रविवार, ८ जुलै, २०१८

लोकलकळा

आज जाग आली ती पावसाच्या गडगडाटातच! नभातून कोसळणाऱ्या धारांच्या माळाच अवतरत होत्या. पावसाचा जोर पाहून मी श्विनला घरी ठेवून आज लोकलने TJSB House ला जायचे ठरवले.

डोक्यावर छत्री घेऊन स्टेशनला पोचलो तोपर्यंत डोके वगळता पुन्हा पूर्ण स्नान झाले होते. सुदैवाने गाडीला मात्र फार गर्दी नव्हती. अर्थात पावसाचा फायदा घेत लोकल सुखेनैव रित्या जात होती. दिवसभर पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी पाऊस पूर्णपणे थांबत नव्हता. संध्याकाळी घरी परत जाण्याची वेळ झाली तेव्हा श्विनची हटकून आठवण झाली. मात्र श्विन आज घरी होती आणि मला आज लोकलच्या प्रवासाची संधी प्राप्त झाली होती.

मुलुंड स्टेशनला पोचताच पाहिले तर तीन नंबरच्या फलाटावर एक जलद लोकल येणार असल्याचा इंडिकेटर लावला होता. मी धावतच फलाटावर पोचलो. गाडी येण्याच्या आत फलाटाचे शेवटचे टोक गाठण्यासाठी पटापट चालत गेलो. इंडिकेटरवर गाडी लावली असली तरी किती वेळाने येणार ती वेळ लावली नव्हती. फलाटावर येरझाऱ्या घालत एक नंबरच्या फलाटावर गाडी लावत आहेत का याची मी चाहूल घेत होतो. मात्र तेथे ठाण्यापर्यंत जाणारी गाडी लावली होती. बऱ्याच वेळाने समजले की तिसऱ्या फलाटावर येणारी जलद लोकल यायला तब्बल १८-२० मिनिटे बाकी होती. दरम्यान पहिल्या फलाटावरील ठाणे लोकल गेली होती आणि पुढील कल्याण लोकल येणार असल्याचे इंडिकेटर लावले होते. वेळ न दवडता मी पहिल्या फलाटावर पोचलो. पुढील १० मिनिटात गाडी आली ती तुडुंब भरलेली होती. त्या गाडीच्या दरवाजापर्यंतही जाता येणे मला शक्य झाले नाही. मात्र त्याच फलाटावर पुन्हा कल्याण गाडी लावली असल्याने मी त्याच फलाटावर वाट पहायची ठरवली. आणखी ५ मिनिटे वाट पाहिल्यावर समजले की ती कल्याण गाडी अजून १५-२० मिनिटे येणार नाही. एवढ्यात तीन नम्बरवरील जलद लोकलची वेळ झाल्याने अस्मादिक पुन्हा तिसऱ्या फलाटावर गेले. मात्र केवळ पुनरावृत्ती होत मी लोकलच्या दरवाजापासून दूरच राहिलो. त्यामुळे आता परत पहिल्या क्रमांकावरील लोकलसाठी परत फलाट बदलला. ह्यावेळी मात्र सुदैवाने मी लोकलमध्ये प्रवेश करू शकलो.

दरवाजातून शिरताच चष्मा नाकावरून उड्डाणाच्या तयारीत असल्याचे लक्षात आले. क्रिकेटमध्ये झेल घेण्याचा पूर्वी सराव केल्याचा मात्र इथे फायदा झाला. चष्मा तसाच उजव्या हाताने हवेतच झेलून पुन्हा नाकावर प्रस्थापित केला. पुढील पाऊल टाकताच लक्षात आले की डाव्या पायातील बूट पायातुन निघाला आहे. गाडीने अजून फलाट सोडला नव्हता. माझ्या मागून गाडीत चढणाऱ्या प्रवाश्यांचा लोंढा येत होता. मात्र पायाच्या बोटात बूट धरून ठेवत मी पटकन बूट डाव्या हातात धरला. तो बूट परत मिळाल्यामुळे एखाद्या स्पर्धेत जिंकून त्यातील चषक पटकावण्याचा आनंद झाला होता.

पुढील स्टेशनला उतरण्यासाठी समोरून येणाऱ्या लोंढ्याला वाट करून देत मी आतल्या बाजूला जात असताना डाव्या हातातील बूट विजेता चषक धरल्याप्रमाणे उंचावून धरला होता. मात्र आता खांद्याला अडकवलेल्या बॅगचे पट्टे माझ्या खांद्यात अडकले असले तरी बॅग मात्र भलत्याच माणसांच्या मध्ये अडकली होती. त्यामुळे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना बॅग आणि तिचे पट्टे यांची ताटातूट होण्याचा संभव मात्र निर्माण झाला होता. 

पुढील स्टेशन जाताच मागे अडकलेल्या बॅगची सुटका झाली, मात्र बूट अजून हातातच होता. अखेरीस आणखी दोन स्टेशन जाताच बूट धरलेला हात खाली नेण्यासाठी जागा मिळाली आणि तो बूट स्वगृही परतला. हे सर्व होत असताना लोकलही आरामात पुढे जात होती. 
अखेरीस चष्मा, बूट आणि बॅग हे सर्वजण आपापल्या जागी सुखरूप परतल्यावर लोकलही डोंबिवलीला पोचली.

#tjsbbank #dombivlicycleclub #cycle2work

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...