आनंदला वाटेत काहीही खायलाही मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने देखील आमच्याप्रमाणेच अनिकेत हॉटेल मध्ये मिसळ फस्त केली. मी आणि संजयने पुन्हा एकदा चहा रिचवला.
सूर्यास्ताच्या आधी मुक्कामी पोचायचे हा माझा शिरस्ता. वेळेचे गणित मांडता सूर्यास्ताआधी इंदापूर गाठायचे असेल तर पालीला ३- ३.३० पर्यंत पोचलो तरच बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायचे असे मी आणि संजयने ठरवले होते. जर तोपर्यंत पोचू शकलो नाही तर बल्लाळेश्वराची आम्ही ह्यावेळी दर्शन घ्यायची इच्छा नाही असे समजायचे हे आम्ही ठरवले होते. साधारण एक वाजता आम्ही पोचू असा अंदाज असताना ३.३० च्या सुमारास आम्ही खुरवले फाटा येथील हॉटेल अनिकेतपाशी म्हणजे पालीच्या जवळपास ९ किमी मागेच होतो. अर्थातच बल्लाळेश्वराचे दर्शन घ्यायला आता वेळ उरला नव्हता. आनंदचेही मत तेच होते. बल्लाळेश्वराला वेशीवरूनच नमस्कार करुन आम्ही पुढे निघालो. पालीहून पुढे वाकण फाट्यापर्यंतचा रस्ता वळणावळणाचा आणि अरुंद असला तरी निसर्गरम्य आहे. एका बाजूला खळखळणारी नदी साथ करत असताना सायकल चालवण्याचा आनंद काही औरच.
सुकेळ खिंडीचा रस्ता मात्र रुंद झाल्यामुळे तेथील घाट जाणवला नाही. अर्थातच तेथील सुरुवातीच्या चढाची तीव्रता कायम होतीच. फुजीचा रोजचा सराव साधारण २५०- ३०० मीटर चढाचा होता. आनंद आणि संजय ह्यांना मात्र चढाचा सराव फार नव्हता. त्यामुळे ते जरा मागे पडले. मात्र नंतरच्या उताराची मजा त्यांनी नक्कीच घेतली.
https://youtu.be/PcjVGEX6mgU?si=rXJ0hBlm7nZ79hZH
सुकेळ खिंडीने दोघांची परीक्षा पाहिली होती. त्यामुळे दोघांचा वेग फारच मंदावला होता. जेवणाची वेळ चुकल्याने पुढे चहाची वेळही चुकली होती. त्यामुळे थोडा वेळ त्यांच्या वेगाशी जुळवण्याचा प्रयत्न केल्यावर थोडे पुढे जाऊन चहा केंद्र बघावे असा विचार करत फुजी पुढे निघाली. आमच्या वेगापेक्षा भास्कराचार्य अधिक वेगाने घरी निघाल्याने कोलाड येथे पोहोचेपर्यंत अंधार पडू लागला होता. चहा तर हवाच होता, पण आता थोडी भूकही जाणवू लागली होती. खरतर इंदापूर आता जेमतेम १० किमी अंतरावर होते. आनंद आणि संजय येईपर्यंत चहाकेंद्र पाहावे असा विचार करत असतानाच माझी नजर गेली ती... एका छानश्या दुकानाकडे...
...'दोस्ती चहा' कडे. सकाळी 'चायवर दोस्ती ' झाली होती आता 'दोस्ती चहा' सापडला होता.
मी त्या नावाच्या प्रेमातच पडलो. दोस्ती आणि चहा दोन्ही शब्द जिव्हाळ्याचे. आनंद आणि संजय येताच आम्हा तिघांच्या सायकली जरा विसावल्या.
आम्ही मनसोक्त चहापान केले. बिस्किटांचे इंधनही जठराग्नीला अर्पण केले. मात्र एव्हाना पूर्ण अंधार पडला होता. मग आम्ही तिन्ही सायकली एकामागोमाग चालवू लागलो. कोलाडहून बाहेर पडताना रस्ता थोडा अरुंद होता. पण पुढे जरा प्रशस्त रस्ता मिळाला. कोलाड ते इंदापूर अंतर आम्ही अंधारातच पूर्ण केले. सायकलींच्या पुढील विजेऱ्या आणि शेपटाकडील दिवे ह्यांचा उपयोग पुरेपूर जाणवत होता.
