शनिवार, ११ जुलै, २०२६

मुक्काम कोलकाता: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग ११

संदीप... उंचापुरा होता. त्याच्या नजरेत आपुलकी जाणवत होती. त्याचे घर अतिशय अरुंद बोळात होते. त्याने आम्हाला घरात नेले. रस्त्यालगतच असलेल्या त्याच्या घरात शिरताना एक अतिशय छोटा व्हरांडा होता. आतील खोलीही जेमतेम सव्वाशे चौरस फुटाची असावी. आत शिरल्यावर आम्हाला थोडा मोकळेपणा देत तो घरातील आतील भागात गेला. आम्ही आमचे सामान ठेऊ लागलो. जागा फार नव्हतीच. पण पुरेशी होती. लगेचच त्याने महत्वाचा प्रश्न विचारला....चहा! अर्थातच आम्ही चहाला नकार देणे शक्यच नव्हते.

एक वृद्ध स्त्री आम्हाला चहा घेऊन आली. संदीप बरोबर होताच. त्याने ओळख करून दिली...ही 'माँ '. अतिशय शांत, सोज्वळ माँ चे आमच्याशी लगेचच नाते जोडले गेले. त्यांना हिंदी नीट समजत नव्हते आणि आम्हाला बंगाली. मात्र क्रियापद वगळून आम्ही एकमेकांशी भाषा व्यवस्थित समजून घेत होतो. बंगाली ही माझ्या मते भारतातील सर्वात गोड भाषा आहे. कोंकणी आणि बंगाली ह्या भारताच्या दोन विरुद्ध किनाऱ्यावरील भाषा... मात्र दोन्हींमध्ये असलेले माधुर्य काही वेगळेच. दोन्ही भाषा ऐकायला किती छान वाटतात. बंगाली पदार्थ जास्त गोड की भाषा जास्त गोड ह्यावर एक परिसंवाद होऊ शकेल.

आम्हाला हावडा रेल्वेस्थानकात जाऊन आमच्या सायकली घ्यायच्या होत्या. मी आणि संजय हावडा रेल्वेस्टेशनबद्दल थोडे माहितगार झालो होतो. संदीपने आम्हाला सांगितलं सांगितले त्याच्या घराजवळच बेलूर रेल्वे स्टेशन आहे. तिथून आम्हाला हावडा स्टेशनला जायला लोकल ट्रेन मिळेल. मी, संजय आणि मनोज तिघेही लोकल ट्रेन म्हटल्यावर आधी विचार करू लागलो की गर्दी किती असेल. आता लोंबकळत जाण्याची तर आमची इच्छा नव्हतीच. मात्र आम्ही निघालो तेव्हा तरी गर्दीची वेळ नव्हती. हावडा स्टेशन लगेचच आले. मी आणि संजय मनोजला घेऊन थेट १७ क्रमांक फलाटाच्या दिशेने निघालो. आम्हाला माहीतच होते की पुढील फलाट ओलांडायच्या आधीच पार्सल सोडवण्यासाठी ऑफिस आहे. मागच्या वर्षी आम्ही पूर्ण २३ फलाट ओलांडून परत मागे १७ क्रमांक फलाटापाशी आलो होतो. आता मात्र आम्ही ती चूक न करता थेट फलाट क्रमांक १७ आणि १८ मधील पार्सल ऑफिस पाशी गेल्याबद्दल आम्हाला स्वतःचे कौतुक वाटत होते. तेथील पार्सल ऑफिसमध्ये आम्ही आत्मविश्वासाने आमच्या रसीद दाखवल्या. ओह! आमच्या आत्मविश्वासाचा फुगा फुटला होता.... ह्यावेळी आमच्या सायकली फलाट क्रमांक २३ पलीकडे असलेल्या पार्सल ऑफिस मध्ये आल्या होत्या. मनोजला आम्ही जे आमचे कौतुक ऐकवले ते व्यर्थ गेले होते. 

आम्ही निमूटपणे फलाट २३ पलीकडील पार्सल ऑफिसमध्ये गेलो.  ऑफिस नव्हे तिथे तर लागोपाठ मोठमोठी godown होती....नजर टिकणार नाही इतकी लांब आणि रुंद. त्यातील एका गाळ्यात आमच्या सायकली आम्हाला मिळणार होत्या. आम्ही आमच्या रसीद तिथे दाखवल्या. मला आणि मनोजला तिथून सायकली घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळाली. संजयच्या सायकलबद्दल मात्र काहीच कळेना.... त्याची सायकल आलीच नव्हती. ती आमच्या सायकल बरोबर मुंबईमधून निघाली नव्हती तर दुसऱ्या दिवशी निघाली होती. अखेर मी आणि मनोज आमच्या सायकली ताब्यात घेतल्या.

माझी सायकल मुंबईहून पॅक करताना मला सुमितने बजावले होते की सायकल व्यवस्थित नाहीये. खरतर मी सर्व्हिसिंग करून आणली होती. पण मी सुमितचा सल्ला डावलू शकत नव्हतो. त्यामुळे मी मुंबईहून सायकल पाठवतानाच ड्रीम बाईकच्या सनी शाह ह्यांना कल्पना दिली होती. अर्थातच हावडा स्टेशनहून आम्हाला सायकल घेऊन ड्रीम बाइक ह्या दुकानात जायचे होते. त्यामुळे आम्ही संजयला निरोप दिला आणि आमच्या सायकली घेऊन ड्रीम बाईक कडे वळलो. सनी शाह हा केवळ कोलकाता किंवा बंगाल नव्हे तर संपूर्ण पूर्व भारतातील सायकल विषयक कार्यक्रमांमध्ये कार्यरत होता. त्याचे दुकान छोटे असले तरी अद्ययावत होते. तो अतिशय नम्र, मनमिळावू आणि मदतीला तत्पर असतो. मागील वर्षी तर तो एका मोठ्या सायकल कार्यक्रमासाठी चिलीका येथे गेला होता तरी त्याने तिथून सूत्र हलवून आम्हाला मदत केली होती.

मागील वर्षी सनी ची भेट होऊ शकली नव्हती, मात्र त्याचा भाऊ बिकाश ने आमची मदत केली होती. ह्यावेळी मात्र सनी आणि बिकाश दोघेही दुकानात होते. त्या दोघांनी माझे आणि मनोजचे आपुलकीने स्वागत केले. माझी सायकल पाहताच सनी ने मला तोच सल्ला दिला जो सुमितने दिला होता. मी त्याला तत्काळ योग्य ती दुरुस्ती करून द्यायला सांगितली. त्यासाठी थोडा वेळ लागणार होताच. मनोजनेही त्याच्या सायकलची सर्व्हिसिंग करून घेतली. 






आमचे काम संपेपर्यंत अंधार पडला होता. येथून संदीपचे घर जवळपास २० किमी असावे. आम्ही संजयला फोन करून त्याला आणि घरच्या सगळ्यांना जेवण करून घ्यायला सांगितले. 

एव्हाना रहदारी कमी झाली होती, मात्र आम्ही चौकसपणे थोडे थांबत चौकशी करत पुढे जात होतो. मुख्य महामार्ग सोडून आम्ही एका अरुंद बोळात शिरत असताना आम्हाला एक चहाचे छानसे दुकान दिसले..... MBA चहा! मुंबईत Engineer चहाची दुकाने पाहिली होतीच...कोलकाता येथे हे MBA चहाचे दुकान पाहिल्यावर मोह आवरेना. दुकानही आकर्षक सजवले होते. सनी च्या दुकानात चहा पिऊन दीड तास झाला होता. मात्र हे दुकान पाहून चहाची तल्लफ आलीच. आम्ही लगेचच एक थांबा घेतला.


चहा घेतल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढील रस्ता अतिशय अरुंद, खाचखळगे असलेला होताच शिवाय तिथे दिवेही नव्हते. त्यामुळे आम्ही अतिशय सावधपणे जात होतो. संदीपच्या घराजवळ भटकी कुत्री असल्याची नोंद आम्ही पहिल्यांदा त्याच्या घरी जाताना घेतली होतीच. आता मात्र त्या कुत्र्यांनीही आमची नोंद घेतली. आम्ही पुरेसे सावध होतोच. त्यामुळे संथपणे जात होतो. मात्र त्यांनी आम्हाला पुढे जाऊन दिल्यावर मागून आम्हाला जाब विचारायला सुरुवात केली. सुदैवाने तिथे आणखी दोन तीन स्थानिक लोक होते..त्यांनी त्या कुत्र्यांना दटावले आणि आम्ही सुखरूपपणे संदीपच्या घरी पोचलो. माँ नी आमच्यासाठी सुंदर आणि रुचकर बेत केला होता. सगळेजण आमच्यासाठी थांबले होते. पोटभर जेवण करून आम्ही झोपी गेलो.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...