एका बाजूला ऐतिहासिक सरसगड तर दुसरीकडे अंबा नदी यांच्यामध्ये वसलेल्या पाली गावात बल्लाळेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराचा आकार 'श्री' या अक्षराप्रमाणे आहे. भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले अष्टविनायकामधील हे एकमेव मंदिर आहे. बल्लाळाच्या भक्तीमुळे श्रीगजननाने येथे कायमस्वरूपी वास्तव्य केले. या बल्लाळेश्वराचा भक्त विलास (गजानन) वैद्य याच्यामुळे श्विनचेही बल्लाळेश्वराशी नाते जुळले होते.
काल रात्री पाली येथील भक्तनिवास येथे मुक्काम करत असता गणेशभक्तांचा एक मोठा गट दिसला. चौकशी करता त्या गटात पदयात्रा करत अष्टविनायकदर्शन करत असलेले ४० भाविक असल्याचे समजले. ते सर्वजण नवी मुंबईतील सारसोळे गावातील भाविक होते.
पाली येथील भक्तनिवासात शांत झोप झाल्यावर पहाटे आपसूकच जाग आली. भक्तनिवासात तिसऱ्या मजल्यावरील विश्रामगृहातून खाली उतरलो तर जणू आमच्यासाठीच चहा घेऊन एक बाई तेथे आल्या. चहा घेत आम्ही श्विन, स्कॉटच्या तब्बेतीची चौकशी केली. महड आणि पाली दरम्यानच्या प्रवासात त्यांची चांगलीच परीक्षा घेतली गेली होती. स्कॉटच्या रबरी नळीतील हवा कमी झाली होती. बल्लाळेश्वर आम्हाला लगेच जाऊ द्यायला तयार नव्हता. स्कॉटच्या रबरी नळीला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले होते. सुदैवाने बल्लाळेश्वराचा परम भक्त विलास आमच्याबरोबर होता. मात्र ते छिद्र अतिशय सूक्ष्म असल्याने नुसत्या डोळ्याने वा कानाने लक्षात येत नव्हते. मग पुन्हा चहाच्या निमित्ताने आम्ही चौघांनी एका क्षुधाशांतिगृहाकडे मोर्चा वळवला.
तेथे एका टोपात पाणी घेऊन ते छिद्र शोधत असतानाच पाली येथील शाळेतील एक शिक्षक त्यांच्या मुलासह तेथे आले. ते आम्हाला त्यांच्या घरी येऊन चहा नाष्टा करण्याचा आग्रह करू लागले. मात्र उशीर होत असल्याचे कारण सांगून आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. आमचे काम होऊन आम्ही चहापान केले, मात्र त्या शिक्षकांनी चहाचे पैसे आम्हाला देऊ दिले नाहीत. एव्हाना पाली गावात बऱ्यापैकी उजाडले होते. त्यामुळे श्विनने परिधान केलेले दिवे काढून टाकले.
पाली गाव सोडून पुन्हा खोपोलीच्या मार्गाला लागल्यावर मात्र श्विनला आपण केलेली चूक लक्षात आली. पाली खोपोली मार्गावर पूर्ण धुके पसरले होते. मुंगूस (विलास) ने लय पकडली असली तरी स्कॉट, श्विन आणि दुधालकर संथपणे जाऊ लागले. थोड्याच अंतरावर अष्टविनायक पदयात्रा करणारे भाविक एके ठिकाणी विश्रांती घेत असलेले दिसले. त्यांच्याबरोबर सामान वाहण्यासाठी आणि श्रमलेल्या भाविकांची मदत करणारे वाहनही होते.
श्विन, स्कॉट आणि दुधालकर यांना ते भाविक चहा बिस्किट घेण्यासाठी आग्रह करू लागले. मात्र विलास पूढे गेला असल्याचे सांगत त्यांना आम्ही नकार दिला. विलास पुढे पेडली गावातच आम्हा तिघांची वाट पाहत थांबला होता. तिथे पोचताच आम्ही क्षुधाशांती करून घेतली. दुधालकरांना रस्सावड्याचा मोह आवरला नाही. आमची वाटचाल थोडी उशिराने होत असली तरी अद्यापि राखीव वेळ हातात होता. मात्र पुढील रस्त्याने कालच आल्यामुळे त्या रस्त्याची भयानक स्थिती लक्षात घेता संथ तरी सातत्याने वाटचाल करणे गरजेचे होते. वाटेतील निसर्ग मन प्रसन्न करत होता.
आता श्विन आणि स्कॉट मुंगूस बरोबर जाऊ लागले होते. पण दुधालकर बऱ्याच मागे राहू लागले होते. मुंगुस पाठोपाठ श्विन आणि स्कॉट इतिहासकालीन उंबरखिंडीपाशी पोचले.
उंबरखिंडीची लढाई ही शिवाजीमहाराजांचे हेरखाते आणि विजिगुषी वृत्ती यांचा लक्षणीय विजय होता.
महाराजांवर मात करण्यासाठी दक्षिणेत उतरलेल्या शाहिस्तेखानाने पिरडा जिंकल्यावर कारतलबखानाला कोकणवर स्वारी करायला पाठवले. खानाने तो बोरघाट मार्गाने उतरणार अशी हूल उठवून दिली. राजांनी पेणच्या अवतीभवती आपले सैन्य जमवायला सुरुवात केल्याची बातमी खानाकडे आली. खानाचा प्रवास बोरघाटमार्गेच सुरू झाला, पण अचानक लोणावळ्याकडे न जाता तो थोडासा दक्षिणेकडे वळला. राजांपर्यत खानाचा बदललेला मार्ग पोहोचला. हा सारा दाट जंगलाचा भाग. खान कुरवंडा घाटात पोहोचला. राजांचे सैन्यही त्याच दिवशी कुरवंडा घाटातील जंगलात शिरले होते. खानाच्या टेहळणीपथकाने मार्ग निर्धोक असल्याची ग्वाही दिली. राजांना खानाचा बदललेला मार्ग कळायच्या आत खानाने कुरवंडा घाटातून उतरून राजांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना ठरली. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटात अंदाजे तीन किमी अंतरावर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग तीव्र उताराचा आणि एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल इतका अरुंद आहे. तेथून पुढे नदीच्या वळणापाशी चढाव चढून साधारण एक किमी अंतरावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली दीड किमी लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात. राजांनी आपले सैन्य उंबरखिंडीत मोक्याच्या जागी तैनात केले. सैन्याकडे तलवारी, धनुष्यबाण, बंदुका व मुबलक दगड-गोटे होते. राजे स्वत: खिंडीच्या तोंडावर असणाऱ्या टेकडीवर सज्ज झाले. मोगली सैन्याचा पसारा खूप मोठा होता. या चिंचोळ्या मार्गातून जाताना त्यांची पुरी दमछाक होत होती. मध्यानापर्यंत मोगली सैन्य चावनीपाशी आले. सूर्य तळपत होता. वाटेत पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यातच अचानक कर्णे वाजू लागले. खानाचे सैन्य व घोडे थबकले. काय झाले ते कळायच्या आत ‘हर हर महादेव’ची गर्जना खिंडीत घुमली आणि हल्ला झाला. मराठे कुठून मारा करताहेत हेच कळत नव्हते. खानाच्या सैन्याने मागे पळायचा प्रयत्न केला, पण मागची वाटही अडवली गेल्याचे आता लक्षात आले. मराठय़ांचा आवेश भयंकर होता. सारी परिस्थिती पाहता कारतलबखानाबरोबर असलेल्या रायबागन या शूर महिला सरदाराने खानाला शरण जाण्याचा सल्ला दिला. शेवटी कारतलबने आपला दूत राजांकडे पाठवला. राजांनी युद्ध थांबवले. कारतलबला अभय दिले. आपली सारी साधन संपत्ती आहे तिथेच सोडून कारतलबने निघून जावे. त्याच्या सैन्यातील स्थानिक लोकांना राजांकडे यायचे असेल तर त्यांना तशी अनुकूलता दर्शवावी यांसारख्या अटी खानापुढे ठेवल्या गेल्या. सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य करण्याशिवाय खानापुढे पर्याय नव्हता. कुरवंडय़ाला घाट चढून आल्यावर सैन्याकडे काहीही चीजवस्तू नाही याची खात्री करत राजांनी साऱ्या सैन्याला जाऊ दिले. उरलेला सारा दिवस राजांचे सैन्य खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू यांचे सामान, दागिने, घोडे, बैल इत्यादी प्राणी अशा गोष्टी शांतपणे गोळा करत होते.
वेगवान व सुनियोजित हालचालींनी अत्यंत कमी सैन्यबल असतानासुद्धा वीस हजार सैन्याचा संपूर्ण पराभव राजांनी केवळ हजारभर सैन्याच्या साहाय्याने केला.
अश्या उंबरखिंडीपाशी मुंगूस, श्विन आणि स्कॉट थांबले होते. तासाभराच्या अवधीने दुधालकर आले. तोपर्यंत मध्यानाची वेळही झाली होतीच. कारतलब खानाप्रमाणेच त्यांनीही भरपुर साधनसामुग्री घेतली होती. खानाप्रमाणेच हा पसारा दुधालकरांनाही त्रास देत होता. खानाला साधनसामुग्री काढण्याचीही संधी मिळाली नव्हती. त्याचप्रमाणे प्रचंड थकव्यामुळे दुधालकरांनाही जवळचा कॅमेरा काढून छायाचित्र घेण्याचेही त्राण उरत नव्हते. त्यांचीही अवस्था खानाप्रमाणेच बिकट झाली होती. अखेर उंबरखिंडीपाशीच त्यांनीही माघारीचा निर्णय घेतला. श्विन, स्कॉटने त्यांचा निर्णय मान्य केला.
थोड्या अंतरावर पुन्हा एकदा भरपेट नाष्टा केल्यावर श्विन, स्कॉट यांना विलास आणि दुधालकर यांनी निरोप दिला. मात्र एव्हाना सूर्य डोक्यावर तळपत होता आणि खोपोलीचा घाट चढायचा होता. ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा स्कॉट आणि श्विन तब्बल ३.३०- ४ तास मागे पडले होते. अखेरीस स्कॉट श्विनने घड्याळबाबांच्या धाकामुळे १० किमी अंतर प्रदूषणकारी वाहनांची मदत घेत पार केले आणि वेळ आणि श्रम या दोघांची बचत केली. त्यानंतर मात्र दोघांनी ताज्या दमाने वेगात लोणावळा येथील मनशक्ती केंद्र गाठले. तेथे क्षुधाशांती करून पुढील प्रवास सुरु केला. कामशेत येथील घाट चढून कामशेत गावपाशी पोचत असताना अत्यंत खराब रस्ता वाट पाहत होता.
त्यातच पावसाचे थेंबही स्वागत करू लागले. मात्र समोरील क्षितिजावर सूर्य दिसत असल्याने ते थेंब झेलत पुढे मार्गक्रमण सुरू ठेवण्याचे दोघांनी ठरवले. दोघांच्या या निश्चयाने चकित झालेल्या वरूणराजानेही फार जोर न धरता आपली अस्त्रे म्यानात ठेवली.
तळेगाव येथे गृहसंकुलात पोचताच नेहमीप्रमाणे तेथील सुरुक्षरक्षकाने अत्यंत प्रेमाने श्विन आणि स्कॉटचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा