सोमवार, ३० जुलै, २०१८

काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ- भाग २

शनिवार हा माझा सर्वात आवडता वार. श्विन स्कॉटसह शनिवारी तळेगावला पोचल्यावर मी समाज माध्यमांकडे मोहरा वळवला. चिंचवड येथील सायकलमित्र हा समूह रविवारी पावसाळी सहलीकरता लोणावळा स्वारी करणार असल्याचे समजले.

मात्र परत रविवारी ब्रह्म मुहूर्ताला उठण्याची मला खात्री नव्हती. तसेच आता डोंबिवलीला परत जाताना घाट उतरायचा होता. अर्थातच मी अंमळ उशिरानेच उठलो. सूर्य उगवल्यावर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. तळेगाव येथील प्रसन्न वातावरणातून परत येण्याची कल्पना श्विन स्कॉटला कधीच पसंत नसे. मोकळा रस्ता, शांत वातावरण असल्यामुळे श्विन स्कॉटने लगेचच वेग घेतला. चाकण तळेगाव रस्त्यावर चार किमी प्रवास केल्यावर पुणे मुंबई जुना महामार्ग अर्थातच NH4 सुरु झाला. श्विनचा हा अत्यंत आवडता महामार्ग. त्यामुळे प्रफुल्लित वातावरणात मिळालेल्या वेगाचा फायदा घेत श्विन स्कॉटने जलद गतीने 'टोनिदा ढाबा' गाठला.

टोनिदा ढाबा समोर एक टपरी आहे. एक प्रौढ जोडपे ती टपरी चालवते. तिथे मिळणारा चहा खरोखरीच अप्रतिम आहे. चहाच्या टपरीपाशी जाऊन तिथे चहाची फर्माईश केली. तिथूनच 'सायकलमित्र' समूहाची चौकशी केली. ते मात्र बरेच पुढे गेले होते. दरम्यान चहा तयार होत असताना काल जळालेल्या मारुती ओम्नीची चहावाल्या मावशींकडे चौकशी केली. शाळेतील मुलांना सोडण्यासाठी त्या मारुतीचा वापर होत होता. मात्र शनिवारी सुट्टी असल्याने त्या दिवशी गाडीत मुले नव्हती. बिचाऱ्या गाडीचालकाची आणखी एक गाडी पूर्वी अपघातग्रस्त झाली असल्याचेही समजले.

मावशींनी चहा बाकी फर्मास केला होता. अर्थात तो तसा असणार याची खात्री होतीच. याचकरीता डोंबिवली तळेगाव डोंबिवली सायकल यात्रेदरम्यान इथला चहा हा ठरलेलाच! १५- १६ किमी सायकलिंग झाल्यामुळे पायही मोकळे झाले होते. त्यातच वाफाळत्या चहाने आम्ही चांगलेच ताजेतवाने झालो. पुढचा प्रवास सुरु झाल्यावर लगेचच रानवाटानाही लाजवेल असा खडबडीत झालेला कामशेत येथील राष्ट्रीय महामार्ग सुरु झाला. मात्र आम्ही ताजेतवाने असल्याने श्विन स्कॉट तेथून सहजगत्या पुढे निघाले. तिथे लगेचच कामशेतचा घाट सुरु झाला. गियर कमी करत श्विन स्कॉटने तो घाट विनासायास पार केला. तोच आम्ही आमच्यावर प्रसन्न होऊन वरूणराजाने शिडकावा सुरु केला. जणूकाही घाट चढल्यावर आम्हाला ताजेतवाने ठेवण्यासाठी आमच्या चेहऱ्यावर स्प्रे मारण्यासाठीच तो आला होता. कामशेतचा घाट, पुढील रेल्वे पूल पार करून श्विन स्कॉट पुढे निघाले, तोपर्यंत पावसाचा शिडकावा सुरूच होता. आभाळात जमलेली ढगांची गर्दी लोणावळा येथे पाऊस असल्याची सूचना देत होता. एव्हाना उलट दिशेने येणारा वारा सुरु झाला होता. त्यामुळे श्विन स्कॉटचा वेग मंदावला.

वातावरण उल्हसित झाले होते. रहदारीही तुरळक होती. पावसाचा आनंद घेत आम्ही लोणावळ्याच्या दिशेने जात होतो. मात्र हा आनंद क्षणभंगुरच ठरला. जेमतेम चेहरा भिजेल इतपत वर्षाव झाल्यावर वरुणास्त्र म्यान केले गेले. रस्ता ओला झाला होता, वातावरणही शांत होते. लोणावळा गाठल्यावर श्विन आणि स्कॉट आपोआपच 'अन्नपूर्णा' कडे वळले. मिसळ आणि वडा उसळ यावर ताव मारून जठराग्नीला आहुती दिली. 'अन्नपूर्णा' तील चव रेंगाळत श्विन स्कॉट ने पुन्हा प्रवास सुरु केला. राजमाची पॉईंट येथील निसर्ग सौंदर्यामुळे श्विन आणि स्कॉटने आणखी एक छोटी विश्रांती घेतली. हिरव्या रंगाची शाल पांघरलेले सह्यकडे आणि आकाशातील मेघ यांनी निसर्गाच्या कॅनव्हासवरील चित्र रंगवलेले होते. ते विलोभनीय दृश्य दोन डोळ्यांच्या साठवणे शक्यच नव्हते. 'ये कौन चित्रकार ... ये किस कवी की कल्पना' ह्या काव्यपंक्ती अश्याच निसर्गकिमयेमुळे सुचू शकतात. श्विन आणि स्कॉट इतर पर्यटकांबरोबर सह्याद्रीची श्रीमंती अनुभवत होते. दोन डोळ्यांनी जमेल तेव्हढे सौंदर्य साठवून आम्ही पुढे निघालो.

