रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

पूर्वतयारी भाग ५: ट्रान्सप्लांट: कोलकाता चेन्नई सायकल सफर


माझी श्विन आणि फुजी दोघीही दीड, पावणेदोन वर्षात बहुतेक वेळ धूळ खात पडल्या होत्या. त्यांची नीट दुरुस्ती, देखभाल करणे गरजेचे होते. कल्याण येथील BIKEPORT असो की सुमित हे दोघेही अश्यावेळी नेहमीच प्राधान्याने मदत करतात.

HDOR सुरू झाल्याने मी फुजीची जुजबी साफसफाई करून सराव सुरू केला होता. Bikeport येथे साहिरला गाठले. त्याने फुजीची अवस्था बघितली. आमची मोहीम समजताच त्याने फुजीचे पूर्ण रुपांतरण करून टाकले.  फुजीच्या बहुतेक भागांचे ट्रान्सप्लांट झाले होते. अत्यवस्थ अवस्थेतील फुजी एकदम तंदुरुस्त झाली होती. हॅण्डलबारपासून कॅरीअरपर्यंत सगळेच भाग बदलले. बहुधा फक्त फ्रेम तीच राहिली असावी. फुजी आता एकदम नवी कोरी दिसू लागली होती. साहिरची मदत इतक्याच पुरती मर्यादित नव्हती. 

माझा सराव सुरू होताच. HDOR च्या प्रत्येक टप्प्यानुसार सरावाचा वेळ, अंतर वाढवत होतो. प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट उद्दिष्ट्ये असत. माझ्या १०० दिवसांच्या HDOR कार्यक्रमामध्ये खंड पडू नये, माझी उद्दिष्टे पूर्ण व्हावी म्हणून फुजी त्याच्या दुकानात असताना साहिरने स्वतःची सायकल मला चालवायला दिली होती. 

सायकलची दुरुस्ती तर झाली होती, मात्र अजूनही ह्या मोहिमेसाठी सहाय्य वाहन मिळण्यासाठी शोध सुरू होता. माझी स्वतःची wagnor ड्रायव्हर सकट नेण्यापासून कोलकता किंवा चेन्नई येथून भाड्याने गाडी घेण्याच्या पर्यायांपर्यंत सर्व पर्यायांचा विचार सुरू होताच. मात्र एकूण खर्चाचा विचार करता कोणताच पर्याय व्यवहार्य वाटत नव्हता. दरम्यान आनंदचा फोन आला, ' तुझा जुना मित्र भेटला होता. तो त्याची गाडी घेऊन आपल्याबरोबर यायला तयार आहे. त्याला फोन कर.'. मी विचारत पडलो... कोण बरं असेल आणि माझा हा मित्र आनंदला कसा भेटला! 'दुनिया गोल है' चा प्रत्यय येत होता. तो मित्र म्हणजे आनंदबरोबर सैनिकी शिक्षण घेतलेला माझा बँकेतील जुना सहकारी होता... विवेक करमरकर. त्याने बँक सोडून बरीच वर्ष झाली होती. मी विवेकला लगेच फोन लावला. एक छोटी राईड करत डोंबिवलीहून ठाण्याला त्याच्या घरीही गेलो. त्याने लगेचच होकार दिला. त्याची गाडी रेल्वेतून नेण्याचे ठरवले. मात्र रेल्वेकडून असे कळले की गाडीमध्ये एक थेंबही इंधन असता कामा नये. आम्ही विचार केला इथून मुंबईला गाडी लोड करताना सगळे पेट्रोल काढले तरी कोलकात्याला पेट्रोलची सोय कोण आणि कशी करणार? 

घोडे...गाडी... पुन्हा अडले/ ली.

माझी कोणतीही मोठी राईड आप्पांना भेटल्याशिवाय सुरू होत नाही. अगदी छोट्याशा भेटीतसुद्धा आप्पा छान मार्गदर्शन करतात. १८०० किमी ची जवळपास २ आठवड्यांची मोहीम... त्यात हिवाळा असणार. त्यामुळे आम्ही साहाय्य वाहन शोधत होतो. सायकल चालवताना सामान वाहायला लागू नये हा सहाय्य वाहनाचा मुख्य उद्देश होता, तसेच काही अडचणी आल्याचं तर त्या वाहनाद्वारे त्वरित मार्ग काढता येईल हाही विचार होता. 

अप्पांनी सहाय्य वाहन घेण्यामागचा माझा विचार समजून घेतला. मात्र अगदी थोडक्या वेळात आणि मोजक्या शब्दात त्यांनी माझा विचार अगदी सोप्या शब्दात पूर्ण १८० अंशात बदलून टाकला. अडचणी आल्याचं तर तिथेच एखादे वाहन मिळेल असे अप्पांनी सांगितले ते मला तितकेसे पटले नव्हते. मात्र सामान वाहण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडचे पॅनियरही देऊ केले. मी मात्र ते लगेच स्वीकारले नाही. कारण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आप्पांना भेटता आले असते. 

आप्पा पक्के पर्यावरणवादी! त्यामुळे त्यांना अश्या मोहिमांमध्ये इंधन जाळणारे वाहन बरोबर घेणे योग्य वाटत नसावे. मी मात्र सायकल मोहिमेचा पर्यावरणवाद हे उद्दिष्ट मान्य करत नव्हतो. माझ्या मते पर्यावरणवाद हा सायकल मोहिमेचा अनेक कंगोऱ्यांपैकी एक कंगोरा जरूर असू शकतो.

त्यामुळे अजूनही साहाय्य वाहन डोक्यातून पूर्णपणे जात नव्हते. संजय आणि आनंदही सहाय्य वाहन घेण्याच्याच बाजूने ठाम होते. अप्पांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. साहाय्य वाहन न घेता मोहीम करत असलो तर वाटेतील लोकांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोनही बदलतो. हे मत मात्र पूर्णपणे पटले होते. आप्पांचे म्हणणे पटले तरी मन वळत नव्हते. साहाय्य वाहनाचा शोध सुरूच होता. मनाचे ट्रान्सप्लांट पूर्ण झाले नव्हते.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...