शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

पाहुणचार (कन्याकुमारी चेन्नई सायकलसफर भाग ५)


सर्वानन सगळ्यांच्या आधी तामिळनाडू येथे पोचला होता. सुनिता आणि अवनी ह्यांनी कन्याकुमारी येथे जाण्यासाठी रेल्वे मार्ग निवडला तर आम्ही उर्वरित सात जण त्रिवेंद्रम पर्यंत हवाई मार्गाने जाऊन पोचलो.

आमचा गट मुंबईहून त्रिवेंद्रम येथे विमानाने पोचला तेव्हा आम्हाला घेण्यासाठी त्रिवेंद्रम वनवासी कल्याण आश्रमातील सहकारी त्रिवेंद्रम एअरपोर्ट येथे आले होते. त्यांच्या गाडीतून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.  विमानतळापासून साधारण १० किमी अंतरावरील उल्लुर ह्या गावी एका टुमदार बंगल्यामध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती. 

केरळ येथील वनवासी कल्याण केंद्राचे Vice President श्री मधुसूदन ह्यांच्या एका नातेवाईकांचे ते घर होते. त्यांच्या घरी मल्याळम वगळता भाषा येत नव्हती. मधुसूदनजी स्वतःही मितभाषी होते. मात्र ती कसर केंद्राचे केरळ येथील सेक्रेटरी श्री देवकुमार हे भरून काढत होते.

श्रीकुमार, श्री मधुसूदन आणि श्री देवकुमार हे तिघेही खरतर आम्हाला प्रथमच भेटले होते. मात्र त्यांच्याशी बोलताना आम्ही प्रथमच भेटत आहोत याची जाणीवही होत नव्हती. गप्पा रंगत असल्या तरी दुसऱ्या दिवशी तेथून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करायचा होता. अर्थातच आम्हाला शुभेच्छा देऊन श्रीकुमार आणि श्री देवकुमार परतले. 

दक्षिण भारतामध्ये भाषेपेक्षा जास्त अडचण येते ती लिपीची. मात्र आमची ती अडचण सोडवण्यासाठी आमच्याबरोबर मधुसूदनजी होतेच. दुसरे दिवशी सकाळी ते आमच्याबरोबर तेथील बस स्थानकापर्यंत आले होते. मात्र तेथील अगम्य लिपीमूळे कन्याकुमारी येथे जाणारी बस नेमकी कोणत्या फलाटावर उभी आहे हे कळणे अवघड होते. बहुधा आमची अडचण ओळखून श्री मधुसूदनजी आमच्या मागोमाग बस स्थानकात शिरले. आम्हाला योग्य बसमध्ये तर त्यांनी बसवलेच. मात्र बस निघेपर्यंत ते तिथे उभे होते. आपल्या घरातील सदस्य गावाला जात असताना बस दिसेनाशी होईपर्यंत हात हलवणाऱ्या आप्तस्वकीयाप्रमाणे ते खरोखरच बस जाईपर्यंत थांबले होते. 

सायकल प्रवासात बघायला मिळणाऱ्या स्थळांपेक्षा मला महत्वाचे वाटतात ते हे सुहृद! हे सखे सोबती काही तास आपल्याला भेटतात मात्र हा ठेवा पुढे आयुष्यभर पुरणारा असतो. ह्यापेक्षा मोठी संपत्ती ती काय?

दरम्यान अवनी आणि सुनिता रेल्वेने नागरकोविलपर्यंत जाणार होत्या. आमची बसही त्रिवेंद्रम पासून नागरकोवील येथेच जाणार होती. आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही सगळेच तिथे एकाच वेळी पोचणार होतो. मात्र मुंबईच्या traffic पेक्षाही संथ जाणाऱ्या रस्ता वाहतुकीमुळे आमची बस अगदी सूशेगात जात होती. आम्ही नगरकोविल येथे पोचेपर्यंत अवनी आणि सुनिता ह्यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रही गाठले होते. 

नगरकोवील येथे क्षुधाशांती करून आम्हीही विवेकानंद केंद्र गाठले खरे.... मात्र... इथे एक वेगळेच स्वागत अनुभवास आले.

केंद्राचे सर्वेसर्वा श्री राजकुमार ह्यांनी आमच्या निवासाची नेमकी व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे आमच्या आधी पोचलेले सतीश दप्तरी, संजय, अवनी आणि सुनिता ह्यांनी स्वतःच बुकिंग करून रूम घेतली होती. आम्हाला एक मोकळा hall निवडावा लागला ज्यामध्ये झोपण्यासाठी ना पुरेश्या सतरंज्या होत्या ना जागा. 

अखेरीस नाईलाजाने तो हॉल ताब्यात घेऊन आम्ही विवेकानंद रॉक येथे गेलो.




आम्ही विवेकानंद रॉक येथे असतानाच सर्वानन विवेकानंद केंद्र येथे पोचला. त्यानेही एक वेगळी रूम बुक केली. त्याला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण विवेकानंद केंद्र येथे परतलो. 

कन्याकुमारी येथे होणारा सूर्यास्त पाहण्यासाठी अवधी फारच थोडा उरला होता. श्री राजकुमार ह्यांना सांगून आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी निघालो. सर्वानन वायू वेगाने निघाला, मात्र अरुणा लागू ह्यांची सायकल वेगच घेईना. बाकी सायकलपटू सर्वाननच्या मागे दौडत गेले. मात्र मी आणि प्रमोद असे दोघेजण अरुणा लागू ह्यांच्यासाठी कमी वेगात जाऊ लागलो. पण त्यांच्या वेगाने सूर्यास्त गाठता येणार नाही हे लक्षात आले. मग त्यांना कुठे यायचे ते सांगून मी आणि प्रमोद पुढे निघालो. 



 अंधार पडायच्या आत आम्ही किनारा गाठला खरा पण सूर्याने आम्हाला अस्त पाहू दिला नाही. आधी पोचलेले आमचे चार शिलेदार मात्र वेळ साधू शकले. अखेरीस तिमिराच्या साथीने आम्ही विवेकानंद केंद्र गाठले तेव्हा साधारण सात - साडेसात वाजले असावेत.

श्री राजकुमार ह्यांना संपर्क साधून आम्ही परतल्याची वर्दी दिली तर ते म्हणाले ताबडतोब जेवायला या. ते स्वतः आणि इतर काही जण आमची जेवणासाठी वाट पाहत आहेत. आम्हीही त्वरा करत जेमतेम सायकल ठेवून त्यांनी सांगितल्या ठिकाणी पोचलो. मात्र तिथे ना राजकुमारजी होते ना इतर कोणी कार्यकर्ते. त्या मेस मधील लोकांनी आम्हाला जेवण संपल्याचे सांगितले. काही पोळ्या आणि लोणचे इतकेच शिल्लक होते. राजकुमार ह्यांना फोन केल्यावर १०-१५ मिनिटांनी ते उगवले. आल्यावर कोठून तरी थोडी भाजी त्यांनी आणली. ना ती भाजी पुरेशी होती ना पोळ्या. त्यांना ह्या अव्यवस्थेबद्दल विचारले तर ते उलट सांगू लागले की त्यांना नेमके कितीजण येणार, त्यात पुरुष किती, स्त्रिया किती हे कळवले नव्हते. त्यामुळे रुमची व्यवस्था होऊ शकली नाही, तसेच जेवणाच्या अव्यवस्थेबद्दलही ते थातुर मातुर कारणे देऊ लागले. मी त्यांना ताबडतोब कित्येक दिवस आधी पाठवलेला मेसेज आणि नंतर फॉलोआप साठी पाठवलेले सविस्तर मेसेज दाखवले आणि फोनबद्दल ही आठवण करून दिली. तेव्हा मात्र त्यांनी कार्यबाहुल्यामुळे अव्यवस्था झाल्याचे कबूल केले. 

अगत्याशिल केरळ राज्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे, तसाच तामिळनाडूमधील कटू अनुभवदेखील ह्यापूर्वी घेतला आहे. मात्र फक्त २४ तासात केरळ मधील त्रिवेंद्रम आणि तामिळनाडू येथील कन्याकुमारी ह्या दोन ठिकाणच्या पाहुणचारात जमीन अस्मानाचा असलेला फरक जाणवत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...