सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

उल्हास खाडी परिक्रमा

भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरच्या सौर माघ या महिन्याची आज शेवटची म्हणजे ३० तारीख! ख्रिस्ती कॅलेंडरही भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे सौर कॅलेंडर. त्यानुसारची तारीख १९ फेब्रुवारी!
हिंदू आणि मुस्लिम यांचे कॅलेंडर मात्र चांद्र कॅलेंडर. तरीही काहीजण अज्ञानामुळे आणि हट्टामुळे हिंदू राज्य निर्माण करणाऱ्या आणि तेही शककर्ता (नवीन चांद्र कॅलेंडर निर्माण करणारा) शिवाजीमहाराजांची जयंती चक्क सौर कॅलेंडरप्रमाणे म्हणजे तारखेने साजरी करतात. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ह्या ख्रिस्ती शिवजयंतीच्या सुट्टीची संधी साधत आज श्विन आणि स्कॉटने उल्हास खाडीची परिक्रमा करायचे ठरवले होते.  

डोंबिवली शहराला उल्हास खाडीने वेगळेच वैभव प्राप्त करून दिले आहे. श्विन आणि स्कॉटने आज अंमळ उशिरानेच सुरुवात केली होती. अरुणमहाराजांनी मात्र त्यांची परिक्रमा सुरु केली होती. डोंबिवली शहरातील शिक्षणाची दुकाने सुरु होत असल्याने त्याभोवती गर्दी झाली होती. 
तेथून वाट काढत श्विन आणि स्कॉटची उल्हास खाडीच्या परिक्रमेला सुरुवात झाली. 

ग्रामदैवत श्री गणेशमंदिरासमोरून मंदिरातील मूर्तीला मनोमन नमन करून, ठाकुर्ली मार्गे ९० फिट रस्ता गाठला तेव्हा वेग घेता आला. दुर्गाडी किल्ल्या जवळील चौकात शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला कुर्निसात करून आम्ही पुलावरून खाडीचे पात्र पार केले. सुदैवाने कोनगावात वाहतूककोंडी झाली नाही. त्यामुळे झपाट्याने रांजनोली नाका गाठत येथे श्विन स्कॉटने नाशिक ठाणे महामार्गाला वळण घेतले. वाहने अधिक असली तरी रुंद महामार्ग असल्याने येथे मार्गक्रमण करणे श्विनला नेहमीच आवडते. खरेतर हा श्विनच्या चाकाखालचा रोजचाच रस्ता. तेथून रेल्वेमार्गावरील चढ चढताना समोर दिसणारी खिंड थकवा जाणवू देत नाही. हा चढ चढल्यावर आलेल्या लांबलचक उतरणीने आणि जाणवणाऱ्या वाऱ्यामुळे उत्साह वाढत होता. 

दापोडे जवळील साईमंदिरात आम्ही शिरलो. तेथील प्रसन्न वातावरणाने मन भारून गेले. त्या परिसरात छोटा फेरफटका मारताना सर्व जगाचा विसर पडतो. मुंबई/ ठाण्याहून शिर्डीपर्यंत पदयात्रा करणाऱ्या भाविकांची येथे निवासाची व्यवस्था केली जाते. तसेच काही प्रकारचे व्यावसायिक शिक्षणही येथे दिले जाते. गोळवलकर गुरुजींची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. वेगवेगळी फुलझाडे आणि हिरवळीने सर्व विवंचना विसरल्या जातात. येथे काही वेळ थांबून आम्ही मानकोलीकडे वळलो. दरम्यानच्या उतारावर चांगलाच वेग साधता आला होता. मानकोली पार केल्यावर डाव्या बाजूला पुढच्या दिशेस मुंब्रा डोंगररांगा दिसू लागल्या. ह्या डोंगररांगा आणि उल्हास खाडीचे पात्र यांच्या पार्श्वभूमीवर फोटोसेशन करणे मला नेहमीच आवडते.

तेथून पुढे खारेगाव टोल पार करत मुंब्रा शहराकडे वळल्यावर मात्र रहदारीची वर्दळ  जाणवू लागली. सकाळची वेळ असल्याने मुंब्रा शहरातील बाजार भरला नव्हता त्यामुळे त्या रहदारीतून लवकर सुटका करून घेत शिळ फाटा गाठला. आता जठराग्नी तप्त होऊ लागला होता. त्याला आहुती देणे गरजेचे होते. मिसळीच्या आशेने आज 'कोकणरत्न'कडे दुर्लक्ष करत आम्ही पुढे निघालो. मात्र दुर्दैवाने देसाई गाव येथील 'लाल वडा' हॉटेल बंद असल्याने रपेट तशीच सुरु ठेवावी लागली. सुदैवाने 'पालवा'पुढील चढ सहजपणे पार झाला. मानपाडा जवळ येताच केलेल्या निरापानामुळे पुन्हा उत्साह आला. मिसळीचा योग हुकला तरी, भोपरहून पुढे येताच अय्यंगार बेकरीत केक आणि शेजारीच मिळालेल्या अप्रतिम इडली सांभारने क्षुधाशांती केली.
त्यानंतर मात्र विनाथांबा स्वगृही परतत श्विन आणि स्कॉटची उल्हास खाडी परिक्रमा सुफल संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...