सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

मलंगगडाची श्रीमंती

#shravanchallange day8
भारतीय राष्ट्रीय दिनांक श्रावण ८, शके १९३९.
जगातील बहुतांश देश ख्रिस्ती असल्याने जास्तीत जास्त देशात ख्रिस्ती कॅलेंडर वापरले जाते, मात्र ते एकमेव जागतिक कॅलेंडर नव्हे. नेपाळसारख्या छोट्या देशातही official कामकाजात त्यांचे हिंदू धर्मावर आधारित राष्ट्रीय कॅलेंडर वापरले जाते. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने भारताने सूर्याच्या परिभ्रमणावर आधारित शास्त्रीय कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून स्वीकारले जे कोणत्याही धर्मावर आधारित नाही. जर आपण स्वातंत्रानंतरही ख्रिस्ती कॅलेंडर वापरले तर आपला देश हा ख्रिस्ती देश अथवा ख्रिस्ती देशाचा गुलाम देश ठरतो.

RBI आणि सर्व शासकीय कार्यालयात भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर वापरले जाते. तसेच ते प्रत्येक नागरिकाने सर्व ऑफिशियल कामकाजात वापरायला सरकार आणि RBI ने परवानगी दिली आहेच.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरच्या शके १९३९ मधील श्रावण ह्या पाचव्या महिन्याची आज ८ तारीख अर्थात #shravanchallange day 8.

रविवार असल्याने long ride चा श्विनचा मनसुबा होता. मात्र सकाळी घरातून निघेपर्यंत ७ वाजले होते. मग #dombivlicyclingclub (DCC) च्या रविवार राइडसाठी सामील व्हायचे ठरवले.
बिराजदारांनी सर्वजण खिडकाळीला जाणार असल्याचे कळवले होते, त्यामुळे मी आणि श्विन तेथे पोचलो. तर DCC मेंबर्स तेथे अजून पोहोचतच होते. सर्वांनी खिडकाळी येथील महादेवाचे दर्शन घेतले. तोपर्यंत अनेक वेगवेगळ्या सायकल भेटल्यामुळे श्विनचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यात @durgesh zipre ने बनवलेली डबल सायकल होती, @sarang mulye ची ३२ वर्षांची घोडा सायकलही होती. खिडकाळीच्या तलावावर सर्वांचे छान फोटोसेशन झाले. इतक्यात उनपाऊस सुरु झाला. उन्हात पडणारा पाऊस ही श्रावणाची मक्तेदारी. हा उनपाऊस सुरु झाला की पुन्हा बालपण आठवते. 'नागडा पाऊस' हे ह्या पावसाचे नावही हटकून आठवते.
खिडकाळीहुन लगेच परत घरी जायची श्विनची तयारी नव्हतीच. पण व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या उक्तीप्रमाणे खिडकाळीहून पुढे अनेक पर्याय समोर येऊ लागले. पण अखेरीस आधी खिडकाळी गावात जायचे ठरले. महादेव मंदिरातून खिडकाळी गावात जायला निघणार तोच संघमित्राच्या सायकल मध्ये हवा कमी असल्याचे लक्षात आले. हवा भरतानाच मला शंका आली कि टायर खराब झाला असल्याने सारखी पंक्चर होणार. खिडकाळी गावात पोचेपर्यंत माझी शंका खरी ठरली. त्यामुळे तिला घरी जावे लागणार होते.
DCC मधील हरहुन्नरी सभासद @pushkar joshi आणि #gandhar dombivlikar यांना पोहण्याचे वेध लागले होते, तर सारंग घोळ गणेश मंदिराला जाण्यासाठी घोळ घालू लागला होता. मी आणि ममताने मात्र  श्री #Malanggad ला जायचा निर्णय घेतला होता. @bhimashankar birajdar याना फितवण्याचा माझा प्रयत्न मात्र तोकडा पडला. मग खिडकाळी गावातून पुन्हा शिळ कल्याण रस्त्याला येताच सर्वजण आपापल्या मार्गाने निघाले. डॉक्टर सुनील पुणतांबेकर आणि काहीजण घरी परत जाणार होते, तर पुष्कर आणि टीम डुंबायला तलाव शोधायला निघाली.

