भारतीय राष्ट्रीय दिनांक कार्तिक ३०, १९४०
भारताचे राष्ट्रीय वर्ष १९४० च्या कार्तिक महिन्याची आज शेवटची म्हणजे ३० तारीख! भारताचे राष्ट्रीय वर्ष म्हणजे हिंदू वर्ष नव्हे बरं का. हिंदू कॅलेंडरमधील कार्तिक महिन्यात तारीख नव्हे तिथी असते. आजची हिंदू तिथी आहे शुक्ल त्रयोदशी (१३). म्हणजे हिंदू कॅलेण्डरचा कार्तिक महिना संपायला अजून १७ तिथी बाकी आहेत.
हिंदू आणि मुस्लिम ही दोन्ही चांद्र वर्ष आहेत (३६० तिथींचे एक वर्ष), तर भारताचे राष्ट्रीय वर्ष हे ख्रिस्ती ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे सौर वर्ष आहे (३६५ दिवसांचे एक वर्ष).
राष्ट्रीय सौर कॅलेंडरमधील कार्तिक महिन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम चांद्र कॅलेंडरमधील ईद हा दिनविशेष या वर्षी आला होता. त्यानिमित्ताने आज सुट्टी मिळाली होती. त्यामुळे #cycle2work करता येणार नव्हते. मात्र श्विनने सुट्टीची संधी साधायचे ठरवले. घरातून निघताना श्विन आणि स्कॉट शिळ फाट्याला जायचे म्हणून निघाले तेव्हा अद्यापी विष्णुमूहूर्त होता. दिवसातील २४ तासात ३० प्रहर असतात. त्यातील सुर्योदयापूर्वीचे दोन प्रहर म्हणजे ब्राह्म मुहूर्त आणि विष्णू मुहूर्त. अर्थातच विष्णू मुहूर्त असल्याने अजून सूर्योदय झाला नव्हता. श्विन आणि स्कॉटने परिधान केलेले शेपटाकडील लाल दिवे सुरु करत दोघांची वाटचाल संथ गतीने सुरु झाली. शहर साखरझोपेत असल्यामुळे रस्त्यावर विशेष रहदारीही नव्हती. कल्याण शिळ रस्त्याला लागेपर्यंत उजाडणे आवश्यक असल्याने दोघांनीही गती वाढवण्याचा विचार केला नाही.
सकाळची शांत आणि गार हवा मनाला ताजेतवाने करत होती. मानपाडा रस्त्यामार्गे कल्याण शिळ रस्त्याला लागताच मात्र स्कॉटने शिळ फाट्या ऐवजी नेवाळी फाट्याला जायचा प्रस्ताव मांडला. त्याबरोबर दोघांनी उंबर्ली गावाकडे जाणारा रस्ता पकडला. वैशाल धारमसी याचा हा आवडता रस्ता. या रस्त्यावरून जाताना सूर्य उगवताना पाहणे हा एक आनंदोत्सव असतो. स्कॉट श्विन आपली संथ गती कायम राखत बदलापूर पाइपलाइन रस्त्यावरील तळोजा फाटा येथे पोचले. तेथून नेवाळी फाटा येथे जाताना सुरुवातीला छोटा चढ चढावा लागला तरी पुढे मात्र बराच उतार मिळतो. ह्या उतारावरून गती घेत असतानाही श्विनचे लक्ष समोर उजव्या बाजूने डोकावणाऱ्या सूर्याकडे होते. नेवाळी फाट्या अगोदर श्विनने सूर्याला कॅमेरात कैद करण्यासाठी योग्य जागा शोधली. तेथून त्या सूर्यबिंबाला कॅमेरात जेरबंद करून नेवाळी फाटा गाठला तेव्हा श्विन स्कॉटचा उत्साह अधिकच वाढला होता.
नेवाळी फाटा येथे अमृतास्वाद (चहापान) घेत असतानाच श्विन स्कॉटने परतीचा विचार बदलून पुढे मार्गक्रमण करायचे ठरवले. तेथून जवळच असलेला मलंगगड गाठायचे ह्यावर दोघांचे एकमत झाले. मग श्विनने थेट मलंगगडाकडे जायच्या रस्त्या ऐवजी पोसरी, करवले गावाहून जाणारा थोडा लांबचा रस्ता निवडला. हा रस्ता लांबचा असला तरी निसर्ग संपन्न होता.
ह्याच रस्त्यावरून पूर्वी जाताना चोचीत साप धरलेला खंड्या बराच काळ श्विनला समांतर जात होता. ती आठवण जागी करत श्विन आणि स्कॉट जात होते. रस्ता छान होता आणि रहदारी अजिबात नव्हती त्यामुळे वेग वाढला होता. इतक्यात दोघांचे लक्ष डाव्या बाजूकडील शेताकडे गेले. त्या शेतात एक बाई कसला तरी भारा गोळा करत होती. ते काय आहे हे लक्षात येत नव्हते....काकडी..अहं... दुधी... ओह, खरच! ती नक्कीच दुधी होती. आपोआपच दोघांची गती शून्यावर आली.
स्कॉटने त्या शेतात प्रवेश केला आणि दुधीची किंमत विचारली. शेतातली ताजी, लुसलुशीत दुधी दिसल्यावर भाव करायचा नव्हताच. सांगितलेली किंमत स्कॉटने लगेच दिल्यावर, त्या बाईने लगेचच स्वतः हुनच एका दुधीवर आणखी एक दुधी मोफत दिला. भाजीवालीने दिलेली भेट स्कॉटने आनंदाने स्वीकारली. मळ्यातली भाजी मिळाल्यामुळे श्विन स्कॉटही खुश होते आणि शेतातच बोहनी झाल्यामुळे मळेवालीही खुश!
