बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

विंचवाचे बिऱ्हाड (डोंबिवली पणजी सायकलसफर लेख क्रमांक ६)

What does running gives you rather than walking ....is injury.

धावताना आपण चालण्यापेक्षा अधिक काय मिळवू शकतो तर ते म्हणजे अपघात/ जखम! धावणे आणि योग्य गतीने चालणे या दोन्हीमध्ये व्यायामाच्या, आरोग्याच्या दृष्टीने फायदा सारखाच असला तरी चालताना अपघात होण्याची शक्यता स्वाभाविकतःच कमी होत असते.

ह्याच प्रमाणे चालण्या (किंवा) धावण्या मध्ये आपण सायकलिंग पेक्षा अधिक काय मिळवू शकतो तर ती आहे गुडघेदुखी. चालताना अथवा धावताना आपल्या गुडघ्यावर भार येत असतो त्यामुळे गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. गुडघेदुखी थांबवण्यासाठी गुडघ्यांना चक्राकार अथवा गोलाकार पद्धतीने व्यायामाची गरज असते. सायकलिंग करताना तो व्यायाम आपोआपच मिळाल्याने सायकलिंगमुळे गुडघेदुखी बंद होऊ शकते. श्विनने याचा स्वानुभव घेतला आहेच. मात्र ठाणे येथील भाटेकाका हे याचे उत्तम उदाहरण ठरावे. भाटेकाकांना वयाच्या साठीनंतर गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला. तेव्हा डॉकटरांच्या सांगण्यावरून त्यांनी सायकलिंग सुरु केले. त्यानंतर त्यांची गुडघेदुखी तर दूर झालीच शिवाय आज वयाच्या ९२ व्या वर्षीही ते रोज १५-२० किमी सायकलिंग करण्याइतके ठणठणीत आहेत.

श्विन स्कॉटला तरी गुडघेदुखी हा पाहुणा घरी कुठे हवा होता. ती घालवण्यासाठी सायकलभ्रमंती हा एक पर्याय होता.

डोंबिवली गोवा सायकलफेरीदरम्यान खोपोलीमध्ये प्रवेश केल्याबरोबर स्कॉटचें लक्ष ग्रीन पार्क हॉटेलकडे वळले. हे स्कॉटचे लाडके हॉटेल. हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत श्विन आणि स्कॉटला उभे करत असतानाच समोर तांडेम सायकल पुन्हा दिसली. DC (Deccan Cliffhanger) ची तयारी करत असलेली जोडगोळीसुद्धा आमच्या पुढे येऊन ग्रीन पार्क मध्येच विसावली होती. श्विन स्कॉटने त्यांच्याच शेजारचे टेबल पकडले आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरु झाल्या. ते दोघे एकाच तांडेम सायकलवरून प्रवास करत असले तरी दोघेही वेगवेगळ्या शहरातील होते. एक होता 'आमची मुंबई' मधील भांडुप येथील विनीत तर दुसरा होता दिल्ली येथील सुदेब रॉय. दृष्टिदोषावर मात करत सुदेबच्या साहाय्याने विनीत सहजपणे सायकलिंग करत होता. तांडेम सायकलद्वारे DC मध्ये भाग घेणारी हि पहिलीच जोडी होती हे तर आणखी विशेष. विनीत आणि सुदेब यांचा ३ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या सायकलसंमेलनातील सहभाग निश्चित करून श्विन स्कॉटने त्यांचा निरोप घेतला.

श्विन स्कॉटची खरी कसोटी आता सुरु होणार होती. खंडाळ्याच्या घाटाचे दडपण श्विनला नसले तरी प्रत्येक वेळी हा घाट चढताना येणारा अनुभव हा नित्य नवा असतो. स्कॉटनेही खंडाळ्याचा घाट यापूर्वी दोन वेळा पार केला होता. मात्र दोनही वेळी काही काळ तिला पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळेच स्कॉटला लवकरात लवकर- म्हणजे ऊन्ह डोक्यावर यायच्या आधी घाट चढायला सुरुवात करायची होती. त्यामुळेच ती आप्पांकडे जाताना वेळेचा विचार करत होती. मात्र श्विनला स्वतः आणि स्कॉट दोघांबद्दलही पूर्ण खात्री होती.

घाट सुरु होत असतानाच स्कॉटला गियर कमी करायला सांगून श्विनने स्कॉटच्या मागे राहणे पसंत केले. खोपोली सोडल्यावर थोड्याच वेळात टाटा पॉवरहाऊस इथला चढ सुरु होतो, तो गियर कमी करून सहज चढता येऊ शकतो. मात्र गियर कमी केल्यावर दमायला होत नसले तरी पॅडलिंग मात्र जास्त वेळा करावे लागते. नव्यानेच हा घाट चढण्याचा प्रयत्न करणारे हा सोपा दिसणारा सुरवातीचा चढ थोड्या वरच्या गियरवर ठेवून दमतात किंवा कमी गियर करून चढ चढायला गेले तर कंटाळून थांबतात. खरंतर या वेळी आपले शरीर नाही तर मन दमते. अश्यावेळी कमी गियर ठेवत संयम राखुन न थांबता पेडलिंग करणे हाच उत्तम उपाय आहे.

