शनिवार, २५ जुलै, २०२६

चहावाल्याचे आदरातिथ्य: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग १८



शांतिनिकेतनला भेट देत मी माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण करून घेतली होती. खरतर कोलकाता गुवाहाटी ह्या मार्गात शांतिनिकेतन येत नाही. त्यासाठी आम्ही दिशा बदलली होती. शांतिनिकेतन /बोलपूर येथील अनुभव खूपच उत्साहवर्धक आणि आनंददायी होते. कोलकाता सोडल्यापासून सातत्याने सायकलपटू दिसत होते. शांतिनिकेतन तर सायकलपटूंचेच शहर वाटत होते. इथे आमच्या सायकल सफरीबाबत कोणालाही कुतूहल वाटण्याचे कारणच नव्हते.

खोआई रस्त्यावरील सोनझूरी हाट शेजारील कृष्णा उत्सब रिसॉर्ट मधील वास्तव्यही सुखद होते. सोनाझूरी जंगल आणि बल्लवपूर वन्यजीव अभयारण्य ह्या दोन्हीच्या सान्निध्यात असलेल्या ह्या रिसॉर्टमध्ये वातावरण अतिशय शांत होते. आम्हाला मात्र कल्पनाही नव्हती की आम्ही अभयारण्याच्या सीमारेषेवर मुक्काम केला होता. किंबहुना येथे जंगल अथवा अभयारण्य आहे ह्याचीही आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही कोणत्याही पर्यटन व्यावसायिकामार्फत इथे आलो नव्हतो. त्यामुळे शांतिनिकेतन येथील प्रत्येक ठिकाणी भेट दिल्याची ' टिक ' करण्याचे बंधन आमच्यावर नव्हते. त्यामुळेच इतरत्र भेट देण्याचा हट्टाहास न करता हाट मध्ये आम्ही मनमुराद आनंद घेतला होता. कृष्णा उत्सब रिसॉर्ट मध्ये रात्रीचे जेवणही छान झाले. वास्तविक आजचा दिवस सायकलवणे कमी मनोरंजन जास्त असाच होता.

रात्रीची शांत झोप झाल्यावर आम्ही जरा वेळेवर म्हणजे सकाळी ६.१५ वाजताच सायकल चालवण्यास सुरुवात केली. भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ असल्याने इथे मुंबईपेक्षा जवळपास तासभर सूर्योदय लवकर होत असावा. त्यामुळे ६.१५ वाजता पुरेसे उजाडले होते. आजपासून रोज सरासरी ११० ते १२० किमी सायकल चालवायची होती. Couchsurfing साइट द्वारा मला आज रघुनाथगंज येथे राहण्याचे निमंत्रण मिळाले होते. ते अंतर जवळपास १२० किमी होते.


संदीपने मला सागरदिघी येथीलही एक संपर्क दिला होता. कोलकाता गुवाहाटी हमरस्त्याला लागल्यावर सागरदिघी गाव आम्हाला लागणार होते. मात्र रघुनाथगंजसाठी आणखी १५-२० किमी अंतर गुवाहाटीच्या दिशेने कापावे लागणार होते. दुपारी  ३ वाजेपर्यंत आपण कुठे पोचतोय त्यानुसार निर्णय घेण्याचे मी ठरवले. सुरुवातीपासूनच रस्ता अरुंदच होता. मात्र वर्दळ फार नव्हती. वातावरण प्रसन्न होते. वाटेतील गावं जागी होत होती. शाळेमध्ये सायकलने जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी दिसत होते. 




साधारण तासभर सायकलवल्यानंतर आम्ही अहमदपूर गावात शिरलो. लांबूनच मला एका चहावाल्यापाशी थोडी गर्दी दिसली.  चहाकेंद्र पाहून मलाही चहा घ्यायची हुक्की आली. संजय आणि मनोज मागे होते. मला चहा तर हवा होता पण सायकलवण्याची लय घालवायला लागली असती. मी दोघांचा काय विचार आहे हे विचारण्यासाठी सायकल थांबवत असतानाच चहावाल्याने मला हाक दिली. मी त्याचाच फायदा घेत मनोज आणि संजयला सांगितले, की तो चहावाला आपल्याला बोलावतोय. त्याबरोबर तेही दोघे चहा घ्यायला तयार झाले. चहावाल्याने आमच्यासाठी स्पेशल चहा आधणावर ठेवला. आमच्या सायकली लावून आम्ही गप्पा मारत असताना एक इसम आमच्याकडे आला. त्याने आमच्या मोहिमेविषयी चौकशी केली. तो म्हणाला, 'मी मानसकुमार चॅटर्जी '... 

तो एक पर्यटक व्यावसायिक होता. तो आमच्या मोहिमेची माहिती ऐकून चांगलाच प्रभावित झाला होता. आमच्या गप्पा चांगल्याच रंगत होत्या. दरम्यान आमचा चहादेखील आला. आम्ही चहाचे घुटके घेत गप्पा मारत होतो. त्याने सांगितले की व्यवसायानिमित्त त्याच्या भारतभर ओळखी आहेत. अगदी मुंबई असो की गुवाहाटी.. तिथे त्याच्या ओळखी आहेत. त्याने असेही सांगितले की अगदी गुवाहाटीपर्यंत कोठेही आम्हाला काही मदत लागली तरी त्याला संपर्क केल्यास तो आमची सोय करून देऊ शकत होता. आम्हालाही वाटेत काही संपर्क, निवास व्यवस्था मिळाली तरी हवी होतीच.

त्याला आम्ही सांगितले की आज रात्री आमची सोय रघुनाथगंज येथे झाली आहे. त्यासरशी तो म्हणाला तुम्ही तिथे का जाता, त्यासाठी तुम्हाला महामार्गापासून १० किमी आत जावे लागेल. त्या ऐवजी त्याच्याच जवळ महामार्गाला लागूनच उमरपूर गाव आहे तिथेच तुम्ही रहा. त्याने काही हॉटेलची नावेही दिली. मी विचार केला ठीक आहे आपल्याकडे आता सागरदिघी, रघुनाथगंज बरोबर उमरपूर हाही एक पर्याय आहे. चहा घेऊन झाला होता. आम्ही त्याचा निरोप घेऊन चहावाल्याला पैसे देऊ लागलो. तो चहावाला पैसेच घेईना. तो म्हणाला, 'चहा माझ्याकडून होता. मी तुम्हाला बोलावले होते. मी पैसे घेणार नाही ' इतक्यात मानसकुमार तिथे आला तो म्हणाला, ' नाही, नाही... चहा माझ्याकडून आहे.'

आम्ही दोघांनाही धन्यवाद देऊन निघू लागलो. मी संजय आणि मनोज तिघांनी सायकलवर बसून पेडल मारले न मारले तोच चहाकेंद्राच्या दिशेकडून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही मान वळवून मागे पाहतो तर तो चहावाला आणि मानसकुमार दोघेही एकमेकांशी वाद घालत होते.... चहा नक्की कोणाकडून आहे! चहा पिण्यात जेवढा आनंद असतो तेवढाच तो पाजण्यातही असतो ह्याचा हा अनुभव अनोखा होता.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...