शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

अष्टविनायक सायकलयात्रा: उपोद्गघात

श्री गजानन म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आपली कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यास येणारी विघ्ने तो हरण करतो. म्हणूनच त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. वैशाखात झालेल्या छोट्या अपघातानंतर श्विन आणि स्कॉट यांची नियमित फेरी थांबली होती. ती सुरू करण्यासाठी निमित्त तर हवे होतेच. शिवाय अपघातातून बचावल्यानंतर पुन्हा क्रियाशील होण्यासाठी श्रीगणेशालाही वंदन करायचे होते. त्या दृष्टीने स्कॉटने श्विनसमोर अष्टविनायक सायकलफेरीचा प्रस्ताव ठेवला.

यापूर्वी श्विनची अष्टविनायक सायकलफेरी झाली होती. त्या अनुभवाच्या जोरावर श्विनने आराखडा आखला. मात्र डोंबिवली शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्तेविरहित मार्ग सरावासाठी संधी मिळू देत नव्हते. त्यामुळे सरावात नियमितता येत नव्हती. तरीही दोघांचा सायकलयात्रेचा निर्णय ठाम होता. यात्रेचा कालावधी, दिवस निश्चित झाले. दीपावलीच्या आधीच्या आठवड्यात अष्टविनायक दर्शन करून दीपावलीच्या पहिल्या दिवशी स्वगृही परतायचे ठरवले. मात्र त्याचदरम्यान लोकशाहीच्या देवतेचा उत्सव म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा दिवस या यात्रेच्या कलखंडादरम्यान येणार असल्याचे समजले. त्यामुळे श्विन स्कॉटने आपल्या यात्रेचा बेत पुढे ढकलला. त्यामुळे पुन्हा एकदा सरावाची संधीही मिळाली. दरम्यान वरुणास्त्रही अधूनमधून परजत असल्याने सायकलयात्रेवर काळे ढग पसरले होतेच.

अखेरीस ठरवल्या वेळेपेक्षा आणखी दोन आठवड्यानी म्हणजे दीपावली संपल्यानंतर एक आठवड्याने अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरले. ठाणे येथील श्री राजीव दुधालकर हेसुद्धा ताबडतोब यायला तयार झाले. मात्र गेली ३४ वर्षे माघी चतुर्थीनिमित्त कल्याण पाली सायकल यात्रा करणारे श्री विलास वैद्य अष्टविनायक यात्रेसाठी तयार नव्हते. अर्थातच श्विनने त्यांना पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरापर्यंत येण्याविषयी विचारताच विलासला मोह आवरला नाही. अखेरीस हो नाही करता करता त्याने अगदी आदल्या दिवशी होकार कळवला. श्विनला तयारीला वेळ मिळत नव्हता.

डॉ सुमित मोकल यांच्या नवीन शुश्रूषालयात श्विनने तर डॉ साहिर शेख यांच्या डोंबिवली येथील स्थलांतरीत नवीन शुश्रूषालयात स्कॉटने आपापली आरोग्यविषयक चाचणी आणि शुश्रूषा करवून घेतली. प्रवासात काही अनावस्था परिस्थिती उद्भवलीच तर त्यावर मात करण्यासाठी श्विनने साहिरच्या शुश्रूषालयातून काही उपकरणेही घेऊन ठेवली.
गेल्या वर्षीच्या डोंबिवली पणजी सायकल यात्रेच्या अनुभवाच्या जोरावर स्कॉटने बऱ्यापैकी तयारी केली. श्विनची तयारी मात्र आदल्या रात्री ११.३० पर्यंत सुरू होती.

अखेरीस डॉ सुनील पुणतांबेकर यांना सायकलयात्रेची कल्पना देऊन श्विन निद्रादेवीच्या स्वाधीन झाली.

२ टिप्पण्या:

  1. खुप छान उपक्रम आपण राबवलात , आपल्या या प्रवासात माझी पुणे शहर सोडून थेउर च्या चिंतामणीच्या प्रवासा दरम्यान भेट झाली होती, आपण मला थेऊरचा रस्ता विचारला आणि उत्सुकते पोटी मि आपली चौकशी केली त्यावेळी आपल्या या स्तुत्य उपक्रमा विषयी मला सांगितले नंतर आमच्या पञकार मिञाच्या ऑफिसला आपण बसलो चर्चा केली आणि चहा पाणी झाल्यावर आपणास आम्ही पुढच्या याञेला शुभेच्छा देऊन आपला निरोप घेतला नंतर आपली थेउर मधेही भेट झाली. ....
    खुप छान उपक्रम आहे तुमचा. ..शिवाय तुमच्या सहचारिणीचा सहभाग निश्चित कौतुकास्पद आहे. ......आयुष्याच्या वाटेवर प्रवास करीत असताना असे प्रसंग निश्चितपणे प्रेरणा देऊन जातात. .....आपले पुनश्च एकदा अभिनंदन. ...
    एक सुचना ही करतो अर्थात न राहून. ..
    शक्य झाल्यास पुढच्या वेळी या सोबतच एखाद्या ज्वलंत सामाजिक विषयावरही तुमच्या याञे दरम्यान प्रबोधन व्हावे. ..मग तो विषय सामाजिक सलोखा, स्री सन्मान, व्यसन मुक्ती, राष्ट्र प्रेम, इत्यादी. ..आपल्या आवडी नुसार. ....
    बाकी तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. .....
    शिवराम कांबळे
    संपादक
    नगरसेवा टाइम्स
    पुणे जिल्हा उपाध्यक्ष
    पञकार संरक्षण समिती

    उत्तर द्याहटवा
  2. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढील महिन्यात इतर १० जणांसह पुणे ते जम्मू सायकलप्रवास करणार आहोत त्यावेळी आरोग्यविषयक संदेश देत प्रवास करणार आहोत

    उत्तर द्याहटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...