इंदापूरला आमचे आतिथ्य अतिशय अगत्याने झाले. आनंद आणि संजय एकदम खुष झाले होते. जेवण तर छान होतेच शिवाय शतकी सायकलसफर झाल्याने झोपही शांत आणि गाढ लागली होती.
सकाळी चहापान करून लवकरात लवकर नाश्त्यासाठी नामदेवाडीला आनंदचे घर गाठायचे आणि सूर्यास्ता अगोदर स्वतःचे घर गाठायचे असा बेत होता. एकंदर परिसर अतिशय निसर्गरम्य होता.
पुन्हा एकदा सुकेळखिंड पार करून वाकण फाटा गाठला. चहाची गरज होतीच. मात्र तिथून जवळच नागोठणे होते. तेथील डॉक्टर सुनील पाटील ह्यांनी चहापानासाठी बोलावले असल्याचे आनंदने सांगितले. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने आमची आपुलकीने चौकशी केली आणि आमच्या मोहिमेसाठी शुभेच्छाही दिल्या. चहाची अपेक्षा होती मात्र तिथे पुरणपोळीही मिळाली. जठराग्नी अगदी शांत झाला होता. विश्रांतीही छान झाली होती. आता आम्ही महामार्ग सोडून नामदेव वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो होतो. रस्ता अरुंद होता मात्र रहदारी कमी होती. ह्या निसर्गरम्य रस्त्याने जात असताना आनंदचा हेवा वाटत होता.
ह्या सुंदर, निसर्गरम्य रस्त्याने नामदेववाडीला कधी पोचलो हे समजलेही नाही. नामदेववाडी येथे उत्तमच पाहुणचार झाला. गरमागरम जेवण, गावरान मेवा ह्यांची रेलचेल होती. खरतर तिथून पाय निघतच नव्हता. आनंद इथेच थांबणार होता. त्याचा खरोखरच फार हेवा वाटत होता. आम्हीही थोडा आराम करून निघालो. मात्र आज तरी सूर्यास्ताच्या आत राईड संपवायची होती. मी आणि दाते सुसाट निघालो. कर्नाळाच्या जवळ एक छान दृश्य दिसले. महामार्ग चांगलाच रुंद होता. येथे वाहनेही सुसाट वेगात जात असतात. मानवाच्या सोयीसाठी आपण जंगलाचे विभाजन करत असतो. प्राणीजीवन मात्र ह्यामध्ये भरडले जाते. कधी कधी जोडीदारातील एकजण रस्त्याच्या एका बाजूला तर दुसरा दुसऱ्या बाजूला असतो. अशा वेळी भर वेगात जाणाऱ्या वाहनांखाली चिरडून अनेक प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. किंबहुना सह्याद्री रांगा मधील काही दुर्मिळ प्राणी तर ह्यामध्ये नष्टही होत आहेत. मात्र कर्नाळा येथे रस्त्यावर उंचावर एक झुला दिसत होता. किमान माकडांसाठी तरी त्यामुळे रस्ता ओलांडायला मदत होत होती.






ब्लॉग वाचून डोंबिवली पाली इंदापुर व परत डोंबिवली जाऊन आल्याचा आनंद घर बसल्या मिळाला .बालपण आठवले. धन्यवाद ! करनाळ्याच्या माकड zulyaacha उल्लेख तुमच्या सूक्ष्म निरीक्षणाची ग्वाही देतो.तसेच आपण निसर्ग प्रेमी आणि
उत्तर द्याहटवाभ वादी असल्याची साक्ष देतो. खूप खूप शुभेच्छा ! दाते डोंबिवलीहून ठाण्या ला शिफ्ट झाले की काय ?
धन्यवाद. महामार्ग बांधताना प्राणीजीवनाच्या दैनंदिन वहीवाटीवर आपण आघात करत असतो. त्यावेळी त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध न केल्यास त्यांची होणारी हानी संपूर्ण निसर्ग व्यवस्थेवर परिणाम करू शकते.
हटवानिसर्ग प्रेमी आणि भूत दयावादी असे वाचा.
उत्तर द्याहटवा