बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

माझी व्हॅलेंटाइन

तिला मी प्रथम पाहिले तेव्हा मी माध्यमिक शाळेत असेन. पाहताक्षणीच ती मला आवडली होती. मात्र मी डोंबिवलीला आणि ती पुण्याला...त्यामुळे रोजची भेट होणे शक्य नव्हते. मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी पुण्याला जात असे. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये आमची भेट होत असे.

तिची माझी ओळख माझा मावसभाऊ- हर्षुने- करून दिली होती. मी मावशीकडे गेलो की मी तिला घेऊन रोज फिरायला जात असे. ती ठेंगणी आणि पितवर्णीय होती. आमची गट्टी चांगलीच जमली होती. पहिल्यांदा हर्षू आमच्याबरोबर येत असे. पण नंतर मात्र तो नसला तरी मी तिच्याबरोबर फेरी मारायला जातच असे.

आमच्या पहिल्या ओळखीतच आम्ही एकमेकांबरोबर झुडुपांमध्ये आदळलो होतो आणि मी तिच्या प्रेमात पडलो होतो.

हो ती होती माझ्या मावसभावाची- हर्षुची सायकल. हि तीच सायकल होती जिच्यामुळे मला नवीन जगाची...सायकलिंगची ओळख झाली. अगोदर दोन - तीन वर्ष मी काळ्या रंगाच्या घोडा सायकलवर सायकलिंग शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण होपिंगच्या पुढे काही तो सरकला नाही. मात्र हर्षुने मला होपिंग न करताच सरळ त्या पिवळ्या सायकलवर बसवून पेडलिंग सुरु करायला सांगितले. मग मात्र ती पितवर्णीय सायकल न डगमगता सरळ धावू लागली. मला वाटले होते की हर्षू आमच्याबरोबर आहे, पण आम्हाला एकटे सोडून तो केव्हाच मागे राहिला होता. पुढे T जंक्शन आल्यावर मात्र उजवीकडून किंवा डावीकडून आमच्या दुकलीवर अश्वशक्तीधारी वाहने आदळण्याचा धोका वाटल्याने मी तिचे हँडल रस्त्याच्या डावीकडे वळवले. आणि ... एकमेकांच्या बाहुपाशात शेजारील झुडुपांमध्ये आदळलो. 

मात्र माझा आत्मविश्वास वाढला होता. पुढच्याच प्रयत्नात मी तिला T जंक्शनला डावीकडे वळवले. पण तिथून काही अंतरावर आणखी एक T जंक्शन होते जेथून उजवीकडे वळल्यावर हमरस्ता लागणार होता. त्यामुळे त्या दुसऱ्या T जंक्शनला मी पायउतार झालो. U टर्नची शिकवणी झाली नव्हती. पण आता हर्षुही जवळ नव्हता. 

पॅडल मारत सायकलवरील बॅलन्स सांभाळणे शिकलो तरी आता सायकलवर बसवणार कोण? मग काय तिला हातात धरून आमची वरात निघाली ती थेट घरापर्यंत! आता मात्र सायकल चालवता येण्याचा (आणि तिला चालवत नेण्याचाही) आत्मविश्वास आला होता. त्यानंतर सायकलवर बसायला कधी शिकलो ते नक्की काही आठवत नाही. हर्षू शिक्षणानिमित्त पुणे सोडून कलकत्त्याला गेला. मात्र त्यानंतरही प्रत्येक सुट्टीत मावशीकडे जाणे आणि त्या पितवर्णीय सुबक ठेंगणीबरोबर फिरायला जाणे सुरूच राहिले. तिने मला दिलेली साथ कधीच विसरता येणार नाही.

२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...