महाबळेश्वर येथे उगम पावणारी वेण्णा आणि भारताच्या दक्षिण भागातील प्रमुख नदी कृष्णा यांचा संगम माहुली जवळ होतो. त्या संगमाजवळ अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी एक शहर साधारण सोळाव्या शतकात उदयास आले. या नद्यांच्या सभोवती असलेल्या सात ताऱ्यांच्या (टेकड्यांच्या) मुळे या शहराला 'सातारा' हे नाव मिळाले. औरंगजेबाच्या तावडीतून शाहू महाराजांची सुटका झाल्यावर त्यांचा राज्याभिषेक अजिंक्यतारा येथे झाला आणि मग मराठा साम्राज्याचा अस्त होईपर्यंत सातारा हीच मराठ्यांची राजधानी होती. सातारा हे श्विनचेही आजोळ. मात्र आजोबा पुण्यालाच स्थायिक झाल्यामुळे सातारा येथे जाणेयेणे फार नव्हते. काही वर्षांपूर्वी ते घरही दान केले गेले. मात्र ३२ वर्षांपूर्वी सातारा येथे राहिल्याच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याने सातारा शहराशी श्विनचे भावनिक नाते आजही जोडलेले होते.
डोंबिवली पणजी सायकलसफरीदरम्यान सातारा येथे पोचताच श्विनला आंतरिक समाधान वाटत होते. शहरात शिरणारा पहिलाच रस्ता श्विन आणि स्कॉटने धरला. तो रस्ता अरुंद, वळणावळणाचा असल्याने स्कॉट मागे पडू लागली होती. वाटेत दोन रस्ते फुटत असत तेथे श्विन कोणत्या रस्त्याला जायचंय याची चौकशी करून स्कॉट येईपर्यंत थांबत असे. एका चौकात डावीकडे वळून श्विनने चौकशी केली. तेथे एक केळेवाली होती. स्कॉट दिसू लागल्यावर श्विनने पुढे जायला सुरुवात केली. पाठोपाठ स्कॉटने डावे वळण घेताच त्या केळेवालीने स्कॉटला हाक मारून केळी घ्यायला सांगितले. ती केळेवाली केळी का देत आहे हे स्कॉटला समजेना. स्कॉटने श्विनला तेथे थांबलेले पाहिले होते. स्कॉटला वाटले की केळेवाली श्विन अथवा साताऱ्यात ज्यांच्याकडे मुक्काम आहे त्या शंकर बागडे ह्यांच्या ओळखीची असावी. मात्र स्कॉटकडे सॅक नसल्याने स्कॉटने केळेवालीला तसे सांगितले. त्यावर ती केळेवाली म्हणाली की मग केळी खाऊन जा. केळेवालीचा आग्रह स्कॉटला अचंबित करत होता. स्कॉटने त्या केळेवालीला सांगितले की, 'माझ्या बरोबरील सहकारी पुढे गेले आहेत.' केळेवाली चा आग्रह सुरु होता, 'त्यांनाही मागे बोलवून घ्या आणि दोघांनीही केळी घेऊन जा किंवा खाऊन तरी जा.' या सर्व घटनेचा श्विनला मात्र पत्ता नव्हता. स्कॉट मागे का येत नाहीये याचा विचार करत श्विन मात्र पुढे थोड्या अंतरावर थांबली होती. अखेरीस 'आम्ही थोड्या वेळात परत येऊन केळी घेतो,' असे केळेवालीला सांगून स्कॉट पुढे निघाली. श्विन स्कॉटला भेटल्यावर स्कॉटने सर्व हकीकत श्विनला सांगितली. एका अनोळखी केळेवालीने केलेला आग्रह, त्यातील आपुलकी स्कॉटला आश्चर्यचकित करत होता. श्विनला मात्र सायकलसफरीदरम्यान अशी आपुलकी अनेकवेळा अनुभवास आली होती. तरीही त्या केळेवालीचा इतका आग्रह श्विनलाही स्तिमित करत होता. सातारा शहरातील पहिलेच स्वागत तेही अनोळखी केळेवालीकडून अश्या प्रकारे झाल्यावर श्विन आणि स्कॉट खूपच आनंदी झाले होते.
तेथून थोड्याच वेळात श्विन आणि स्कॉट TJSB बँकेच्या सातारा शाखेत पोचले. आजचा मुक्काम बँकेतील सहकारी शंकर बागडे यांच्या घरी होणार होता. मात्र शंकरला काही कामानिमित्त शहराबाहेर जावे लागले होते. दरम्यान शाखाधिकारी सचिन वनारसे, संतोष शेलार आणि इतर सहकारी यांनी श्विन आणि स्कॉटचे यथोचित स्वागत केले. सातारा शाखेचे कामकाजही सुरु होते. त्यामुळे थोडा वेळ घालवण्यासाठी श्विन आणि बाहेर पडले. इतक्यात ठाणे येथील जितेंद्र वैद्य याने सातारा येथे डॉ श्रोत्री यांना भेटण्याचा अनेकवेळा केलेला आग्रह श्विनला आठवला. श्विनने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर थोड्या वेळात क्लिनिकसाठी निघणार असल्याने थोड्या वेळात पुन्हा फोन करण्याचे ठरले. काहीवेळ खादाडी करून श्विन स्कॉट TJSB बँकेच्या सातारा शाखेत येऊन बसले. दिवसभरातील WA मेसेज, FB पोस्ट पाहून काही वेळ गेला. अर्थात त्यामुळे आणि दिवसभर काढलेले फोटो यामुळे श्विनचा फोन डिस्चार्ज झाला. शंकर बागडे यायला मात्र बराच वेळ लागला. तो आज बराच प्रवास करून आला होता मात्र तरीही तो प्रचंड उत्साहात होता. त्याने श्विन स्कॉटचे प्रेमभराने स्वागत केले. शंकर एका सहकाऱ्याबरोबर दुचाकीवर आणि पाठोपाठ त्याला गाठत श्विन स्कॉट अशी वरात सातारच्या रस्त्यातून निघाली.
घरी पोचल्यावर श्वास थांबलेल्या भ्रमणध्वनीला प्राणवायू लावला. स्कॉट श्विन थोड्या वेळात ताजेतवाने होईपर्यंत त्या भ्रमणध्वनीला धुगधुगी आली होती. श्विनने भ्रमणध्वनी पाहिला असता त्यात जितेंद्र वैद्य आणि डॉ श्रोत्री यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. श्विनने लगबगीने दोघांना संपर्क केला. तेव्हा मात्र भ्रमणध्वनीचा श्वास थांबला होता त्यादरम्यान झालेला गोंधळ श्विनला समजला. डॉक्टर श्रोत्री आणखी तीन सहकाऱ्यांना घेऊन श्विनची वाट पाहत एके ठिकाणी थांबले होते आणि ते कळविण्यासाठी डॉक्टर श्विनला संपर्क करण्याचा असंख्य वेळा प्रयत्न करत होते. ते तीन सहकारी म्हणजे युरोपमधील ट्रायथलॉनमध्ये सामील झालेले तरुण होते. मुख्य म्हणजे ते सर्वजण जिथे वाट पाहत थांबले होते ते राधिका हॉटेल आणि श्विन स्कॉट जिथे शंकर बागडे यांची वाट पाहत थांबले होते ती TJSB बँकेची शाखा अक्षरशः हाकेच्या अंतरावर होते. मात्र बेशुद्ध पडलेल्या भ्रमणध्वनीमुळे आमचा संपर्क मात्र होऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी चहापानासाठी डॉकटरांच्या घरी जायचे निमंत्रण मात्र श्विन आणि स्कॉटने त्वरित स्वीकारले.
शंकर बागडे मूळ सातारकरच. मात्र त्याचे सर्व कुटुंबीय डोंबिवली येथे राहत होते. शंकर मात्र नोकरीनिमित्त एकटाच सातारा येथे दोन तीन वर्ष राहत होता. जेवणासाठी आम्ही बाहेर निघालो. एका घरगुती खानावळी मध्ये आम्ही शिरलो. वाटेत शंकर त्या खानावळीची स्तुती करत होता. सुपणेकर खानावळीत शिरल्या शिरल्याच ती स्तुती योग्य असल्याचे जाणवू लागले. घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणेच सर्वांचे स्वागत झालेले. लग्नाच्या पंगतीप्रमाणेच समोरासमोरील रांगेत टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. आम्ही जेवावयास बसल्यावर लग्नात वाढतात त्याप्रमाणे एकेक पदार्थ वाढला जाऊ लागला. त्याबरोबर भूकही चाळवू लागली होती. आमचे उदरभरण सुरु झाले. त्याबरोबर पुन्हा पुन्हा एकेक पदार्थ आग्रहपूर्वक विचारला जाऊ लागला. प्रत्येक पदार्थ ओळीने येत होता. जेवणही एवढे चविष्ट होते की पोट भरलेला माणूसही पुन्हा जेवायला बसेल. सर्वांचे जेवण अत्यंत समाधानाने झाले आणि आम्ही परत शंकराच्या घरी परतलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर जाग आली. आज कोल्हापूर येथे पोचायचे होते. मात्र त्या आधी डॉ श्रोत्रींच्या घरी जायचे होते. श्विन आणि स्कॉट डॉकटरांच्या घरी जाताच डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीने उत्साहाने श्विन स्कॉटचे स्वागत केले. डॉक्टरांशी गप्पा मारताना जितेंद्र वैद्य डॉक्टरांबद्दल भरभरून का बोलत होता हे समजत होते. डॉक्टर, त्यांची पत्नी यांच्याचबरोबर डोकटरांचे भाऊ आणि वहिनीही गप्पांमध्ये सामील झाले. गप्पा छानच रंगत होत्या. डॉक्टर श्रोत्री आणि कुटुंबियांशी फार जुना स्नेह असल्याचे श्विन स्कॉटला वाटू लागले होते. कोल्हापूर पर्यंत जायचे असल्याने फार वेळ थांबायला वेळ नव्हता. डॉक्टर आणि कुटुंबियांचा निरोप घेता घेता त्यांची भेट जपून ठेवण्यासाठी छायाचित्र टिपले गेले.
सकाळच्या त्या प्रसन्न वेळी सातारा शहर सोडत असताना श्विन आणि स्कॉटला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत सातारकरांनी दिलेले प्रेम आठवत होते. अनोळखी केळेवालीने भेट म्हणून देऊ केलेली केळी, त्यामागची तिची अजिजी हा अनुभव वर्णन करायला शब्द अपुरेच आहेत. त्याशिवाय TJSB बँकेतील सातारा शाखेचे कर्मचारी, शंकर बागडे, डॉ संदीप श्रोत्री आणि कुटुंबीय यांनी केलेले स्वागत ही ठेव न विसरण्याजोगीच!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा