शनिवार, २३ मे, २०२०

पंढरीची चुकलेली वारी:पुणे जम्मू सायकलसफर :भाग ४ - लेख ४

जागतिक, निधर्मी, खगोलशास्त्रावर आधारित शास्त्रीय सौर कँलेडर अर्थात भारतीय राष्ट्रीय कँलेडर नुसार: दिनांक १४ पौष १९४१


यूरोप खंडातील ख्रिस्ती लोकांपुरते मर्यादित, अशास्त्रीय आणि धेडगुजरी सौर कँलेडर म्हणजेच ग्रेगोरीयन कँलेडर नुसार दिनांक : ४ जानेवारी २०२०

जेमतेम ५०००० च्या आसपास लोकसंख्या असलेले फजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद हे शहर दोन शतकांपूर्वी मामदोतच्या नवाबाचे राजधानीचे ठिकाण होते. तीन वर्षांपूर्वी पहिला आंतरराष्ट्रीय कबड्डी सामना जलालाबाद येथेच खेळला गेला होता. सध्याचा उदयोन्मुख क्रिकेट खेळाडू शुभमन गिल हाही जलालाबाद येथीलच.

जलालाबाद येथील चौकात त्या मजूर संघाच्या अनोळखी सदस्यांनी आमचे स्वागत आणि आदरातिथ्य केल्यावर आम्ही पुढे निघालो. मात्र त्यावेळी त्या सदस्यांनी आम्हाला दुपारच्या जेवणासाठी एका गुरुद्वारातील लंगरमध्ये जाण्यास आवर्जून सांगीतले होते. ते लोक इतक्या पोटतिडकीने सांगत होते की जणू आम्हाला जेवण देणे हे त्यांचेच कर्तव्य होते. आम्हाला केवळ चहा बिस्किटे देऊन त्यांचे समाधान झाले नव्हतेच. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीही त्या लंगरचा लाभ घेण्यासाठी उत्सुक होतो.

त्या मजूर संघाच्या सदस्यांनी साधारण २०-२५ किमी अंतरावर लंगर असल्याचे सांगितले होते. तास सव्वा तासाची दौड झाल्यावर सगळ्यांची गती मंदावली होती. एकादशी आणि निरूपमा भावे ह्या आघाडीवर होत्या. मात्र त्यांचीही गती मंदावली होती. जलालाबाद येथून सगळ्यात शेवटी सुरुवात करणाऱ्या फुजीने त्यांना गाठले. सगळेजण मंदावल्यावर फुजीने आघाडी घेतली. थोडा अंदाज घेत फुजीने एका गुरुद्वारासमोर थांबा घेतला आणि तेथे चौकशी केली. एकादशी आणि निरूपमा भावे बरोबरच होत्या. जलालाबाद येथे आम्हाला सांगितलेला गुरूद्वारा तोच होता. हे कळताच सगळ्यांनाच हायसे वाटले.




 लोधारण गावाजवळील ह्या परगटसाहिब गुरुद्वारासाहिब येथे लंगरमध्ये आमची व्यवस्था होणार होती. सगळे सायकलपटू थोडे निर्धास्त झाले. भूक तर लागली होतीच. आम्ही गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत माझी मावशी म्हणजे निरूपमा भावे हिला एक अनोळखी फोन आला. तो माणूस लुधियानाहून बोलत होता. आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे पाहूणचारासाठी यावे ह्यासाठी तो अक्षरशः गयावया करत होता. अबोहार येथील प्रसारमाध्यमांनी आमच्याविषयी दिलेली माहिती लुधियानालाही पोचली होती.

खरतर पुणे जम्मू सायकलसफर ठरली तेव्हाच सायकलच्या भारतातील ह्या पंढरीला जाता यावे असे श्विनला वाटत होते. तमाम भारतीयांना सायकलचे वेड लावणारे ओमप्रकाश मुंजाल ह्यांचे हे गाव. ओमप्रकाशजींनी १९४४ साली त्यांच्या भावांबरोबर अमृतसर येथे सायकलचे सुटे भाग विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे ते लुधियानाला स्थायिक झाले. पण केवळ सुटे भाग विकण्यापेक्षा आपणच सायकल का तयार करू नये ह्या ध्यासाने त्यांना घेरले. आणि १९५६ साली सायकल निर्मितीसाठी त्यांनी 'हिरो सायकल्स' ची स्थापना केली. सायकलनिर्मितीच्या ध्यासाने त्यांना इतके झपाटले होते की सुरुवातीच्या काळात आपल्या बंधूशेजारी उभे राहून दाढी करतानाही ते व्यावसायिक चर्चा करत असत आणि निर्णयही घेत असत. ओमप्रकाशजी केवळ व्यावसायिक नव्हते तर माणूस म्हणूनही ते महान होते. कंपनीचा व्यवसाय व पसारा वाढल्यावरही दूरदूरच्या गावातून आलेला एखादा विक्रेता जेव्हा लुधियानाला भेट देत असे तेव्हा त्याच्या स्वागताला ओमप्रकाशजी स्वतः जात असत. म्हणूनच १९५६ साली वर्षभरात ६३९ सायकलचे उत्पादन करणारी हिरो सायकल सात दशकांनंतर दररोज १९००० सायकलचे उत्पादन करू लागली होती. स्थापनेनंतर अवघ्या तीन दशकात म्हणजे १९८६ साली जगातील सर्वोधिक सायकलींचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून हिरो सायकल्सचे नाव गिनीज बुक मध्येही नोंदले गेले होते.

२०१५ साली पत्नीचे निधन झाल्यावर सायकलचा भारतातील हा महर्षी खचून गेला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्यांनीही जगाचा निरोप घेतला. १३ ऑगस्ट २०१५ ला त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा ८७ वा वाढदिवस फक्त १३ दिवस लांब होता. अर्थातच आता लुधियानाला जाऊन ह्या ऋषितुल्य माणसाची भेट होणे शक्य नव्हते.

 अस्मादिकांची पहिली सायकलही 'हिरो'च होती. तिने अस्मादिकांना तब्बल २०-२२ वर्ष साथ दिली होती. ओ पी उर्फ ओमप्रकाशजींना भेटता आले नाही तरी किमान त्यांचा कारखाना पाहता यावा, मुंजाळ कुटुंबातील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटता यावे ही सुप्त इच्छा अस्मादिकांना होतीच.

त्यामुळे लुधियाना आपल्या वाटेपासून लांब असल्याचे माहीत असूनही अस्मादिकांनी त्या फोनकर्त्याला विचारले, 'आम्ही लुधियानाला आलो तर मुंजाल कुटुंबाशी आम्हाला भेट घेता येईल का'. समोरील माणसाने तत्परतेने ' मी नक्कीच प्रयत्न करतो असे उत्तर दिले'. सगळ्यांना इतके लांब जाता येणे शक्य नव्हते. तरी फुजीला येथेच टेम्पोत टाकून येथूनच बसने लुधियानाला जाऊन रात्रीपर्यंत फिरोजपुरला पोचावे किंवा फिरोजपुरला गेल्यावर रातोरात मावशीसह लुधियानाला जाऊन दुसऱ्या दिवशी परत यावे असा विचार अस्मादिकांच्या मनात थैमान घालू लागला होता. पंजाबमध्ये जाऊन लुधियानाला न जाणे म्हणजे पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन न घेण्यासारखेच अस्मादिकांना वाटत होते. खरतर त्यावेळी लुधियाना किती लांब आहे ह्याचा अंदाजही नव्हता. फोनकर्त्याला,' विचार करून कळवतो असे सांगून अस्मादिकांनी फोन ठेवला.

लंगरमधील भोजनाने सगळ्यांचाच अंतरात्मा तृप्त झाला. त्यामुळे सगळ्यांनीच पुढे फिरोजपुरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. आता फिरोजपुर फार लांब राहिले नव्हते. जेवण करून निघेपर्यंत जेमतेम २ वाजले होते आणि फक्त २५-३० किमीचा पल्ला बाकी होता. मात्र फिरोजपुरला लवकर पोहोचून एका महत्वाच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचीही ईच्छा होती. अमृतसर जवळील अट्टारी सिमारेषेजवळ होणाऱ्या सैन्याच्या कवायतीप्रमाणे फिरोजपुरजवळील हुसैनिवाला सीमारेषेवरही सैन्याची कवायत होत असल्याची बातमी आम्हाला कळली होती. मुख्य म्हणजे अट्टारी पेक्षा हुसैनिवाला येथे होणारी कवायत व्यवस्थित पाहता येते असेही समजले होते. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष फिरोजपुरकडे लागले होते. तरीही घड्याळबाबा मात्र आज आरामात जात असल्यामुळे फार तातडी करण्याची गरज नव्हती.

अर्थातच ह्यादरम्यान लुधियानामधील फोनविषयी मात्र विस्मरण झाले. प्रत्यक्ष विठ्ठल नसला तरी पंढरीचे महत्व कमी होत नाही, पंढरीची पुण्याई कमी होत नाही. त्याचप्रमाणे ओमप्रकाशजी नसले तरी लुधियानाचे सायकलजगतातील महत्व कमी झाले नव्हते. आम्ही मात्र ह्यावेळी कळत नकळत पंढरीच्या वारीला मुकलो होतो.

५ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद. तुमच्या सदिच्छा पाठीशी आहेत त्यामुळेच लिहायला हुरूप येतो

      हटवा
  2. छान लिहिलं आहेस.
    तुझा हिरो सायकलचा कारखाना पाहण्याचा मनात असूनही हुकल हे वाईट, पण आम्ही आमच्या पाकिस्तान मैत्री यात्रे वेळी तो छान पाहिला होता.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हम्म तो कारखाना पहायचे राहिले ह्याची खंत आहेच. पण आपले नाव कळेल का

      हटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...