट काढत होते. त्यांच्याच बरोबर श्विन स्कॉटनेही बघ्यांच्या गर्दीतून वाट काढली. काही अंतरावरच आम्हाला मागे टाकून भरधाव वेगात पुढे गेलेले सायकलस्वार थांबलेले दिसले. त्यांच्यापैकी एकाचे चाक रुसले होते. त्यांच्याशी ओळख करून घेत आम्ही जलदीने पुढे निघालो. 
अखेरीस आम्ही तळेगाव गाठले तरी वरुणराज मात्र आमच्यावर प्रसन्न झालाच नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...