शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

योगायोग: अष्टविनायक सायकलयात्रा लेख ८






लेण्याद्री/ जुन्नर कडून माळशेजकडे जाताना गणेशखिंड दिसू लागताच एखाद्या गडकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराचीच आठवण होते. असे वाटते की खिंड चढल्यावर माळशेजकडे जाणाऱ्या मार्गाचा एखादा भरभक्कम दरवाजाच तिथे असावा. येथील असणाऱ्या गणेशमंदिरामुळेच बहुतेक ह्या खिंडीला गणेशखिंड असे नाव पडले असावे. गणेशखिंड ओलांडताच होणारे निसर्गाचे दर्शन खरोखरच विलोभनीय आहे.
येथील मंदिराचा इतिहास फारसा माहीत नसला तरी येथील प्रसन्न वातावरण आपल्याला इतिहास आणि वर्तमानच काय भविष्यही विसरायला लावते. त्याचमुळे का काय, श्विन आणि स्कॉट गणेशखिंडीतील गणेशाचे दर्शन घेत रमले होते.



घड्याळबाबा मात्र त्यांचे काम अथकपणे करत होते. श्विन स्कॉटला घड्याळबाबा सावध करू पाहत असले तरी, त्यांनी मात्र येथील वारा अंगावर घेत घड्याळबाबांकडे दुर्लक्षच केले. खिंड चढून झाल्यावर आता फक्त उताराचा मार्ग असणार अशी खात्री श्विन आणि स्कॉटला वाटत होती. नाही म्हणायला श्विनने या मार्गाने एकदा प्रवास केला असला तरी पुढील रस्ता उताराचाच आहे असे श्विनलाही वाटत होते. त्यामुळे मनसोक्त वेळ घालवल्यावर दोघेही निघाले. मात्र एक थोडासा उतार पार केल्यावर पुन्हा सरळ रस्ता लागला. अर्थात रस्ता मात्र चांगला होता. त्यामुळे श्विन स्कॉट शांतपणे जात होते.

पुढे जात असताना उजवीकडून आळेफाट्याकडून येणारा मार्ग दिसत होता. तर समोरच्या दिशेला माळशेजमार्गे कल्याणकडे म्हणजेच डोंबिवली ला घराकडे जाणारा रस्ता दिसत होता. एव्हाना मध्यान्ह होऊ लागली होती आणि कल्याणचे अंतर ९५ किमी दिसत होते.

म्हणजे घरापर्यंत पोचायला अजून शतकी दौड बाकी होती. श्विन स्कॉट अजूनही निर्धास्त होते. कल्याणचा फलक दिसल्यावर दोघांचा उत्साह आणखीच वाढला. आजूबाजूला न पाहता दोघेही समोरच्या दिशेने दौडत होते. पिंपळगाव जोग धरणाकडून येणारा प्रवाह ओलांडून श्विन स्कॉट मढा गावामध्ये शिरले.


खिंड उतरल्यानंतर ब्रेक थोडा तक्रार करतोय अशी शंका श्विनला येऊ लागली होती. इतक्यात बाजूने एक सायकलिस्ट दिसला. श्विनने तेथे कोणी सायकलदुरुस्ती करणारा आहे हे विचारले. सुदैवाने मिनीटभराच्या अंतरावरच सायकलचा वैद्य उपलब्ध होता. त्याच्याकडे आधीच आलेल्या रुग्णाइत सायकलवर शुश्रूषा करून मोकळे केल्यावर त्याने श्विनकडे पाहिले. निष्णात वैद्याने पहिल्याच नजरेत रुग्णाची तब्बेत ओळखावी त्याप्रमाणे त्या सायकलवैद्याने श्विनकडे पाहत श्विनची तब्बेत ओळखली. केवळ थोडेसे तेल देऊन त्या सायकलवैद्याने श्विनला आश्वस्थ केले. पुढे असलेल्या माळशेज घाटाच्या उताराच्या धास्तीने श्विनने त्या सायकलवैद्याला आणखी कशाचीही गरज नाही ना याची पुन्हा खात्री करून घेतली. तेथून श्विन बाहेर पडणार इतक्यात अटलास आणि हिरो हॉक तेथे आले. अटलास आणि हिरो हॉक दरवर्षी शिर्डीला सायकलफेरी करत असतात. त्यादरम्यान मढा येथील ह्या सायकल वैद्याकडे त्यांचा थांबा ठरलेला असतो. अटलास आणि हिरोहॉक त्या सायकलवैद्याकडे थांबणार असले तरी श्विन स्कॉट पुन्हा पुढे निघणार होते.
मढा गावापुढे थोडी चढण असल्याचे माहीत असल्याने त्याआधी श्विनने तिथे चहापान करायचे ठरवले होते. त्यामुळे समोरील क्षुधाशांतिगृहात चहापान करून श्विन स्कॉटने पुढे कूच केले.

थोडीशी चढण चढल्यावर श्विन आणि स्कॉट माळशेजजवळ पोचत होते. इतक्यात अटलास आणि हिरो हॉकने त्यांना गाठले. चौघेही पुन्हा एकदा एकापाठोपाठ जाऊ लागले होते. माळशेज घाटाचा उतार आता सुरू झाला होता. सगळेजण सावधपणे जात होते. आजूबाजूचा निसर्ग मोहात पाडत होता. मात्र घड्याळबाबा आता थांबू द्यायला तयार नव्हते. माळशेज घाटातील मंदिराजवळ अटलास आणि हिरो हॉकने थांबायचे ठरवले. मात्र श्विन स्कॉट न थांबताच पुढे जात राहिले. माळशेज घाटामध्ये श्विन आणि स्कॉटला दोन वेळा धोकादायक अनुभव आले होते. पहिला अनुभव आला तेव्हा दोघेही बसने मित्रांसह माळशेज घाटामध्ये सहलीला आले होते. त्यावेळी घाटातील बोगद्यातून सगळेजण पुढे जातात न जातात तोच दरड कोसळून बोगदा बंद झाला होता. जीव वाचल्याचं समाधान वाटलं तरी त्यावेळी बोगदा बंद झाल्यामुळे मार्ग बदलुन लोणावळ्यामार्गे परतावं लागलं होतं.
तर पुढच्या एक दोन वर्षात बसने अष्टविनायक दर्शन पूर्ण करून परतताना उतारावर बस बंद पडली होती आणि अख्खी रात्र उतारावरील रस्त्यावर बंद पडलेल्या बसमध्ये काढावी लागणार होती. तेव्हाही योगायोगाने एक वाहन मिळाल्याने सर्व भाविकांची सोय घाटाखालील एका गावात झाली होती. ह्याही वेळी जीवावरचे संकट टळले होते. ह्या दोन्ही घटनांना आता २०-२२ वर्ष झाली असली तरी त्या आठवणींनी माळशेज घाटातील उतार लवकरात लवकर पार करायचे दोघांनी ठरवले होते.
मधील काळात दोघांनी चारचाकी वाहनांनी अनेकदा अष्टविनायक यात्रा केली होती, तेव्हा माळशेज घाटातून न येता खोपोली घाटातूनच प्रवास केला होता. अर्थात स्कॉट नसताना श्विनने अष्टविनायक सायकल यात्रेहून परत येताना माळशेज घाटाचाच मार्ग स्वीकारला होता. यावेळी दोघेही एकत्र पुन्हा माळशेज घाटातून २०-२२ वर्षानंतर प्रथमच येत होते. त्यामुळे याआधीच्या माळशेज घाटातून येत असतानाच्या दोन्ही घटनांनी धास्ती वाटत होती.

माळशेज घाटातील उतारावर स्कॉटचा वेग चांगलाच मंदावला. त्यामुळे श्विनची आघाडी वाढू लागली. मध्यान्ह उलटून गेल्यामुळे श्विननेही आता माळशेज घाट उतरेपर्यंत न थांबता पुढे जाऊन कर्जत फाट्यापर्यंत सलग जायचे ठरवले. मात्र वाटेतील चढ उतार पाहता स्कॉटचा वेग वाढणार नाही याची कल्पना श्विनला आली. त्यामुळे श्विनने वाटेत जवळच्या राखीव कोट्यातील इंधनावर ताव मारण्याचे ठरवले. तो राखीव कोटा भरपेट नसला तरी अर्धा एक तास निश्चिती देणारा होता. राखीव कोट्यावर ताव मारल्यावर श्विन पुन्हा ताजातवाना झाला. थोडावेळ स्कॉटची वाट पाहिल्यावर स्कॉट तेथे पोचली. दोघांनी पुन्हा एकत्र सुरुवात केली तरी थोड्या वेळातच पुन्हा श्विनने आघाडी घेतली.
सातवाहन काळातील जुन्नरला जाण्याचा मार्ग दिसताच श्विनने छायाचित्रणाचा आनंद घेतला.


श्विन आणि स्कॉट धीम्या गतीने मात्र न थांबता अथकपणे जात होते. वैशाखरे गाव आल्यावर श्विनला हायसे वाटले. पुढे असलेल्या कर्जतफाट्यापाशी टोकावडे गावाआधी इंधनाची सोय होणार असल्याचे श्विनला ठाऊक होते. श्विनने आघाडी वाढवत कर्जत फाटा गाठला. तेथील उपहारगृहापाशी श्विन थांबत असतानाच स्कॉटही तेथे पोचली. मात्र श्विन स्कॉटला भरपेट न खाता हलके फुलके इंधन हवे होते, जे तिथे उपलब्ध नव्हते. त्यामुळे दोघांनी 'appy' वर समाधान मानायचे ठरवले. त्यांचे 'अपिपान' उरकत असताना अटलास आणि हिरोहॉक तेथे पोचले. त्या दोघांनी मात्र जडान्न स्वाहा करण्याचे ठरवले.
श्विन स्कॉट पुन्हा एकदा पुढे निघाले दोघांनीही आता थेट मुरबाड गाठूनच उदरभरण करण्याचे ठरवले.
वाटेतील निसर्ग मनाला मोहिनी घालत होता.


मात्र आता जठराग्नीही भडकू लागला होता. त्याला आहुती देण्याचीही निकड तीव्रतेने जाणवू लागली होती. टोकावडे सोडल्यानंतर दोघांनीही चांगलाच वेग  घेतला. मात्र पोटातील कावळे फारच ओरडू लागल्याने मुरबाड येण्याच्या काही अंतर आधी श्विनने जवळील उरलेला राखीव साठा संपवायचे ठरवले.
रस्त्याच्या कडेला थांबवून जवळील ग्लुकोज बिस्कीट संपवत असताना एक दुचाकीधारक श्विनजवळ आला. त्याच्याबरोबर एक लहान मुलगाही होता. तो दुचाकीधारक श्विन आणि स्कॉटसाठी पाण्याची बाटली आणि ग्लुकोज बिस्किटांचा पुडा घेऊन आला होता. श्विनला ती भेट स्वीकारण्यास प्रथम नकार दिला. मात्र त्या दुचाकीस्वाराने सांगितले की ती पाण्याची बाटली आणि ग्लुकोजचा पूडा श्विन स्कॉटला देण्यासाठी तो जवळपास  १५-२० किमी अंतरावरून श्विनस्कॉटच्या मागे आला होता. आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्या लहान मुलाचा त्या दिवशी वाढदिवस होता, त्यामुळे त्या वाढदिवसानिमित्त अष्टविनायक सायकल यात्रा करून आलेल्या श्विन स्कॉटला ती भेट द्यायची होती. यावर मात्र श्विन स्कॉटचा नाईलाजच झाला. ही भेट श्विन स्कॉट दोघांसाठीही अमूल्यच होती.

त्या दुचाकीस्वाराचे आभार मानत श्विन स्कॉट पुढे निघाले. दरम्यान विलास वैद्यला दूरध्वनी करून आपला ठावठिकाणा दोघांनी कळवला. दोघांनी मुरबाड गाठले खरे... पण इथेही दोघांना हवे तसे क्षुधाशांतिगृह हमरस्त्यालगत दिसले नाही . एव्हाना ४ वाजले होते. अंधार पडायच्या आत कल्याण गाठायचे दोघांनी ठरवले होते. त्यामुळे अधिक न थांबता दोघांनी पूढे जायचे ठरवले. मात्र थोड्याच अंतरावर एक क्षुधाशांतिगृह दिसले. म्हणून श्विन स्कॉट तेथे शिरले. मात्र इथेही क्षुधाशांती होणार नव्हती. मात्र तिथे चहा मिळणार होता. त्या दुचाकीस्वाराने दिलेल्या ग्लुकोजचा फडशा पाडत दोघांनी चहापान केले.
विलास वैद्य गोवेली फाटा येथे येणार होता. तिथपर्यंत जाण्यासाठी श्विन स्कॉटने वेग वाढवला. मात्र थोड्याच वेळात श्विनला मागील चाक जड वाटू लागले....
पुन्हा एकदा मागील अष्टविनायक सायकल यात्रेतील योगायोग जुळून आला होता. डोंबिवली सायकल क्लब मधील श्री अय्यर यांच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी सायकलयात्रा करताना श्विनची रबरी नळीला तीन वेळा छिद्र पडले होते. पहिल्यांदा महड पाली दरम्यान, दुसऱ्यांदा दौंड येथे आणि तिसऱ्यांदा मुरबाड मामनोली दरम्यान...!

याही अष्टविनायक सायकल सफरीदरम्यान योगायोग जुळून आला होता. महड, दौंड पाठोपाठ याही वेळेस मामनोलीजवळ श्विनच्या रबरी नळीला छिद्र पडले होते.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...