सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

तिरूचेंदुर (कन्याकुमारी चेन्नई सायकल सफर भाग ११)



तिरुचेंदुर हे शहर तामिळनाडू राज्याच्या आग्नेय दिशेला वसलेले आहे. भगवान मुरुगन (कार्तिकेय) ह्या देवाच्या प्रमुख सहा मंदिरांपैकी एक मंदिर येथे आहे. शहरातील लाल मातीमुळे ह्या शहराला तिरूचेंदुर हे नाव पडले. 

अशी अख्यायिका आहे की भगवान मुरुगन ह्यांनी सुरपद्मन ह्या राक्षसाचा या ठिकाणी पराभव केला होता. नंतर देवी, देवता ह्यांना पर्वत, समुद्र आणि नदी असलेल्या ठिकाणी भगवान मुरुगन ह्यांची पूजा करायची होती. त्यामुळे त्यांनी तिरूचेंदुर हे ठिकाण निवडले. समुद्रकिनारी वसलेले भगवान मुरुगन ह्यांचे हे एकमेव निवासस्थान आहे असे म्हटले जाते. येथील मंदिर अतिशय प्राचीन आहे. 

पोर्तुगीजांशी झालेल्या युध्दात तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिर १६४६ ते १६४८ या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले होते. स्थानिक लोकांनी त्यांचे मंदिर मुक्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. कालांतराने डचांनी मंदिर रिकामे केले. मात्र, निघताना त्यांनी षण्मुखर नावाच्या मिश्रधातूपासून बनवलेल्या २ उत्सव मूर्ती चित्रित केलेले शिल्प काढून टाकले आणि ते सोबत घेतले. मात्र त्यांच्या सागरी प्रवासादरम्यान, त्यांना जोरदार वादळाचा सामना करावा लागला आणि मूर्ती चोरल्याची चूक त्यांना लक्षात आली. त्यांनी ती मूर्ती समुद्राच्या मध्यभागी टाकली आणि वादळ लगेच थांबले. नंतर, मुरुगनचे निस्सीम भक्त वडामलियप्पा पिल्लई यांना स्वप्नात मुरुगनने दर्शन दिले आणि समुद्रात जिथे मूर्तीचा त्याग करण्यात आला होता ती जागा दाखवली. तिरुचेंदूर मंदिरातील वदमलैयप्पा पिल्लई यांनी मासेमारीच्या बोटीतून घटनास्थळी जाऊन १६५३ मध्ये मूर्ती मिळवली. ही कथा मंदिराच्या आतील चित्रांमध्ये दर्शविली आहे.

आम्ही तिरूचेंदुर शहरात पोचलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी दिसत होती. आम्ही सर्वाननच्या मागोमाग देवळापाशी पोचलो. देवळाच्या आवारात भगवान मुरुगन ह्यांचे वाहन असलेले मोर मोठ्या संख्येने दिसत होते.

सर्वाननने आम्हाला सांगितले की आम्ही गेलो तो ऐप्पासी ह्या तमिळ महिन्यातील मधील स्कंध षष्ठी ह्या वार्षिक उत्सवाचा दिवस होता. तमिळ सुट्ट्या, व्रत, सणांच्या बहुतेक तारखा तमिळ दिनदर्शिकेवर आधारित असतात. पोंगल, पुथंडू, चित्र पौर्णिमा, व्यास पूजा, आदि पूरम, श्री कृष्ण जयंती, कार्तिकाई दीपम हे काही प्रमुख तमिळ सण आहेत, ज्यांच्या तारखा तमिळ कॅलेंडरवर आधारित आहेत.

तमिळ कॅलेंडर हे शालिवाहन शकाप्रमाणे चांद्र कॅलेंडर नसून ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे सौर कॅलेंडर आहे. आपल्या देशाचे जे अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर आहे तेही सौर कॅलेंडर आहे.