श्विन आणि स्कॉटला अनुभवाने हे माहित झाले असल्याने दोघांनी हा पहिला टप्पा सहजगत्या पार केला. निसर्ग स्नॅक्स येथील वडा खाल्ल्याशिवाय पुढे जाणे हा मात्र तेथील वड्याचा अपमान ठरला असता. त्यामुळे बटाटा वड्याचा फडशा पाडत तेथे घाटातील पहिला विसावा घेतला गेला. यापुढील सुरुवातीचा रस्ता फार तीव्र चढणीचा नसला तरी एक वळण घेतल्यावर पुन्हा परीक्षा सुरु होते. त्यानंतरचा विसावा होता अर्थातच शिंग्रोबा मंदिर येथील! श्विन स्कॉटने हा टप्पाही संयम राखत गाठला. शिंग्रोबा हा खरतर इंग्रजांना घाटातून कोठे रस्ता तयार करता येईल हे सांगणारा एक वाटाड्या. आपला प्रवास सायकलने असो वा राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने, की खाजगी गाडीने...कोट्यावधी प्रवाशांना मार्ग दाखवणाऱ्या या शिंग्रोबाला वंदन करूनच या मार्गावरील प्रवासी पुढे जातात.

दरम्यान स्कॉट थोडी मागे राहिल्याने श्विनने शिंग्रोबाचे दर्शन घेतले. घाट चढत असताना तेथे मिळणारा खोबऱ्याचा प्रसाद खरोखरच मोलाचा होता. तो प्रसाद वाटणारा सेवेकरीही श्विनची आपुलकीने चौकशी करू लागला. श्विनचा डोंबिवलीहुन प्रवास सुरु असल्याचे पाहून तो अधिकच खुलला. तो सेवेकरीही काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथे प्रवासी रिक्षा चालवयाचा व्यवसाय करत असे. त्याच्या माहेराहून आलेल्या श्विन आणि स्कॉटला पाहून म्हणूनच तो हरखून गेला होता. घाट चढत असणाऱ्या श्विन स्कॉटला त्याने माठातील गार पाणी घेण्याचा आग्रह केला. ते गार पाणी पिऊन श्विन स्कॉटने पुढील प्रवास सुरु केला.

आता पुढे २-३ वळणांनंतर हा घाट चढताना आलेला थकवा पार नाहीसा करणारा धबधबा लागणार होता. त्यामुळे श्विनने उत्साहातच पेडल दामटवले. धबधब्यापाशी श्विन पोचल्यावर दिसणारे जे दृश्य निराशा करणारे होते. पावसाळा संपतोय न संपतोय तोच येथील धबधब्यामधील खळाळणाऱ्या प्रवाहाचे रूपांतर करंगळी एवढ्या धारेत झाले होते. धबधब्यात पाणी नसल्याने श्विनच्या उत्साहावर मात्र पाणी पडले होते. स्कॉट तेथे पोचत असताना श्विनकडे पाहूनच धबधब्याची अवस्था स्कॉटने ओळखली. अर्थातच तेथे न थांबताच श्विन स्कॉट पुढे निघाले.

तेथून पुढील काही रस्ता फार चढणीचा नसल्याने श्विन स्कॉट थोड्या वेगात पुढे सरकले. मात्र घाटातील अंतिम टप्प्यात लागणारा- राजमाची दर्शन घडवणाऱ्या ठिकाणाआधीचा तीव्र चढ चांगलीच परीक्षा घेणारा होता. याची कल्पना असल्याने श्विन आणि स्कॉटने शांतपणे पण निर्धाराने पेडलिंग सुरु केले. आपले लक्ष पुढील जेमतेम ४-६ फूट अंतरापर्यंत ठेवत पुढे सरकत राहिल्याने तीव्र चढाचे दडपण येत नाही. राजमाची पॉईंट पर्यंत पोहोचल्यावर मात्र दोघांनी हुश्श केले.

त्याच आनंदात खंडाळा विनासायास पार केला आणि लोणावळा दृष्टीक्षेपात येत असताना श्विनला तेथे निराकेंद्र दिसले. निसर्ग स्नॅक्स येथील वडा केव्हाच इतिहासजमा झाला होता. खंडाळा घाट पार केल्याचा आनंद नीरा पाहून साजरा करण्याचे ठरवून श्विन स्कॉट तेथे थांबले. इतक्यात मागाहून इराणी मित्र येताना दिसला. संपूर्ण घाटात दर्शन न देणाऱ्या ह्या इराणी मित्राला श्विनने निरापानाच निमंत्रण दिले. त्याचाही घसा कोरडा झाला असावा. त्यामुळे त्यानेही ते निमंत्रण तातडीने स्वीकारले. कोणतेही वाक्य पूर्ण न करता केवळ इंग्रजी शब्दफेक करण्याची भाषा आता श्विनला कळू लागली होती. त्याच्या इंग्रजी शब्दफेकीला साथ देत श्विनने निरापान उरकले. श्विन स्कॉटच्या बरोबरीने आता इराणीही मार्गक्रमण करू लागला. श्विनची त्या इरण्याशी गट्टी जमताच स्कॉटने वेग घेतला. इराणमधील चित्रपट दिग्दर्शक माजीद माजीदी हा श्विनचा आवडता दिग्दर्शक! त्याचे भावनिक चित्रपट श्विन आणि स्कॉट दोघांनाही आवडत. मग आमची संभाषणाची गाडी माजीद माजीदी वर घसरली. त्याबरोबर तो इराणीही खुलला.