पण माझा मलंग गडाचा प्लॅन ऐकताच @yogesh choughule हा दुर्गप्रेमीही लगेच आम्हाला सामील झाला.

मग मी, ममता आणि योगेश नेवाळी फाट्याकडे वळलो. श्रावणातील वातावरण आमचा उत्साह वाढवतच होते. नेवाळी फाट्याला कधी पोचलो हे कळलेही नाही.
 नेवाळी फाट्याला पोचून मलंग गडाकडे वळलो मात्र,... रस्त्याच्या एकंदर रुंदीची ९०% जागा व्यापणारा आणि जवळपास १० फूट लांब असा छोटासा खड्डा (की तलाव?) आमचे स्वागत करत होता. पुढे नेवाळी गावात रस्त्यावर इतके लांबरुंद नसले तरी छोटे छोटे तलाव तर पावलापावलावर नजर पडत होते. मला उगाचच #malishka चे '#mumbai tula BMC var bharavasa nay ka' हे गाणे आठवले.

मात्र श्विन पुढे जाताच ह्या तलावांकडचे लक्ष पार उडाले. सर्वत्र पसरलेली हिरवी चादर पाहता पाहता मन हरपून गेले होते. जसजसा मलंगगड जवळ येऊ लागला तसे निसर्गाच्या जादूसमोर आम्ही स्वतःला पार विसरून जाऊ लागलो.
मलंगगडाने पांघरलेली हिरवी शाल पाहू की त्या शालीभोवती घुटमळणाऱ्या ढगांची सोनेरी किनार लाभलेली दुलई पाहू! त्यातच निमिषार्धात जोरदार पाऊस तर निमिषार्धात ऊन, तर कधी नागडा पाऊस अशी उधळण श्रावणाने सुरु केली.

मलंगगडाजवळ जाता जाता तर किती फोटो घेऊ आणि किती सौंदर्य डोळ्यात साठवून ठेऊ हेच कळेनासे झाले होते. मलंगगड येताच नेहमीप्रमाणे चहा तर हवाच होता. पण श्रावणासरींनी आम्हाला भाजी खायचाही आग्रह केला होता. गप्पा मारता मारता योगेशचे अनेक पैलू उलगडू लागले. मलंगगडाच्या निसर्गाबरोबरच योगेशच्या ओळखीची ठेवही आज मिळाली होती.

परत निघण्याचे मनात नव्हते पण पर्याय नव्हता. निसर्गाची उधळण मागे ठेवून आम्ही परत निघालो. मलंगगडाभोवतीचा परिसर मागे पडला आणि नेवाळी गावातील फुटाफुटावरील छोटेछोटे तलाव पुन्हा स्वागताला हजर झाले. नेवाळीनाक्यावरील ९०% रस्ता व्यापणारा तलाव ओलांडून आम्ही बदलापूर काटई पाइपलाइन रोडला लागलो. तेथे गावठी भाजी घेण्याचा मोह काही आवरला नाही. रेनकोट टोपी सर्वकाही श्विनलाच सांभाळायला दिले होते. हॅन्डलला लावलेल्या टोपीत भाजी ठेवली आणि परतीच्या मार्गाला लागलो, आणि लगेचच जोराचा पाऊस सुरु झाला. वरुण राजाने चांगलेच पेचात पकडले होते. टोपी घालू शकत नव्हतो कारण त्यात भाजी होती. पावसाचा जोर पाहता 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' असे म्हणत निमूटपणे श्विनबरोबर रस्त्याच्या कडेला थांबलो. ममता आणि योगेश सुद्धा त्यांच्या सायकलबरोबर होतेच.

मात्र श्रावणाने आपला हट्ट सोडला नाही. थोड्याच वेळात त्याने वरूणराजाचा उत्साह आवरता घेतला आणि श्विनने घराकडे धाव घेतली.

#saveoursahyadri #ismartcommute #cyclingzens #tjsbbank #

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...