पुढे जात असतानाच डावीकडे पोसरी करवले गावाजवळ एक शनिमंदिर. ह्या श्री शनिश्वराला मनोमन नमस्कार करून श्विन स्कॉटने पुढचा रस्ता धरला. रावणाची एक कथा सांगतात. सर्वशक्तिमान रावण हा उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांना खाली झोपवले आणि त्याच्यावरून चालू लागला. चालत असताना खाली झोपलेल्या शनिदेवजवळ तो पोचला तेव्हा शनिदेव पालथा झोपला होता. रावणाने हट्ट धरला की शनिदेवाने पालथे न झोपता सरळ झोपावे. रावणाला कोणीतरी सल्ला दिला की शनिदेव पालथा आहे तेच बरे आहे, त्याला सरळ झोपायला सांगू नकोस. मात्र दुराग्रही रावणाने तो सल्ला मनाला नाही आणि त्याने शनिदेवाला सरळ व्हायला लावले. आणि त्याबरोबर... शनिदेवाची दृष्टी रावणावर पडली. त्याबरोबरच रावणाचे दिवस मात्र फिरले.... ही झाली रावणाची कथा!
मात्र शनिदेव हा खरा परीक्षक आहे. तो तुमची कठोर परीक्षा जरूर घेतो मात्र त्या परीक्षेत तुम्ही पास झालात तर त्याचे योग्य आणि भरघोस फळही देतो.
असो, शनिदेवापासून पुरेसे अंतर ठेवत श्विन आणि स्कॉट मात्र पुढे सरकले. बराचसा रस्ता अत्यंत उत्तम स्थितीत होता. त्यामुळे आता वेगही चांगला घेता येत होता. करवले गावातून जाणारा रस्ता सरळ सरळ मलंग गडाकडे जाणारा नव्हता त्यामुळे प्रत्येक वळणावर खात्री करून घेत जावे लागत होते. अशी वळणे घेत घेत मलंगगड दिसू लागला तेव्हा त्याच्या माथ्यावर सूर्य विराजमान झालेला दिसत होता. मुकुटावर सूर्य परिधान केलेला मलंगगड तेजस्वी दिसत होता. श्विन स्कॉट गडाच्या पायथ्याशी विसावले तेव्हा त्यांना मनुष्य शक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी आम्हाला इंधन भरावे लागणार होते.
येथे मिळणारी कांदाभजी आणि पुन्हा एकदा अमृतपान झाल्यावर श्विन स्कॉटने पुन्हा परतीचा रस्ता धरला. नेवाळी मार्गे मलंगगडाकडे थेट येणारा रस्ता जवळचा होता, तर करवले गावामार्गे येणारा रस्ता नेवाळी ते मलंगगडाचे अंतर जवळपास दुप्पट करणारा होता. मात्र हाच करवले गावाकडून मलंगबाबाच्या वाडीतून आलेला निसर्गसंपन्न रस्ता स्कॉटला आवडला होता. साहजिकच दोघांचा मोर्चा मलंगबाबाच्या वाडीमार्फत पुन्हा करवले गावाच्या दिशेने वळला. मलंगगडाकडून वाडी पार करून करवले गावाअलीकडील चौकात उजवीकडे करवले गाव आहे तर डावीकडील रस्ता नऱ्हेन गावाकडे जातो. परतीचा मार्ग पकडताना श्विन स्कॉटने करवले गावा ऐवजी नऱ्हेन गावाकडे जायचे ठरवले. नऱ्हेन गावाकडून जात असतानाच छोट्याश्या शाळेजवळ एका लहानश्या पटांगणात ओळीने उभे राहिलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक प्रार्थना म्हणताना दिसले. श्विन आणि स्कॉट साहजिकच तेथे थांबले. मलंगगडाच्या सफरीत जागोजागी वेगवेगळ्या पक्ष्यांची विविध गाणी ऐकायला मिळत होती. त्यालाच स्पर्धा करणाऱ्या आवाजातील प्रार्थना श्विन स्कॉटला स्तब्ध करत होती. तेथील शिक्षकांना अभिवादन करून श्विन स्कॉट निघाले तेव्हा त्यांना निश्चितच आणखी ऊर्जा मिळाली होती. त्याच उर्जेसह दोघांनी बाळेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल (SRPF) चे प्रांगण गाठले. त्या प्रांगणातून जाताना नकळत नतमस्तक व्हावेसे वाटत होते.
SRPF पार करून कोळेगावचा रस्ता पकडला तो मात्र थोडा खराब स्थितीत होता. आता उंच झाडांची जागाही खुरट्या झाडांनी घेतली होती आणि आपल्या बाललीला थांबवून सूर्य सुद्धा कुमारवयात आला होता. कोळेगावमार्गे कल्याण शिळ रस्त्याला लागल्यावर श्विनचे लक्ष नीराकेंद्राकडे लागले होते. मानपाडेश्वर मंदिराजवळ एका निराकेंद्रापाशी श्विनने थांबा घेतला. केंद्रधारक मात्र एखाद्या रंगात आलेल्या गवयाप्रमाणे डोळे मिटून डोलत होता. तेव्हा त्याला भानावर न आणता श्विनने मानपाडा रस्त्या मार्गे डोंबिवली मध्ये प्रवेश केला. तिथे लगेचच आणखी एक निराकेंद्र होते, तेथे मात्र श्विन स्कॉटने आत्मा थंड करवून घेतला.
सूर्योदयाच्या आधीच्या विष्णुप्रहरात घर सोडून परत श्विन स्कॉट घरी परतले तेव्हा मात्र सूर्योदयानंतर तीन प्रहर उलटून गेले होते.
#tjsbbank #saveoursahyadri #ismartcommute #dombivlicycleclub





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा