सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

मोहीम शिंग्रोबा

#ashadhchallange day 25, Indian National date Ashadh 25th 1939

मोहीम शिंग्रोबा

मुंबई हुन पुण्याला जुन्या महामार्गांने जाताना खंडाळा घाट सुरु झाला की वाहनाच्या खिडकीकडे गर्दी होत असे.... अजूनही होते.

शिंग्रोबा च्या देवळात आपले पैसे देणे खरोखरच भाग्याचे समजले जाते.

#dombivlicyclingclub च्या Sanjay Datye आणि Bhimashankar Birajdar यांच्याबरोबर आज खंडाळा घाटात चढाई करून शिंग्रोबा मंदिराचे दर्शन घ्यायचे निश्चित केले होते.
काल झोपायला उशीर झाल्याने मी जर ५.३० पर्यंत फोन केला नाही तर माझी वाट बघू नका असे सांगितले होते, पण सुदैवाने ४.३० च जाग आली.
अर्थात तरी नेहमीप्रमाणे मला निघायला उशीर झालाच. दोघांनाही चार रास्ताला यायला सांगून निघालो. पण तिथे पोचताच दात्येंचा फोन आला की त्यांची सायकल puncture आहे.

DCC चे बॉण्डिंग इथेही कामी आले. बिराजदार अजून पोचले नव्हते. त्यांना त्यांची सायकल घरी ठेवून सारंगकडून डबल सायकल आणायला सांगितली. पण इथेही प्रॉब्लेम होता. सारंग माहुलीला जाणार होता. मग लगेच त्याला फोन करून आम्ही तिघे त्याच्याकडे पोचलो. Durgesh Zipre नी DCC ला दिलेली डबल सायकल आज उपयोगी आलीच.

श्विनला अनोखी सोबत मिळाल्याने श्विनही खुश झाली. आम्ही निघालो, तर वाटेत vinit shetye आम्हाला पाहून आमच्यामागे येऊ लागला. त्याला वाटत होते की आम्ही DCC च्या रेग्युलर संडे राइडला जात आहोत. मग त्याला आमचा प्लॅन सांगितला.

आषाढसरी मात्र आजही श्रावणसरींच्याच रुपात अवतरत होत्या. डोंबिवली मागे पडून शिळ फाटा जवळ आला आणि एकजण 'मानवशक्ती' ऐवजी 'अश्वशक्ती' (की 'यंत्रशक्तीवर') चालणारी दुचाकी घेऊन आमच्याकडे आला. हेल्मेट मुळे मी ओळखले नाही. त्याने हेल्मेट काढले,तर साक्षात मेघेश बाहुबली समोर! बिचारा रात्रपाळी करून घरी जाऊन लगेच पुन्हा ऑफिसला जाणार होता. पण तरी त्याचा उत्साह कायम होता.

मग शिळ फाट्याला चहा घेऊन मेघेशला निरोप दिला. निसर्ग आमच्यावर पूर्णपणे खुश असावा. 'अरुण' चे दर्शन नव्हतेच, पण वरुणलाही निसर्गदेवता जास्त काळ दर्शन देऊ देत नव्हती. पण वरुण चा खोडकरपणा काही कमी नव्हता. पाऊस आला म्हणून रेनकोट घातला की रेनकोट ओला करून आणि आमच्या चेहऱ्यावर ताजेतवाने करण्याइतपत दर्शन देऊन वरुणराज गायब होत होते. मग काय गरम होऊ नये म्हणून पुन्हा रेनकोट काढावा लागत होता.

दरम्यान पळस्पे फाट्याला नाश्याचा प्लॅन मात्र आम्हाला पुढे ढकलावा लागला. अखेरीस शिळ फाट्याला चहा घेतल्यानंतर चौक फाट्याला वडापाव वर समाधान मानावे लागले. जोशिकाका ठरल्याप्रमाणे महड फाट्याला भेटल्यावर आम्ही खोपोलिकडे कूच केले.
खोपोली सोडल्यावर अवघ्या ३ किमी अंतरावर शिंग्रोबा मंदिर आहे. बिराजदार-दात्येंची डबल सायकल आणि जोशीकाकांची सायकल सिंगल स्पीड असल्याने त्यांना चालत घाट चढण्यावाचून पर्याय नव्हता. घाटाच्या सुरुवातीला फोटो सेशन केल्यावर आम्ही पुढे निघालो. तर पुढे पुण्याचा जयेश कहार हा सायकलिस्ट भेटला. तो पुण्याहून येऊन घाट उतरून परत चालला होता. DCC चे इतर तीन शिलेदार मागे राहिल्याने जयेशबरोबर सायकलिंग करत घाट चढत होतो. पण इतर तिघे चालत येत असल्याने खूपच मागे पडल्यामुळे जयेश बरोबर selfie घेऊन मी थांबलो.
शिंग्रोबा मंदिरापाशी आम्ही पोचलो तेव्हा वरुणराजाही प्रसन्न झाला होता. दर्शन घेऊन आणि फोटो काढून आम्ही परत निघालो. नितीनने केलेल्या वर्णनामुळे बिराजदार घाटातील वडे खाण्यासाठी फार उत्सुक होते. तेथे पोचलो, तर वरुणराज चांगलेच रंगात आले. वडे-भजी वर ताव मारून खोपोलीला उतरलो. जोशिकाका खोपोली रेल्वे स्टेशनकडे वळल्यावर आम्ही पळस्पे फाट्याकडे सुसाट परतलो.

दरम्यान खोपोलीनंतर ५-७ किमी नंतर वरूण राजाचा जोर ओसरून पुन्हा त्याचा आमच्याबरोबर खेळ सुरु झाला.

पळस्पे फाट्याला पुन्हा नाश्ता केला आणि पुढे निघालो. तेव्हा ३ वाजले होते. दिवसभरात भास्कराचे दर्शन झाले नव्हते, मात्र पनवेलच्या पुढे आल्यावर काही काळ मात्र भास्कराचार्यांचे दर्शन झाले. कळंबोली ते शिळ फाटा दरम्यानच्या टोल नाक्याचा हॉल्ट हा हवाच. येथील कर्मचारी सायकलिस्टसचे नेहमीच चांगले स्वागत करतात. तेथे पाणी भरून घेऊन, नेहमीप्रमाणे कोकनरत्न येथे चहासाठी थांबलो.

तेथे ममताचा फोन आला की ती आम्हाला receive करायला सायकलने येत आहे. DCC चे कुटुंब किती घट्ट आहे याचीच हि प्रचिती होती.

आमच्या १४६ किमी च्या या राइडमध्ये सारंग, विनीत, मेघेश, जोशिकाका आणि ममताबरोबर DCC चा प्रत्येक सभासद मानसिकरित्या सहभागी होताच.

जाता जाता ज्या शिंग्रोबा मंदिरात आम्ही गेलो होतो, त्याबद्दल थोडक्यात:
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा! धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा
शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते . शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे.त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले. म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते . परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकारयांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले.ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते . जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भार्षेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे “छापील’ ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व १९६६ ते १९९१ या ख्रिस्ती वर्षाच्या काळात धनगरांच्या चालीरीती,संस्कृती,ओव्या, इतिहास, पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे संशोधन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...