सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

श्रावणाचा उपद्व्याप

भारतीय राष्ट्रीय दिनांक सौर श्रावण ११,शके १९३९

#cycle2work साठी जायला मिळणार हे समजताच श्विनचा आनंद द्विगुणित झाला होता. मी रोज ठाण्याला जात असलो तरी गेल्या २-३ महिन्यात श्विनला हि संधी फारच कमी वेळा मिळत होती.

सारखं नेवाळी फाटा किंवा शिळ फाटा जाऊन घरी येऊन श्विनचे समाधान होत नव्हते. त्यामुळेच आज cycle2work साठी निघताच श्विन खुश झाली. नेहमीप्रमाणे पाऊस पहाटेच पडून गेला होता. त्याच्या पाऊस(पाउल)खुणा रस्त्यावर दिसत होत्या.

डोंबिवली आणि ठाकुर्ली पार करून नवीन कल्याण रस्त्याला लागलो, तेव्हा श्विनने छान वेग पकडला होता. या रस्त्यावर सायकल चालवण्याची मौज निदान डोंबिवलीकरांना तरी आगळीच. #KDMC मधील खड्डेरहित रस्ता म्हणून याचा काही भाग तरी म्युझिअम मध्ये ठेवावा. त्यापाठोपाठ पत्री पूल पार करून दुर्गाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो.

इथे मात्र गुळगुळीत नवीन रस्त्यावर वाहनचालकांना कसा त्रास द्यावा याचा उत्तम नमुना बघायला मिळतो. हा रस्ता सुरु होताच लगेच आणि नंतर गोठ्याअगोदारचा पूल सुरु होताना तिहेरी गतिरोधक तेही चार चार फुटावर का लावले ह्याचे समाधानकारक उत्तर देणाऱ्याला बक्षीस द्यायला हरकत नाही. याशिवाय इतर गतिरोधक आहेत ते वेगळेच.

दक्षिणायनाच्या अखेरच्या तिमाहीत दुर्गाडी पुल फ्लेमिंगो पक्ष्यांनी बहरलेला असतो. आता उत्तरायनाच्या अखेरच्या तिमाहीत ती कसर आज तरी कावळ्यांनी भरून काढली होती. श्विनला अर्थातच कावळ्यांची शाळा बघण्यात रस नव्हता.

कोनगाव, गोवे, रांजनोली या गावातून जाताना अश्वशक्तीवर चालणाऱ्या वाहनाच्या गर्दीमुळे श्विनचा वेग मर्यदितच होता. पण नाशिक ठाणा रस्त्याला लागताच श्विनने पुन्हा लय पकडली.

श्रावणामुळे सर्वत्र पसरलेली हिरवी चादर डोळ्यांना सुखावत होती. त्यामुळे पिंपळास पुढील चढ कसा पार झाला हे कळलेच नाही. तो चढ चढलो आणि बकऱ्यांचा एक कळप रस्त्याच्या कडेला हिरव्या मेजवानीवर तुटून पडलेला दिसला. त्यांचे फोटोसेशन करून पुन्हा मार्गाला लागलो. तिथून पुढे असलेल्या उतारावरून श्विनने वाऱ्याशी स्पर्धा सुरु केली.

डाव्या हाताला लांबवर मुंब्रा डोंगर दिसू लागताच मी फोटो घेण्याची संधी शोधू लागलो. डोंगरावर काळे ढग जमा झाले होते. पण इतक्यात मी समोर ठाण्याच्या दिशेने समोर पहिले तर तिथेही काळ्या रंगाने आभाळ रंगवले होते. अर्थात श्रावणाची चलाखी माहित असल्याने मी निर्धास्त होतो. मी फोटोसाठी संधी शोधत असतानाच श्रावणाने हळूहळू वरुणराजाला इशारा केला. तरी मी मात्र बेफिकीर होतो. श्रावणाची खोड्या काढण्याची सवय माहित असल्याने मी सुरुवातीला दुर्लक्ष केले. हे पाहताच श्रावणाने वरुणराजाला मोकळीक दिली. मग मात्र नाईलाज झाला असे दाखवत मी रेनकोट चढवला. अंजुरदिवे ते खारेगाव टोल इतका २-४ किमी रस्ता पार करेपर्यंत पवनकुमारांनी वरुणराजाला लगाम घातला. मला रेनकोट घालायला लावायचा उपद्व्याप आटपून श्रावणानेही आपण त्या गावचेच नाही असा अविर्भाव केला. मग भर उन्हात मी रेनकोट घालून ऑफिसला पोचलो.

#ismartcommute #tjsbbank #saveoursahyadri #cyclingzens #dombivlicyclingclub

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...