सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

हिरवा निसर्ग हा भवतीने

#Shravanchallangeday 14. Saturday- Scientific solar date Bhartiy Saur Shravan 14, shake 1939

शनिवार असल्याने वातावरणातही उत्साह होता. सकाळचे कोवळे उन्ह अंगावर घेत श्विन #cycle2work साठी निघाली. डोंबिवलीतील खड्डे आज पाण्याविना ओस पडले होते. ठाकुर्ली कल्याण रेल्वेला समांतर जाणाऱ्या नवीन कल्याण रस्त्यावर श्विनने वेग वाढवला.
तेथील ओपन जिमपाशी एक सायकल होती, पण सायकलस्वार बहुदा ओपन जिमवर व्यस्त होता.
दुर्गाडी किल्ला आणि पुढील चौकातील अश्वारूढ शिवाजीमहाराज यांचे दर्शन होताच श्विनलाही स्फुरण न चढल्यासच नवल. नवीन दुर्गाडी पुलावरून श्विन पुढे दौडत निघाली, पण कोनगावातील अडथळ्यांची शर्यत सुरु होताच श्विनची चाल मंदावली. पण ती काही काळच.

मग मात्र गोवे-रांजनोली जवळील पावसाअभावी कोरडे पडलेले खड्डे वगळता श्विनची चाल लयीत सुरु होती. आज श्रावणाने वरुण राजाला रजेवर पाठवले होते आणि अरुणमहाराज त्यांचे दर्शन द्यायला उत्सुक होते. काल ऑफिसला जाताना लोकलप्रवासात प्रचंड घामाघूम झाले असले, तरी आज श्विनबरोबर असताना पवन राजे सतत हजर होते.
डोंबिवली स्थानकात पंख्याखाली उभा राहून रुमाल ओला होईपर्यंत काल घाम येत होता, पण आज पवनराजांमुळे नैसर्गिक वारा घामाचे थेंबही येऊ देत नव्हता.
पिंपळास पुढील चढावर मात्र घर्मबिंदू अवतरले, पण तो चढ चढताच पवनराजांनी पुन्हा एकदा ताजेतवाने केले. खिंडीपुढील उतारावरून जात असताना थांबणे श्विनला आवडत नसे. पण त्या उतारावरील डाव्या बाजूच्या एका छोट्याश्या तळ्याच्या मोहामुळे मी श्विनला थांबवले.
त्या तळ्याच्या सर्व बाजूने वृक्षराजी होती. तळे छोटेच असले तरी सर्व बाजूने असलेल्या त्या हिरवाईची छटा त्या तळ्यात खुलून दिसत होती. दुर्दैवाने त्या तळ्याच्या काठावर मात्र सर्वत्र फेकून दिलेल्या डिशेस पसरल्या होत्या. ज्या नैसर्गिक तळ्याने इतका सुखद अनुभव दिला त्याच तळ्याची अशी विटंबना करणारे महाभाग किती क्रूर असावेत.

मात्र त्याच्या आसपास असलेल्या हिरवळीवर फुलपाखरे, चतुर सुखेनैव संचार करत होते. पण ऑफिसला वेळेवर जायचे असल्याने त्यांच्याशी करत असलेल्या गुजगोष्टी मला आवरत्या घ्याव्या लागल्या.
तिथून पुढे उतार संपता संपता मानवाच्या सोयीसाठी झालेल्या नैसर्गिक संपत्तीची आणखी एक हानी नजरेस पडली. एक दुर्दैवी साप तिथे चिरडला गेला होता.
महामार्ग हवेतच पण ते बांधताना अशी हानी होणार नाही याची काळजी घेता येईल का? अनेक जंगलातून रस्ते बांधले जातात त्यावेळी जंगली प्राण्याची नैसर्गिक वाट अडवली जाते. रस्ता ओलांडताना दिलेल्या धडकेत सापासारखे सरपटणारेच नव्हे तर वाघ, बिबळ्यासारखे प्राणीही नष्ट होत असतात. रस्ते बांधताना कित्येक औषधी झुडुपेच नव्हे तर वृक्षही नष्ट केले जातात. मानव निसर्गावर मात करत असताना अश्या रस्त्यांसाठी काहीतरी उपाय नक्कीच शोधायला हवा. कारण अश्या रीतीने होणाऱ्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास माणसाच्याच अंगावर उलटू शकतो, नव्हे तसा तो अनेकदा उलटलाही आहे.
शक्य तेथे बोगदे बांधून जंगलातील रस्ते केल्यास काही प्रमाणात हि नैसर्गिक संपत्ती वाचवता येईल. तज्ञ मंडळी यखेरीज अनेक उपाय सुचवू आणि योजू शकतील.

असो, इतका विचार करेपर्यंत श्विनने माणकोली पार केले होते. तेथुन पुढे डावीकडे दिसणाऱ्या मुंब्रा डोंगररांगांवर काळे ढग जमा झाले होते. इतक्यात एक दोन पावसाचे थेंब माझ्या अंगावर पडल्यासारखे वाटले. मी ९० अंशात वर पहिले तर ढग अजिबात नव्हते. मग सरळ रेषेत पुढे ठाण्याच्या क्षितिजावर पहिले तर काळसर ढग दिसत होते. शाळेत वैदिक शिक्षण न मिळाल्याने निसर्गाच्या संकेतांचीं ओळख विसरलो असलो तरी श्विनने पुन्हा निसर्गाच्या चाहुलखुणांची ओळख करून दिली होती. त्यामुळे ठाण्याच्या क्षितिजवरील काळ्या ढगांमध्ये 'उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम' अशी परिस्थिती असल्याचे मी ओळखले.
ठाणे शहरात पोचताना आकाशात ढगांनी छत धरले असले तरी ते केवळ अरुणमहाराजांचे दर्शन थांबवण्यासाठीच होते.

#tjsb बँकेच्या प्रवेशद्वारातून श्विनने दिमाखात प्रवेश करेपर्यंत वरुण आणि अरुण यांचा पत्ता नसला तरी पवनमहाराज साथ करतच होते.
#saveoursahyadri #dombivlicyclingclub #ismartcommute #cyclingzens

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...