तामिळ कॅलेंडर ६० वर्षांचे चक्र फॉलो करते. आम्ही सायकल सफर करत होतो त्या तामिळ वर्षाचे नाव सुभकृत असे होते. तमिळ नवीन वर्ष मेष संक्रांतीला सुरू होते ज्या दिवशी ख्रिस्ती कालगणनेनुसार १४ एप्रिल हा दिनांक असतो. (भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा नववर्ष दिन असतो त्या दिवशी ग्रेगोरियन दिनांक लीप वर्ष वगळता २२ मार्च असतो, लीप वर्षात २१ मार्च असतो). तमिळ कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याचे नाव चिथिराई असे असून नववर्षदिन - दिनांक चिथिराई १ हा पुथंडू म्हणून साजरा केला जातो.

तामिळ महिने संक्रांतीच्या दिवशी सुरू होतात. तामिळ कॅलेंडरमधील महिन्यांच्या दिवसांची संख्या २९ ते ३२ दिवसांच्या दरम्यान असते. तमिळ कॅलेंडरच्या महिन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -

चिथिराई (एप्रिल-मे), 

वैकासी (मे-जून), 

आनी (जून-जुलै), 

आडी (जुलै-ऑगस्ट), 

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर), 

पुरातासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) , 

ऐप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर), 

कार्तिकाई (नोव्हेंबर-डिसेंबर), 

मार्गझी (डिसेंबर-जानेवारी), 

थाई (जानेवारी-फेब्रुवारी), 

मासी (फेब्रुवारी-मार्च), 

पंगुन (मार्च-एप्रिल). 

तिरुचेंदुर येथील मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात, ज्यात मासी महिन्यातील ब्रह्मोत्सवम, चिथिराईत १० दिवस वसंतोत्सव, वैकासी विसकम १२ दिवस आणि ऐप्पासी मधील स्कंध षष्ठी यांचा समावेश आहे. अवनी महिन्यातील पेरुंथिरुनाल आणि मासी महिन्यातील पेरुंथिरुनाल असे दोन महाउत्सव आहेत जे १२ दिवसांचे आहेत.

तिरुचेंदूर येथे १२ दिवस चालणाऱ्या मासी थिरुविझा उत्सवासाठी बरेच लोक जमतात. कयामोझी अथिथा नादरहल अरकट्टलाई मंडहपदी समिती उत्सवाच्या सहाव्या आणि सातव्या दिवशी कार्यक्रम आयोजित करते. उत्सवाच्या दहाव्या दिवशी, तिरुचेंदूर मंदिराचे अध्यक्ष भगवान सन्निधी स्ट्रीटमधील थिरुनेलवेली दक्षिणमारा नादर संगममध्ये विशेष हजेरी लावतात. तिरुचेंदूर येथील श्री सुब्रमण्यवामी मंदिराच्या मासी मगम उत्सवात हजारो भाविक पूजा करतात. अनेक शतकांपूर्वी अथिथा नाडर कुळाने हा उत्सव सुरू केला होता आणि त्यात पाली-विदलाई एरिधाल सारख्या धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

स्कंध षष्ठी ह्या वार्षिक उत्सवाच्याच दिवशी आम्ही तिथे जाणे ही पर्वणीच होती. मात्र मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो. सर्वाननने चौकशी केली असता आम्हाला समजले की सकाळी ८ वाजता जे रांगेत उभे राहिले होते ते आत्ता म्हणजे संध्याकाळी ५ वाजता दर्शन घेऊन बाहेर पडत होते. भगवान मुरुगन ह्यांच्या मूर्ती ऐवजी त्यांच्या वाहनाच्या दर्शनाचा लाभ घेऊन आम्ही मंदिराच्या दुसऱ्या बाजूस गेलो. तिथे अथांग सागर पसरलेला होताच. मात्र जणू त्याला आव्हान देण्यासाठी अलोट जनसागरही पसरला होता.




४ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...