The tragedy of life is not that it ends so soon, but that we wait so long to begin it.
मधुमेहाने श्विनला ९ वर्षांपूर्वी भानावर आणले आणि श्विनने जगणं सुरु केले. जीवन किती सुंदर आहे हे अनुभवण्यासाठी मधुमेह हा गुरु, मित्र श्विनला लाभला होता. प्रत्येक क्षणात आपण एक काम करत असतो आणि विचार इतरच असतात. त्यामुळे जो क्षण आपण जगत आहोत तोही निसटून जातो. मात्र मधुमेहाची साथ लाभताच त्याने समोर आलेला क्षण पूर्ण जगायला शिकवलं. श्विनबरोबर दौड करताना हातात आलेला क्षण निसटून जाण्याआधी तो परिपूर्णपणे जगण्याची अनुभूती नक्कीच मिळते. किंबहुना असे परिपूर्ण क्षण जगण्यासाठीच श्विनची सफारी (schwinnsafari) सुरु असते. डोंबिवली पणजी सफारी हि सुद्धा त्याच परिपूर्ण जगण्याची एक झलक होती. पहिल्या दिवशी तांडेम सायकलवरील जोडगोळी आणि इराणी मित्राने साथ दिली होती. भारताला इराणमधून किती आणि कसे पेट्रोल मिळते हे मला माहित नाही आणि आपल्याकडे नळाला पाणी मिळते (हल्ली तेही मिळत नाहीच म्हणा) तसे मुबलक प्रमाणात इराणमध्ये जागोजागी नळालाच पेट्रोल मिळते का हेही मला माहित नाही. मात्र त्या इराणी मित्राला मात्र (त्याच्या देशातील आठवण म्हणून असेल कदाचित) रात्रीच्या निवाऱ्यासाठी पेट्रोल पम्पच सोयीचा वाटला होता.
श्विन आणि स्कॉटने मात्र तळेगाव गाठले. दुसऱ्या दिवशी (रविवारी) दुपारपर्यंत पुन्हा मुंबई गाठून सोमवारी परत पुण्याला यावे लागणार होते. त्यामुळे श्विन स्कॉटने रविवारच्या सकाळच्या वेळेचा फायदा घेत नऱ्हे गाठून मग बसने मुंबई गाठायचे ठरवले. हि सगळी ठरवाठरवी होत असतानाच श्विनला एक फोन आला. उत्साहाने भरलेल्या आवाजातच त्याने ओळख सांगितली,"नमस्कार, मी संतोष कांड." आमची प्रत्यक्ष ओळख तर नव्हतीच शिवाय अगदी भ्रमणध्वनी द्वारेही संवाद साधण्याची हि पहिलीच वेळ होती. चिंचवड येथील सायकलमित्र सुनील पाटील यांनी मला संतोषचा फोन येईल असे सांगितले होतेच. संतोषशी बोलताना पहिल्या एकदोन वाक्यातच आमची ओळख कित्येक वर्षांपूर्वीची असावी हे जाणवू लागले. संतोष हा सुद्धा मूळ डोंबिवलीकरच. माझ्या एक वर्ष आधीच्या बॅचला हा होता. दोघांची शाळा वेगळी होती, मात्र बोलता बोलता आमचे अनेक मित्र सामाईक असल्याचे लक्षात आले. मी आणि संतोष दोघांचे शिक्षण डोंबिवली मध्ये झाले तेव्हा डोंबिवली चा जीव फार मोठा नव्हता. आमचे मित्र सामाईक असले तरी तेव्हा आमची ओळखही झाली नव्हती. मात्र श्विनने मला आणखी एक जिवलग मित्र मिळवून दिला होता. 'दुनिया छोटी है' हे जेवढे खरे तेवढेच 'दुनिया गोल है', हेही खरं ठरलं होत.
"तुम्ही नर्हेहून कधी निघणार आहात, मी तुमच्यासाठी खाऊ घेऊन येणार आहे" संतोष म्हणाला. किंबहुना हे सांगण्यासाठीच तर त्याने फोन केला होता. मी काही आणू का, नव्हे तर मी आणणार आहे असा त्याचा आपुलकीचा धाक घरातील वडीलधाऱ्यांसारखाच होता. 'हे विश्वची माझे घर' ह्या वाक्याचा अर्थ अश्या सायकलसफरीतच.... किंबहुना आपला परीघ/वलय सोडून फिरतानाच कळत असतो. संतोषसारखे कुटुंबीय हा अर्थ समजावून देत असतात.
रविवारी सकाळी श्विन आणि स्कॉटने तळेगावहून कूच केले तेव्हा सूर्याचे सफरचंदासारखे रूप मोहवून टाकत होते.