आता खरी कसोटी सुरु होणार होती. घाट चढताना दम लागत असला तरी आपण थोडे रिलॅक्स होऊ शकतो. मात्र घाट उतरताना आपण सजग असणे अतिशय आवश्यक असते. सहजपणे मिळालेल्या गतिवर नियंत्रण ठेवताना घाटातील वळणांवर लक्ष ठेवणे जरुरीचे असते. उतारावरील गती मनावर स्वार होऊ न देण्याची दक्षता घेण्याची खूणगाठ बांधत श्विन आणि स्कॉटने राजमाची पॉइंटकडून घाटातील पहिले वळण घेतले. मात्र पुढच्याच वळणावर दिसणाऱ्या दृश्यामुळे पुन्हा एक थांबा घेतला. निसर्गाचे मोहक दृश्य खिळवून ठेवत होते. मनाला आवर घालत श्विन आणि स्कॉट पुन्हा मार्गस्थ झाले. पुढील उतारावर सावधपणे गती घेत पुढे निघाले.

काही क्षणातच धबधब्यापाशी पोचल्यावर श्विन आणि स्कॉटने पुन्हा एकदा विसावा घेतला. पावसाने पाठ फिरवली असली तरी इथल्या प्रवाहात भिजून आम्ही मनाचे समाधान करून घेतले. घाट उतरताना शिंग्रोबा मंदिरामागील रस्त्याने जावे लागत असल्याने शिंग्रोबाचे दर्शन आता मिळणार नव्हते. तसेच उतारावर सहजगत्या मिळालेल्या वेगामुळे 'निसर्ग हॉटेल' मधील वडापाव- चहा याकडेही दुर्लक्ष करत श्विन स्कॉटने खोपोली गाठले. खोपोली शहरातील रहदारी पार करून श्विन स्कॉट पुन्हा महामार्गाला लागले तेव्हा सूर्य अस्तित्व दाखवू लागला होता.

चौक फाटा येथे पोचताच चहापान घेण्यासाठी आणखी एक विसावा घेतला. तळेगावला जाताना इथला चहा घेतला होता. तेव्हाच परतताना पुन्हा चहा घ्यायला इथे थांबायचे ठरवले होते. तेथील हॉटेलमालकालाही तसे सांगितले होते. याहीवेळी छान चहा इथे मिळाला आणि पुढील प्रवासासाठी उर्जाही मिळाली. लोणावळा येथे नाश्ता झाल्यावर चहा साठी थेट चौक गाठले होते. इथला चहा घेऊन श्विन आणि स्कॉटने पुन्हा वेग घेतला आणि जेवण्यासाठी थेट पनवेल स्टँड समोरील हॉटेल गाठले. एव्हाना जठराग्निही जागृत झाला होता. समोर थाळी येताच त्यातील गुलाबजाम पाहून अखिलेश पोतनीसची आठवण झाली.

'सेव्ह आवर सह्याद्री' या सायकल मोहिमेतील ७०० किमी चा नवापूर ते महाबळेश्वर या उत्तर मार्गातील अखिलेश हा माझा सायकलमित्र. या प्रवासादरम्यान आम्हाला चांगले जेवण मिळण्याची व्यवस्था होत होतीच. त्यातही जवळपास रोजच गुलाबजाम हजर असायचे. गुलाबजाम हा माझा विक पॉईंट! त्यामुळे जेवताना वाटीभर गुलाबजाम तर मी घेतच असे. मात्र रक्तातील साखर ते गुलाबजाम खाण्याची मुभा देत नसे. यावर मी उपाय शोधला होता. जेवताना मी नेहमी अखिलेशला माझ्याजवळ बसायला सांगत असे, आणि घेतलेले गुलाबजाम त्याला खायला लावत असे. म्हणजे गुलाबजाम खाल्ले नाही तरी वाटीत गुलाबजाम घेतल्याचे समाधान तर मिळत असेच शिवाय अखिलेशला गुलाबजाम दिल्याचे पुण्यही मिळत असे.

पनवेल स्टॅन्डसमोरील थाळी संपवून श्विन आणि स्कॉटने थेट पुढील टोलनाका गाठला. तेथील कर्मचारी संदीप उतेकर यांनी श्विन आणि स्कॉटची आपुलकीने चौकशी करत पाण्याची बेगमी तर केलीच शिवाय चहा घेण्याविषयीही विचारले. मात्र पुढे कोकणरत्न मध्ये चहा घ्यायचा असल्याने आम्ही उतेकर यांना नम्रपणे नकार दिला. लांबवरची सायकलफेरी करून शिळ फाटा मार्गे परत डोंबिवलीला घरी येताना कोकणरत्न येथे चहा हा हवाच.

कोकणरत्न येथे चहा घेऊन श्विन आणि स्कॉट डोंबिवली शहरात शिरले. शहरातील वर्दळीमधून मार्ग काढत पुन्हा घर गाठले तेव्हा श्विन आणि स्कॉटला उचलून घेत आम्ही विजयोत्सव साजरा केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...