रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

जोडी तुझी माझी

राष्ट्रीय कॅलेंडरची शेवटची तिमाही म्हणजे सायकलप्रेमींसाठी पर्वणीच. ह्या काळातील आल्हाददायक वातावरण नेहमीच सायकलसफारींसाठी अनुकूल असते.
श्विन आणि स्कॉट जोडीने ह्याच वातावरणाचा लाभ घेण्याचे ठरवून आज अंबरनाथ येथील शिवमंदिराला भेट देण्याचे ठरवले होते. घरातून निघताना सूर्योदय झाला नव्हता. समोर लावलेल्या विजेरीमुळे श्विनचा रुबाब वाढला होता. श्विन आणि स्कॉटने दीनदयाळ रस्ता, पूर्वपश्चिम उड्डाणपूल, भोपर मार्गे मानपाडा रस्ता गाठला तोपर्यंत मात्र थोडाफार उजेडू लागले.

मलंगगडाशेजारी सूर्यबिंब क्षितिजावर येऊ लागले तोपर्यंत श्विन आणि स्कॉटने कोळेगाव गाठले होते. सायकलींनी वेग घेतला होता, मात्र क्षितिजावरील गुलाबी सफरचंद वेग मंदावत होते. मारुतीरायाला जन्मताच त्याचा लोभ का पडला हे सहजच जाणवत होते. श्विन आणि स्कॉटला मात्र मलंगगडाशेजारून अवतारणाऱ्या त्या प्रकाशगोलाची फिकीर नव्हती.
नेवाळी फाट्याला क्षणभर विसावून श्विन- स्कॉटने पुन्हा वेग पकडला आणि थेट अंबरनाथ येथील शिवमंदिर गाठले. ११ व्या शतकातील हे पुरातन शिवालय वालधुनी नदीकाठी वसलेले आहे. साधारणपणे ख्रिस्ती शक १०६० च्या सुमारास दगडात कोरलेले हे हेमाडपंथी मंदिर शिलाहार राजा छित्तराज याने बांधले असून त्याचा पुत्र मुंमुनी याने ह्या मंदिराची पुनर्रचना केली आहे असे ऐकिवात आहे. गर्भगृहात जाण्यासाठी साधारण २० पायऱ्या उतरून खाली जावे लागते. मात्र हे गर्भगृह वरील बाजूस पूर्ण न करता आकाशाशी नाते जोडत आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक सुंदर मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराशेजारी छोटा हौद असून तेथे अनेक कासव वास्तव्य करून आहेत. नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीनिमित्त गेले तीन संध्याकाळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या खाणाखुणा मंदिरासभोवती आढळत होत्या.
परत निघाल्यावर श्विन आणि स्कॉटने लोकनगरीमार्गे जाणारा रस्ता निवडला. मात्र हा रस्ता कच्चा आणि चढणीचा असल्याने थोडी परीक्षा घेणारा होता. मात्र दोन्ही सायकली MTB श्रेणीच्या असल्याने त्यांनी ती परीक्षा पार पाडली.

एव्हाना पोटातील कावळे (पेटके चुहे/ butterflies in stomach) ओरडायला लागले नसले तरी जागे होऊ लागण्याची चिन्हे दिसू लागली होती. मग पाइपलाइन रस्त्यालगतच्या वैभव उपहारगृहात क्षुधाशांतीचा होम पार पाडला.

सुर्यानेही अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. स्कॉटची सफारी सुरु होऊन जेमतेम २ आठवडे होत असतानाच स्कॉटने ४०-५० किमी अंतर पार करण्यास सुरुवात केली होती.

नेवाळी फाटा येथे पृथ्वीवरील अमृताचा आस्वाद घेणे ओघानेच आले. पुण्यनगरीत अमृततुल्य पेय मिळत असले तरी मुंबईत मात्र 'तुल्य' नव्हे प्रत्यक्ष (पृथ्वीवरील) अमृतच मिळते. नेवाळी फाटा येथे अमृताचा लाभ घेऊन स्कॉट आणि श्विनचा परतीचा पुढील प्रवास सुरु झाला.

आदित्यनारायण अस्तित्वाची दाहक जाणीव करून देऊ लागले होते. त्यामुळे स्कॉट आणि श्विनचा वेग मंदावला.
वाशी येथून २१ किमी ची मॅरेथॉन पूर्ण करून परत येत असलेला Ajit Shirwalkar घारीवली गावाजवळ भेटताच श्विनला पुन्हा उत्साह संचारला. त्या उत्साहातच आजची सफारी पूर्ण करून श्विनने आणि स्कॉटने घर गाठले

1 टिप्पणी:

  1. श्विनसफारी ला अनेक शुभेच्छा आणि हा ब्लॉग सदैव चालू राहो हीच आंबरनाथच्या शंकरा चरणी प्रार्थना.👍💐

    उत्तर द्याहटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...