स्कॉटने सुरुवातीलाच वेग गाठला होता, मात्र श्विनने अहिस्ता पेडल धोरण अवलंबले होते. कोणताही व्यायाम करताना आधी स्नायू मोकळे होण्यासाठी सुरुवात धीम्या गतीने करणे आवश्यक असते. हे माहित असले तरी तळेगावच्या मिलिटरी परिसरातील मोकळ्या रस्त्याचा आनंद मनमुराद पणे लुटण्यासाठी स्कॉटने वेगात सुरुवात केली होती. मात्र जोरात सुरुवात केल्यामुळे स्कॉटला लवकरच विश्रांती घ्यावी लागली. मग मात्र श्विन स्कॉट दोघेही संथगतीने निघाले. पूर्वी डोंबिवलीकर असलेला श्विनचा शालेय मित्र विनायक खुपेरकर (विनू) वाकड फाटा येथील जोशी वडेवाले येथे भेटणार होता. खरतर तो रात्रपाळी करून घरी येणार होता, तरी श्विनला भेटण्याची आतुरता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. श्विन आणि स्कॉट वाकड फाटा येथे पोचले तेव्हा अंदाजापेक्षा अर्धातास उशीर झाला होता. श्विनने जोशी वडेवाले यांचे हॉटेल शोधले मात्र त्या जागी आता दुसरेच हॉटेल उभे होते.
मग तिथे असलेल्या नवीन हॉटेलमध्ये चहापान करून श्विन आणि स्कॉट पुढे निघाले. भुजबळ चौक पार करून महामार्गाने जात असताना स्कॉटची गती मंदावली होती. पुढील रस्ता रुंद आणि उत्तम स्थितीत असला तरी त्यावर चढ उतार बऱ्यापैकी होते. स्कॉटला या मार्गात अश्या चढ उताराची अपेक्षा नसल्याने स्कॉटची गती फारच मंदावली. अर्थात आज केवळ सकाळचे २-३ तासांचाच पल्ला गाठायचा असल्याने वेळेची तशी फिकीर नव्हती. श्विन पुढे आणि स्कॉट मागे अश्या रीतीने जात असताना मधले अंतर वाढू लागले की श्विन पुन्हा स्कॉटला पुढे जायला सांगत असे. आणखी एक चढ पार केल्यावर स्कॉटने पुन्हा विश्रांती घेतली. श्विननेही स्कॉटच्या पुढे थांबा घेतला. इतक्यात श्विनला हाक ऐकू आली,'हाय!' श्विननेही त्या दिशेला वळून प्रत्युत्तर दिले. 'मी शंकर गाढवे.' त्याने ओळख दिली. ओहोहो, प्रत्यक्ष शंकर गाढवे! श्विन आणि शंकर दोघेही cycle2work ह्या समाजमाध्यमावरील गटात सामील होते, तसेच strava वर ही होते. त्यामुळे श्विनला शंकरची प्रत्यक्ष ओळख नसली तरी त्याचे उपक्रम माहित होते. श्विनने स्कॉटलाही शंकरची ओळख करून दिली. शंकर हा सायकलिंग मधील शतकांचा बादशहाच होता. जवळपास रोज शतकी राइड करणे ही सवय त्याने लावून घेतली होती. आज खरं तर धावण्यासाठी जाणार होता. मात्र उशिरा उठल्यामुळे त्याचे धावणे रहित झाले होते. त्यामुळे स्वतःलाच शिक्षा म्हणून तो आज पुन्हा शतकी राइडसाठी निघाला होता. श्विन आणि स्कॉटची सफर कळताच तोसुद्धा थोडावेळ साथ देण्यासाठी धीम्या गतीने येऊ लागला. श्विनच्या बरोबरीने जात असताना त्याने काही सल्लेही त्याने अगदी सहजपणे दिले. स्कॉटची गती पाहत काही अंतरातच उतार सुरु होईल असे त्याने आश्वस्तही केले. खरोखरीच काही काळातच तसा उतार सुरु झाला, मात्र तेथून लगेचच शंकर मात्र परत फिरणार होता.
लवकरच स्कॉट आणि श्विन नवले पुलाजवळ पोचले. आज श्विन आणि स्कॉटला येथेच ठेवून परत मुंबईला परतायचे होते. तेथील सन युनिव्हर्स ह्या आजच्या गंतव्यस्थानी प्रवेश करत असतानाच आणखी एका सायकलस्वाराने श्विनचे स्वागत केले. श्विनने परिधान केलेला 'डोंबिवली पणजी सायकलसफर' हा फलक पाहून तोही थबकला होता. हा युवा सायकलस्वार होता स्वानंद वेलणकर! स्कॉट थोडी मागे राहिली होती. त्या वेळात स्वानंदला ३फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात होणाऱ्या २ऱ्या सायकल संमेलनासंबंधी माहिती देण्याची संधी श्विनने साधली.
शंकर आणि स्वानंदला भेटून आज सकाळची छोटी राइड मात्र सार्थकी लागल्याचे समाधान श्विनला नक्कीच वाटत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा