सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

चिखलाचा अभिषेक

सकाळप्रमाणेच घरी परत निघतानाच श्रावणसरींनी सलामी दिली. पण #tjsb bank च्या गेटबाहेर पडेपर्यंत मात्र वरूणराजाचा उत्साह संपला. मात्र निघतानाच मिळाल्या जोरदार सलामीमुळे आणि रस्त्यात अपेक्षित असलेल्या चिखलाच्या अभिषेकाच्या चाहुलीमुळे मी जय्यत तयारीतच निघालो.

माजीवडा नाक्यावरील नाशिककडे वळणाऱ्या पुलावर वाहनकोंडी झाल्यामुळे श्विनला उजवीकडे वळायला मदतच झाली. खारेगाव टोल मागे टाकला आणि डावीकडे नजर फिरवली. दुरवरील क्षितिजापर्यंत केवळ हिरवा रंग आणि मध्येच वाहणारी खाडी हे चित्र प्रसन्न करीत होते.

खरंच अशी दृश्य रोज पहायची तर केवळ सायकलसफारीच हवी. कोणत्याही इतर वाहनाने हि मौज अनुभवता येणे अवघडच. निसर्गाचे रूप पाहत श्विनसह तिथे थांबलो आणि 'डोळ्याने पाहीन रूप तुझे' असे निसर्गदेवतेला म्हणत पुन्हा श्विनला वेग दिला.

वरूणदेवता आणि सरकारचे संबंधित कर्मचारी, प्रजेचे प्रतिनिधीत्व करणारे राजकारणी यांच्या कृपेने ठाणे नाशिक रस्त्यावर चिखल मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपदात गणेशमूर्ती या मातीच्याच असाव्यात यासाठी तर हि खटपट नाही ना अशी शंका मनात डोकावली.

मात्र सकाळप्रमाणेच वरूणराजांची हद्द मानकोलीपर्यंतच संपली. पुढे पिंपळासपर्यंत तरी रस्ता कोरडा होता.

मात्र पिंपळास पासून पुन्हा एकदा खड्डे आणि चिखलमय प्रवास सुरु झाला.

काल संध्याकाळी नवीन कल्याण रस्त्यावर रोज डोंबिवलीतील अरुणोदय शाळेपासून कल्याणला ऑफीसला जाणाऱ्या स्वप्नीलशी ओळख झाली होती. काल त्याला #dombivlicyclingclub (DCC) ची माहिती देऊन येत्या रविवारच्या राइडचे निमंत्रणही दिले होते. तो आज मात्र दिसला नाही.

रोज घरी पोचल्यावर माझी आंघोळ ठरलेलीच. पण मणभर चिखलाने माखलेल्या श्विनलाही आंघोळ घालावी लागली, मगच माझा स्वगृहीप्रवेश झाला

#ismartcommute #cyclingzens #dombivlicyclingclub #

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...