शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

आधी पोटोबा (कन्याकुमारी चेन्नई सायकल सफर भाग ९)



अधिरसम आणि चहा हे इंधन जठराग्नीमध्ये भरल्यानंतर आमची वाहने वेगात जाणे अपेक्षित होते. अजून जवळपास ७० किमी अंतर बाकी होते आणि साधारण दोन थांबे घ्यावे लागणार होते. त्यापैकी एक जेवणाचा म्हणजे साधारण तासभराचा. तसेच अरुणा लागू ह्यांच्या वेगाने जायचे तर आणखी एक तिसरा थांबा घ्यावा लागणार होता. काम - काळ - वेग हे त्रैराशिक मांडले तर अरुणा लागू ह्यांच्या वेगाने अंधाराच्या आत गंतव्य स्थान गाठणे अशक्य होते. तसेच त्या स्वतः आणि आमचा सहाय्य वाहन चालक सतीश दोघांनाही गुगल मॅप समजत नव्हता. हा सर्व विचार करता मी अरुणा लागू ह्यांना जेवण होईपर्यंत सहाय्य वाहनात बसायला सांगितले. तसेच जेवण झाल्यावर पुढचा अंदाज घेऊ असेही सांगितले.

अरुणा लागू आता सायकल चालवणार नसल्याने मी, सर्वानन आणि प्रसाद वेगात जाऊ लागलो. अर्थातच आम्ही लवकरच पुढे गेलेल्या संघाला गाठले. अधिरसम आणि चहाने वेळ मारून नेली असली तरी तासाभरातच पोटात कावळे ओरडू लागले. मात्र वाटेत कुठेही साधी टपरीही दिसत नव्हती. आता मी आघाडी घेतली आणि सगळ्यांच्या पुढे जाऊ लागलो.



सर्वानन माझ्या बरोबरच होता. आम्ही करुमेनी नदीच्या जवळून जात असताना लांबवर एक ख्रिस्ती प्रार्थनास्थळ दिसले. लांबून ते फार सुंदर दिसत होते. सध्या विठोबा (तोही ख्रिस्ती) पेक्षा  पोटोबाची काळजी लागली होती. इतक्यात नदिपलिकडे मानापड शहर दिसू लागले. 


आम्ही पुल ओलांडून पुढे जाणार इतक्यात सर्वाननने आम्हाला उजव्या बाजूला वळण घेत नदीच्या अलीकडील काठाने जात असलेल्या रस्त्याला नेले. सगळेजण जरा अडखळलेच कारण भूक लागलेली असताना हे वळण कशाला असाच भाव सगळ्यांच्या मनात उमटला होता. सर्वाननने त्या दिशेला हॉटेल असल्याचे सांगितल्याने नाखुशिने का होईना सगळेजण त्याच्या मागे जाऊ लागले. पुढे त्याने पुन्हा एक उजवे वळण घेतले. आता अगदीच ओबड धोबड रस्ता सुरु झाला होता. सर्वानन आणि प्रमोद मागे न बघता जात होते. पुढे गेल्यावर ते चर्च होते. भूक लागली असताना आता चर्च कशाला असा विचार करत थोड्या अंतरावर इतर सर्वजणांनी जणू धरणेच धरले. अस्मादिकही त्यात सामील होतेच. प्रमोद मागे येऊन सगळ्यांना पुढे हॉटेल असल्याचे सांगू लागला. मात्र आजूबाजूची परिस्थिती पाहून कोणीही त्यावर विश्वास ठेवत नव्हते. किंबहुना जठराग्नी आता इतर विचार करायला परवानगी देत नव्हता.


इतक्यात सतीशचा फोन आला. तो मानापड पुलापाशी आला होता. सर्वानन पुढे यायला सांगत होता तर सतीश परत मागे बोलावत होता. अखेरीस सतीशला पुढे जाऊन हॉटेल शोधायला सांगून आम्ही सर्व माघारी फिरलो. सर्वानन आणि प्रमोद मात्र चर्चजवळ थांबले.

असे म्हटले जाते की येथील स्थानिकांनी ख्रिस्ती शक १५३२ मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतर १५४२ मध्ये फ्रान्सिस झेवियर नावाचा धर्मप्रसारक इथे आला. येथील चर्च मात्र १५८२ साली बांधले गेले असावे. जॉन डी सलानोव्हा ह्या धर्मप्रसारकाच्या मागणीनुसार जेरुसलेम येथील true cross चा एक अवशेष येथे आणला गेला आहे. १ ते १४ सप्टेंबर ह्या काळात तो अवशेष लोकांना सार्वजनिकरीत्या दाखवला जातो. ह्या काळात इथे मोठा उत्सवच असतो.

आम्ही मात्र ह्या ख्रिस्ती प्रार्थनास्थळाकडे न जाता नदी ओलांडून मानापड शहराकडे वळलो. ओह, शहर कसले थोडीफार घरे वगळता तिथे काहीच नव्हते. सतीश हॉटेल शोधायला पुढे गेला होताच. आम्ही त्याच मार्गाने पुढे गेलो. आता खरतर पोटातील कावळे कोकलू लागले होते. सतीशला फोन केल्याबरोबर त्याने हॉटेल सापडल्याचे सांगितले. 

ख्रिस्ती धर्म स्थळापासून ते हॉटेल जेमतेम ६ किमी अंतरावर होते. मात्र प्रत्येक पेडल बरोबर आमचा जठराग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत होता. सतीश दिसताच सगळ्यांनी सुस्कारा सोडला. रस्त्याच्या उजवीकडे एक छानसे गार्डन रेस्टॉरंट दिसत होते.... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...