सायकलच्या कॅरियरला दोन्ही बाजूला लावलेल्या पॅनियर मधील सामानाचे ओझे वाहत त्याने खोपोली घाट कसा चढला हे एकतर त्या इराण्याला माहित आणि प्रत्यक्ष भगवंताला माहित. मात्र त्या इराण्याचा उत्साह अजून कायम होता. कधी तो इराणी पुढे तर कधी श्विन स्कॉट पुढे असे एकमेकाच्या संगतीत जात असताना प्रत्येकजण आपापल्या सोयीने वेग राखत होता. इराणी मित्र थोडा पुढे निघून गेला होता. दरम्यान अप्पांकडून घेतलेली तीन केळीही फस्त झाल्यामुळे खंडाळा लोणावळा इथे भूकेची जाणीव झाली नव्हती. मात्र कार्ला कडे जाणारा चौक पार झाल्यावर मात्र इंधनाची गरज जाणवू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा बटाटा वड्यावर ताव मारण्यात आला. इतक्यात तो इराणी मित्र पुन्हा पुढे जाताना दिसला. बहुधा तो सुद्धा कुठेतरी थांबला असावा, कारण तो आधीच पुढे गेला असताना त्यानंतर श्विन स्कॉटने त्याला परत मागे टाकले नव्हते. श्विन स्कॉट रस्त्याच्या उजव्या बाजूला क्षुधाशांती करत होते आणि दुभाजकापलीकडून तो इराणी पुढे जात होता. त्यामुळे त्याला पुन्हा थांबवताही येत नव्हते.

आता ऊन्ह कलायला लागली होती. श्विन स्कॉटने पुन्हा जोर लावला. श्विनच्या मनाजोगता वेग मिळाल्याने तळेगाव ऐवजी नऱ्हे पर्यंत किंवा किमान चिंचवड पर्यंत पोचणे शक्य होईल असा विश्वास श्विनला वाटू लागला. मात्र थोड्या वेळात स्कॉटचा वेग मंदावला. स्कॉटने एक विश्रांती घ्यायची ठरवली. तसे पाहता आता तळेगाव जवळच होते. तरी दोघांनी एका पेट्रोल पम्पपाशी क्षणभर विश्रांती घ्यायचे ठरवले. पेट्रोल पंपच्या आवारात श्विन स्कॉट शिरले आणि पुन्हा ताजेतवाने झाले. मार्गक्रमणासाठी पुन्हा सज्ज होत असतानाच दोघांच्याही आधी त्याच पेट्रोल पम्पवर येऊन पोहोचलेल्या इराणी मित्राने हर्षभरित होऊन साद घातली. त्या इराण्याची सायकल विश्राम करत असताना पाहून श्विनने त्याला आजची मजल कुठपर्यंत आहे असे विचारले. 'Night here ..petrol pump' असे शब्द फेकत त्या इराण्याने तो रात्री पेट्रोल पंप वरच राहणार असल्याचे सूचित केले. सायकलच्या कॅरियरवर दोन्ही बाजूला अडकवणाऱ्या पॅनियरच्या झोळीत त्याचे बिऱ्हाड सामावलेले होते. विंचवाचे बिऱ्हाड पाठीशी असे म्हणतात, मात्र हा इराणी खरोखरच त्याचे बिऱ्हाड पाठीशी घेऊन फिरत होता. काही दिवसांपूर्वी श्विनने रोज रात्री पेट्रोल पम्पवर राहुन भारत परिक्रमा करत असलेल्या इराण्याबद्दल वाचले होते. तो इराणी हाच की काय! असा श्विनला पडलेला संभ्रम मात्र त्या इराण्याच्या शब्दसंपदेतून दूर होण्याची चिन्हे नव्हती. मात्र श्विन आणि इराण्याच्या गप्पा पुन्हा रंगल्या, त्या दरम्यान रविमहाराजांनी बराच पल्ला गाठला. तो अंदाज येताच श्विन आणि स्कॉट पूढे निघाले. तळेगाव येईपर्यंत उजेड बऱ्यापैकी होता, त्यामुळे चिंचवड पर्यंत दौड करण्याची श्विनची इच्छा होती. मात्र स्कॉटने तळेगावचाच आग्रह धरला. अर्थातच तळेगावला मुक्कामी पोचत असताना अस्तंगत पावत असलेल्या सूर्याने स्कॉटचाच निर्णय बरोबर असल्याची ग्वाहीही दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...