कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र येथून मोहिमेला सुरुवात करत असताना सगळे सायकलस्वार एका रांगेत जाऊ लागले. केंद्राच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारापर्यंत थोडा चढ आहे. सर्वानन हा आमचा मुख्य वाटाड्या होता. त्यामुळे अर्थातच तो सगळ्यात पुढे होता. त्याच्या मागोमाग इतर सायकलस्वार जात होते. सगळ्यात शेवटी अस्मादिकांची वर्णी लागली होती. माझ्या पुढे होत्या आमच्या संघातील सर्वात ज्येष्ठ सायकलपटू अरुणा लागू.
सर्वाननने कूच करताच इतर सगळे त्याच्या पाठोपाठ निघाले. चढ चढतानाच अरुणा लागू ह्यांच्यापुढील संघ आणि अरुणा लागू ह्यांच्यामध्ये अंतर पडले. माझी अपेक्षा होती की मुख्य रस्ता सुरु होताच सगळेजण रांगेत थांबले असतील. मी आणि अरुणा लागू मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पडलो तर कोणीच दिसेना. डावीकडे जायचे नाही हे माहीत होते. मात्र उजवीकडे गेल्यावर लगेचच दोन रस्ते फुटले होते. त्यातील नक्की कोणत्या रस्त्याने जायचे? समोर कोणत्याही रस्त्याला पुढील सायकलस्वार दिसत नव्हता.
खरतर सगळ्यांना मोहीम सुरू करतानाच एक सूचना दिली होती ... look back. आपल्या मागील सायकलपटु आपल्यामागे आहे ह्याची खात्री केल्याशिवाय पुढे जायचे नाही. बहुधा मोहीम सुरू होत असल्याच्या उत्साहाने त्या सूचनेवर मात केली होती. साहजिकच आम्ही दोघंही लगेचच थांबलो. आजूबाजूच्या लोकांना इतर सायकलस्वार कोणत्या रस्त्याने गेले आहेत हे विचारून उजवीकडचा रस्ता पकडला. आमचे सहाय्य वाहन मागून येणार होते.
मी आणि अरुणा लागू पाठोपाठ लागू जाऊ लागलो. रस्ता फार रुंद नसला तरी फार रहदारीही नव्हती. जेमतेम १०-१५ मिनिटे सरळ गेलो तोच एक चौक लागला. आम्ही सरळ जाऊ लागलो तोच तमिळ भाषेत काही लोक ओरडू लागले. भाषा येत नसल्याने आम्हाला काही कळत नव्हते पण त्यांच्या खाणाखुणा आम्हाला उजवीकडे वळायला सांगत होत्या. मी गुगलकाकांना विचारले तर ते सरळ जायला सांगत होते. इथे वळायचे असते तर एका सायकलपटूने तरी थांबणे आवश्यक होते. अखेरीस सरळ सर्वाननला फोन लावला. तेव्हा त्याने उजवीकडे वळायला सांगितले. तिथे एक किल्ला असल्याने तिथे जायचे असल्याचे त्याने सांगितले. वळल्यानंतर थोड्याच अंतरावर तो किल्ला असल्याचे त्याने सांगितले.
आमची दुक्कल वळली आणि खरोखरच काही अंतरावर एक भुईकोट किल्ला दिसला. अरुणा लागू ह्या दुर्गप्रेमी आहेत. त्यामुळे त्या लगेचच खुष झाल्या. आमचे इतर सहकारी एव्हाना तिथे स्थिरावले होते. तिथे काही सैनिकी शिस्तीतील लोक आम्हाला दिसले. आमच्या सहकाऱ्यांची त्यांच्याशी गट्टी जमली होती. त्यांच्याबरोबर छायाचित्रे घेण्यात आमचे सहकारी दंग होते. तिथे गेल्यावर समजले की ते कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्पातील कर्मचारी होते. कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प (KKNP) हा तामिळनाडू येथील तिरूनवेली जिल्ह्यातील राधापुरम तालुक्यातील अणुप्रकल्प आहे.
१८ व्या शतकात त्रावणकोर राज्यात तटरक्षक दुर्ग म्हणून वट्टाकोट्टई किल्ला बांधला गेला. ह्या किल्लाच्या बांधणीमध्ये त्रावणकोरच्या राजाचा विश्वासू सहकारी मार्तंड वर्मा तसेच डच नौदल अधिकारी कॅप्टन युस्तचियस डी लॅनॉय ह्यांचे मोठे योगदान आहे. हा डच सेनानी त्रावणकोरच्या सैन्यात कसा हा इतिहास रोमांचक आहे.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीस त्रावणकोरचा शासक मार्तंड वर्मा ह्याने विस्तारवादी धोरण स्वीकारत मलबार किनारपट्टीवरील अनेक प्रदेश जिंकले. तिथे असलेल्या डच ईस्ट इंडिया कंपनीची मसाल्याच्या व्यापाराची मक्तेदारी त्रावणकोरच्या राजाने मोडीत काढली. मग डचांनी कोची, थेक्कुमकुर, वडाक्कुमकुर, पुरक्कड, कोल्लम आणि कायमकुलमच्या राज्यकर्त्यांशी युती केली. नंतर डचांनी त्रावणकोरच्या राजाला युद्ध करण्याची धमकी दिली. मार्तंड वर्माने ही धमकी फेटाळून लावली. त्याने उत्तर दिले की तो तर काही दिवस युरोपवर आक्रमण करण्याचा विचार करत होता.
डचांनी सुरुवातीच्या मोहिमेत लष्करी यश मिळवले. मात्र अखेरीस कोलाचल येथील लढाईत डचांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले. नंतर मार्तंड वर्माने त्यांना त्यांची शस्त्रे परत दिली आणि त्यांना त्रावणकोरच्या सैन्यात सामील होण्यास सांगितले. युस्टाचियस डी लॅनॉय आणि ड्युवेन्सचॉट यांच्यासह अनेक युरोपियन कैद्यांनी ही ऑफर स्वीकारली. कोलाचेलमधील डचांचा पराभव हा त्रावणकोर - डच युध्दाचा टर्निंग पॉइंट होता. डी'लेनॉय यांनी पुढील दोन दशके त्रावणकोर राज्याची सेवा केली आणि त्रावणकोर सैन्याच्या वालिया कपिथान (वरिष्ठ ऍडमिरल) या पदावर त्यांची बढती झाली. संपूर्ण त्रावणकोर सैन्याचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे त्यांनी त्रावणकोर सैन्याला युरोपियन शैलीतील लष्करी कवायती आणि लष्करी डावपेचांचे शिक्षण दिले. त्यांना उदयगिरी हा किल्ला देण्यात आला. स्थानिक पातळीवर हा किल्ला ' दिल्लानई कोट्टा ' (डी लेनॉयचा किल्ला) म्हणून ओळखला जातो. कुलाचल युध्दाचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे त्रावणकोर राज्याने काळी मिरी व्यापार ताब्यात घेतला. डच या पराभवातून कधीच सावरले नाहीत आणि यापुढे मोठ्या वसाहतींचा धोका निर्माण झाला नाही
याच डी लेनॉयने त्रावणकोर मध्ये केलेल्या संरक्षण किल्ल्यांचा एक भाग म्हणून वट्टाकोट्टाईची पुनर्रचना केली. बंगालच्या खाडीकिनारी असलेला हा किल्ला ग्रॅनाईट ब्लॉक्सचा बनलेला आहे. आज ह्या किल्ल्याचा काही भाग समुद्रात पसरलेला आहे. असे म्हटले जाते की किल्ला आहे तो भाग काही काळ पांडवांच्या ताब्यात होता. किल्ल्याच्या भिंतीवर माश्यांच्या संकल्पनेनुसार नक्षी आहे ती पांडवांचे प्रतिनिधीत्व करते. किल्ल्यावर असलेल्या परेड मैदानावरून एका बाजूला बंगालच्या उपसागराचे धसमुसळे पाणी दिसते तर दुसरीकडे अरबी समुद्राचे शांत पाणी दिसते. येथील आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे काळ्या वाळूचा समुद्रकिनारा.
हा किल्ला बघण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत जाता येते. कन्याकुमारी स्टेशनपासून वाहतूकसेवा उपलब्ध आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा